भारत-रशिया मित्रबंधाचा नवा अध्याय

    07-Dec-2025
Total Views |

Modi and Putin
 
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या दोनदिवसीय भारत दौर्‍यात व्यापार, ऊर्जा, संरक्षण अशा विविध क्षेत्रांतील १६ करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. त्यामुळे येत्या काळात भारत-रशिया सहकार्य अधिक दृढ होईल. शिवाय या दौर्‍यामुळे मोदी आणि पुतीन यांच्यातील मित्रत्वाचे बंधही पुनश्च अधोरेखित झाले. त्यानिमित्ताने या दौर्‍याची फलश्रुती, पुतीन यांची सुरक्षाव्यवस्था आणि यादरम्यान रंगलेले मानापमान नाट्य यांचा आढावा घेणारा हा लेख...
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दि. ४ व ५ डिसेंबर असे दोनदिवसीय भारतदौर्‍यावर होते. गेल्या चार वर्षांतला त्यांचा हा पहिलाच भारतदौरा असल्याने, याची तयारीही मोठ्या प्रमाणात सुरू होती. पुतीन यांची ही २३वी भारत-रशिया शिखर परिषद होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा आणि राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांची भेट, हेच दोन मुख्य कार्यक्रम होते. यावेळी बोलताना पुतीन यांनी "पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांच्या दबावाला बळी न पडणारे नेते आहेत. त्यांची भूमिका रोखठोक आणि खंबीर असते,”अशा शब्दांत दिल्ली विमानतळावर उतरताच स्वागतासाठी राजशिष्टाचार बाजूला ठेवीत स्वत: आलेल्या मोदींच्या मेहमाननवाजीचा उल्लेख केला, तर "माझे मित्र पुतीन यांचे स्वागत करताना आनंद झाला,” अशी स्तुतिसुमने मोदींनी उधळली. पुतीन यांनी पुढचा प्रवास स्वत:च्या गाडीतून न करता मोदींच्या गाडीतून केला, ही बाबही उल्लेखनीय ठरावी.
 
भारत व अमेरिका दरम्यान सध्याचे संबंध पाहता, हा कार्यक्रम अनेकांना विशेषतः अमेरिकेला बरेचकाही सांगून जातो. रशियाच्या अध्यक्षांचे सात महत्त्वाच्या खात्यांच्या मंत्र्यांसह आणि उद्योगजगतातील मान्यवरांसह भारतभेटीवर येणे, ही बाब साहजिकच आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप महत्त्वाची ठरली. या भेटीच्या निमित्ताने जणू रशियन सरकार आणि उद्योगजगत भारतात अवतरले होते. एकूणच, पुतीन यांची ही भारतभेट जागतिक महत्त्वाची घटना ठरली.
 
हत्यारासोबत निर्मितीचे तंत्रज्ञानही
 
ऊर्जा, संरक्षण आणि द्विपक्षीय व्यापार या विषयांवर यावेळी मोदी आणि पुतीन यांच्यामध्ये सर्वस्पर्शी चर्चा झाली. यामध्ये रशियन तेल, क्षेपणास्त्र प्रणाली, लढाऊ विमानांची खरेदी, जहाजबांधणी, क्षेपणास्त्र हे विषय प्रामुख्याने चर्चिले गेले. भारताने रशियाशी व्यापारी-व्यवहार करू नये, यासाठी अमेरिकेचा दबाव असूनही त्याकडे दुर्लक्ष करीत या विषयांवर भारत आणि रशिया यांत मनमोकळेपणाने चर्चा झाली आणि निर्णयही घेतले गेले. अमेरिकेने लादलेल्या कठोर निर्बंधांमुळे मध्यंतरी काहीकाळ रशियन तेलाची खरेदी काहीशी कमी झाली होती; पण ही बाब तात्पुरती होती. कारण, रशिया भारताला रास्तदराने तेल पुरवत असतो. जगातील अत्याधुनिक मानल्या जाणार्‍या पाचव्या पिढीच्या ‘सुखोई एसयू-५७’ प्रकारच्या लढाऊ विमानांच्या खरेदीबाबतची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. ‘एस-४००’ प्रणाली, ‘सुखोई-३०’, ‘मिग-२९’, ‘टी-९०’ रणगाडे, ‘कामोव्ह’ हेलिकॅाप्टर, ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र, ‘एके-२०३’ रायफलींचे उत्पादन हे विषय मार्गी लागल्यात जमा झाले आहेत. ‘एस- ४००’ची उपयोगिता ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने अतिशय उच्चदर्जाची सिद्ध झाली. आता ‘एस-५००’ आणि ‘एसयू-५७’ यांच्या खरेदीबाबतची चर्चाही पूर्णत्वाला पोहोचली आहे. ‘रुपया’ आणि ‘रुबल’ यांतील व्यापारवाढीचा विषयही चर्चेत होता. भारत कोणाच्याही दडपणाखाली, दबावाखाली आपले धोरण बदलणार नाही, हे चर्चेनंतर आता अगदी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारत आणि रशिया संबंध हे भविष्यात नवीन उंची गाठणार, हेही स्पष्ट आहे.
 
