एकीकडे आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी लक्ष केंद्रित करणे, स्मरणशक्ती कायम ठेवणे आणि सतत शिकण्याची क्षमता यांसारख्या मूलभूत गोष्टींमध्ये प्रदीर्घ संघर्ष करताना दिसतात; तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या अहिल्यानगरमधील १९ वर्षीय देवव्रत महेश रेखे यांनी ‘शुल यजुर्वेदा’च्या ‘माध्यंदिन’ शाखेतील दोन हजार मंत्रांचे ‘दण्डक्रम पारायण’ ५० दिवस अखंड, शुद्ध उच्चारणासह पूर्ण करून ते ‘वेदमूर्ती’ ठरले आहेत. त्यानिमित्ताने...
भारतीय वैदिक परंपरेत गुरू-शिष्य परंपरा ही अत्यंत श्रेष्ठ व खूप प्राचीन आहे. भगवान महर्षी वेदव्यास यांनी वेदांचे चार भाग करून चार शिष्यांना शिकविले व ती गुरू-शिष्य प्राचीन परंपरा सुरू झाली. या अक्षुण्ण परंपरेमध्ये ‘ऋग्वेद’, ‘यजुर्वेद’, ‘सामवेद’ व ‘अथर्ववेदां’च्या चार शाखा चार शिष्यांना शिकविण्यात आल्या. त्यामध्ये वैशंपायन यांना ‘यजुर्वेदा’चे ज्ञान वेदव्यासांनी दिले. नंतर महर्षी योगेश्वर याज्ञवल्य यांनी तपोबलाने भगवान सूर्यनारायणाकडून यजुर्वेदाची सर्व भारतामध्ये प्रसिद्ध असलेली व सर्वाधिक अध्ययन-अध्यापन रूपाने संवर्धन होणारी जी ‘माध्यंदिनी शाखा’ आहे, त्या शाखेचे शतकातील सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ संरक्षक सलक्षण घनपाठी दशग्रंथी, सर्व भारतामध्ये ज्यांच्याबद्दल सर्वांना मोठा आदर होता, असे स्वर्गीय वैदिकसम्राट श्रीकृष्ण शास्त्री गोडसे गुरुजी हे वाराणसी येथे जन्मले.
त्यांनी महाराष्ट्रामध्ये २५ वर्षे वेदाध्ययनाचे कार्य अव्याहतपणे सुरू ठेवले. त्यामध्ये चार शिष्य तयार करून प्रामुख्याने आळंदी येथील स्वर्गीय घनपाठी विश्वनाथ जोशी यांना सांगोपांग वेदविद्येचे घनांत अध्ययन करून, त्यांच्याकडे शिकत असलेले वेदरत्न घनपाठी म्हणजे महेश रेखे. संपूर्ण भारतामध्ये वेदशास्त्रादीचे माहेरघर, राजधानी असलेले श्रीक्षेत्र वाराणसी येथील वैदिकजगतातील सर्वांना माहीत असलेले अध्ययन-अध्यापनाचे मुख्यालय म्हणजे ‘सांग वेद विद्यालय’. २३ वर्षांपूर्वी महेश रेखे यांच्याकडून या ठिकाणी ‘एकाकी घन पारायण’ स्वतः गुरुजींनी उपस्थित राहून काशीतील विद्वत जनांसमोर करून घेतले व ‘अष्टविकृती’सहित ‘वेदविद्या’ पुढील पिढीमध्ये कशी सक्षमपणे प्रदान करून सतेज ठेवता येईल, हे दाखवून दिले व धन्य झाले.
गोडसे गुरुजींनी उभारलेले वेदविद्यारूपी मंदिराचे कळसस्थान म्हणजे श्री घनपाठी महेश रेखे. त्यांनी अत्यंत व्रतस्थपणे आचार, विचार, धर्म यांंचे एकनिष्ठेने पालन, जीवन यापन केले. अत्यंत तेजस्वी, ओजस्वी, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला, म्हणजेच त्यांचे सुपुत्र देवव्रत रेखे यांनी आताच ‘एकाकी’ म्हणजेच एकट्याने ‘दण्डक्रम पारायण’ वाराणसीमध्ये कंठस्थ केले. यामुळे ते वेदविद्येच्या मंदिरावरील ध्वजा ठरले आहेत.
१९ वर्षांचे देवव्रत महेश रेखे यांनी ‘शुल यजुर्वेदा’च्या ‘माध्यंदिन’ शाखेतील दोन हजार मंत्रांचे ‘दण्डक्रम पारायण’ ५० दिवस अखंड, शुद्ध उच्चारणासह पूर्ण केले. वैदिक मंत्रपठणात प्रत्येक मंत्राचा विशिष्ट उच्चार करून, त्या मंत्रांना स्वर असतात. ते म्हणजे, ‘उदात्त अनुदात्त स्वरित’ आणि अनेक ठिकाणी लिष्ट संधी असतात, त्यादेखील अचूक म्हणावयाच्या असतात. हे आव्हानदेखील देवव्रत यांनी लीलया पेलले.
चिरंजीव देवव्रत महेश रेखे यांनी आपल्या गुरुचरणी वयाच्या आठव्या वर्षी उपनयन संस्कार झाल्यावर आचार-विचार संपन्नता ठेवून अत्यंत निष्ठेने वेदसंहिता पदपाठ क्रमपाठ केली. यामध्ये ‘जटा’, ‘माला’, ‘रेखा’, ‘शिखा’, ‘ध्वज’, ‘दंड’, ‘रथ’ आणि ‘घन’ अशा आठप्रकारचे ‘विकृती पाठ’ हे अध्ययन परिपूर्ण केले. अत्यंत दुरापास्त, कष्टसाध्य आणि लिष्ट असे हे अध्ययन आहे. त्यामध्ये ‘दण्डक्रम पारायण’ करणे म्हणजे अत्यंत दुर्लभ मानावे. ‘दण्डक्रम पारायण’ करणारा हा केवळ अनेक जन्म जन्मार्जीत पुण्यफलाचा प्रताप म्हणावा. देवव्रताचे कौतुक करावे तितके ते तोकडेच आहे. ‘दण्डक्रम पारायण’ करणे म्हणजे तो साक्षात विश्वनाथ महादेवच समजावा. केवळ मंत्र घोकून ‘दण्डक्रमा’चे मंत्र येत नाहीत, तर त्यासाठी वरतून येतानाच पुण्याचा मोठा साठा घेऊनच यावे लागते, हे सत्य इथे प्रकर्षाने नमूद करावे लागेल.
अध्ययनकाळामध्ये ‘कोरोना’ महामारीच्या वेळेस देवव्रत यांचे मातृछत्र हरपले, तरीसुद्धा दृढनिश्चय घेऊन अध्ययनामध्ये कुठल्याही प्रकारची कमी त्यांनी ठेवली नाही. हे खरंतर अत्यंत कठीण आहे. काशीमध्ये या अत्यंत दिव्य ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेण्याचे भाग्य आम्हा उभयतांस लाभले. २५ लाखांपेक्षादेखील पदांची उलटसुलट आवृत्ती अस्खलित नियमाप्रमाणे म्हणणे हेदेखील अत्यंत कठीण आणि तेही कुठल्याही प्रकारच्या ग्रंथाचे अवलोकन न करता अचूक म्हणणे, म्हणजे केवळ गुरुकृपाच! याप्रसंगी काशीतील विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी पारायण श्रवण केले. अनेक संस्थांनी देवव्रत यांना सन्मानित केले, हेदेखील अत्यंत महत्त्वाचे. ‘दण्डक्रम’ म्हणताना पद पुढे-मागे करून संधी आणि स्वर यावरदेखील अत्यंत एकाग्र चित्ताने लक्ष केंद्रित करून, त्याप्रमाणे उच्चारण करणे हे खूप विलक्षण. ‘दण्डक्रम पारायण’ म्हणजे जगातील सर्वांत प्राचीन सुदृढ मौखिक ज्ञान परंपरेचा चमत्कार आहे. संपूर्ण जगामध्ये अशाप्रकारचे कुठलेही उदाहरण पाहायला मिळत नाही. भारतीय ज्ञानाचा संपूर्ण विनाश करण्याकरिता नालंदा विद्यापीठासारखे जळीतकांड केले, तरीपण अशा ऋषितुल्य व्यक्तींच्या मौखिक परंपरेने ही ज्ञानविद्या लुप्तप्राय होऊ शकली नाही.
वेदज्ञानाचे रक्षण केवळ पुस्तकाने होत नाही, तर मेधा व बुद्धी गुरू-शिष्य संबंधाने अखंड साधना करूनच जिवंत राहते. या परंपरेचे अद्भुत प्रमाण म्हणजे, देवव्रत होय. हे पारायण म्हणजे येणार्या पुढील पिढ्यांसाठी एक आदर्श ठरेल, यात तीळमात्र संशय नाही.
एकूणच देवव्रत महेश रेखे यांचे ५० दिवसांचे पारायण हे भारतीय परंपरेतील मानवी बुद्धी क्षमता विकासाचे जिवंत उदाहरण आहे, असे मी मानतो.
- वेदाचार्य रवींद्र पैठणे
(लेखक महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान, नाशिकचे संस्थापक आहेत.)