चीन, रशिया आणि युरोप यांच्याबरोबर व्यापार करार करताना भारताला समतोल साधावा लागणार आहे. शिवाय, कॅनडाचाही विचार करावा लागेल. भारताची अमेरिकेबरोबरही व्यापार करार करण्याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच रशिया सामग्रीसोबत ती तयार करण्याचे तंत्रज्ञानसुद्धा भारताला देण्यास तयार असतो, ही भारतासाठी जमेची बाजू आहे.
 
वेचलेले वृत्तकण
 
शिरस्त्याप्रमाणे पुतीन यांच्या अगोदर त्यांचा सुरक्षा चमू दिल्लीत येऊन पोहोचल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. एक ‘सुरक्षाचक्र’ निर्माण केल्याच्या बातम्याही झळकल्या. त्या सुरक्षेचा ‘भेद’ कोणत्याही शस्त्राने करता येऊ शकत नाही, अशी त्याची ख्याती. पण, पुतीन तर मोदींच्या गाडीत बसून पुढील मुक्कामी गेले, ही बाबही उल्लेखनीयच म्हटली पाहिजे.
 
‘केजीबी’ या रशियन गुप्तहेर संस्थेचे पुतीन हे स्वत: गुप्तहेर राहिलेले आहेत. आज जगातील सर्वांत शक्तिशाली व्यक्तींपैकी ते एक मानले जातात. त्यामुळे त्यांची सुरक्षाव्यवस्था अत्यंत खास, अत्याधुनिक आणि रहस्यमय असावी, याचे आश्चर्य वाटावयास नको. त्यांच्या सुरक्षा पथकातील ‘सुरक्षाचक्र’ त्यांना आजवर प्रत्येक परिस्थितीत सुरक्षित ठेवत आले आहे.
 
पुतीन यांच्या या अभेद्य सुरक्षाव्यवस्थेतील अनेक अत्यंत आश्चर्यकारक बाबी अशा आहेत ः पुतीन जेव्हा परदेशात प्रवास करतात, तेव्हा त्यांचे आरोग्यविषयक विश्लेषण कोणालाही करता येऊ नये, कळू नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते. त्यांच्या सुरक्षा पथकाकडून त्यांचे मल आणि मूत्र देखील सीलबंद करून त्वरित परत रशियाला पाठवले जाते. इतकेच नव्हे, तर त्यांचे अंगरक्षक (बॉडीगार्ड) हे बाथरूममध्ये जातानाही त्यांच्यासोबत उपस्थित असतात. पुतीन यांच्या अंगरक्षकांची निवड अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. त्यांचे अंगरक्षक ‘फेडरल प्रोटेटिव्ह सर्व्हिस अकादमी’तून (एफएसओ) प्रशिक्षित झालेले असतात. त्यांची उंची ५.८ ते ६.२ फूटदरम्यान असावी लागते. तसेच, वजन ७५ ते ९० किलोग्रॅम असणे आवश्यक आहे.
 
निवड करताना मुलाखत, पॉलीग्राफ टेस्ट आणि पार्श्वभूमी तपासणी केली जाते. त्यांना कठोर थंडीत काम करण्याचे विशेष प्रशिक्षण दिलेले असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांची सेवा फक्त ३५ वर्षांच्या वयापर्यंतच असते. हे बॉडीगार्ड अतिमहत्त्वाच्या बैठकांमध्येही हस्तक्षेप करतात. उदाहरणार्थ, याचवर्षी उत्तर कोरियाच्या किम जोंग उन यांना पुतीन यांच्या खूप जवळ जाण्यापासून त्यांनी रोखले होते. पुतीन हे सार्वजनिक कार्यक्रमांसाठी किंवा उच्च धोयाच्या ठिकाणी ‘बॉडी डबल्स’ वापरतात. याबद्दलची माहिती अन्य सूत्रांकडूनही अधूनमधून बाहेर येत असते. युक्रेनचे लष्करप्रमुख मेजर जनरल किरिल बुडानोव्ह यांच्या महितीनुसार, पुतीन हे किमान तीन बॉडी डबल्स वापरतात. त्यांच्यासारखे दिसण्यासाठी यांपैकी काहींनी प्लास्टिक सर्जरीदेखील करून घेतलेली असते.
 
पुतीन प्रवासात असताना विषबाधेचा धोका टाळण्यासाठी एक वैयक्तिक प्रयोगशाळाच त्यांच्यासोबत असते. यात त्यांचे अन्न तपासले जाते. पुतीन इतर हॉटेल कर्मचार्‍यांचा वापर करत नाहीत. त्यांचा स्वतःचा शेफ असतो, सोबत एक हाऊसकीपिंग टीम रशियातून येते. पुतीन ज्या हॉटेलात मुक्काम करतात, त्या हॉटेलची पाहणी एक अत्याधुनिक सुरक्षा टीम एक महिना अगोदर करते, तेथील सर्व खाद्यपदार्थ काढून टाकले जातात. रशियातून आणलेले खाद्यपदार्थ त्यांच्या जागी ठेवले जातात. त्यांचा आचारीवर्गदेखील प्रशिक्षित सैन्य-कर्मचारी असतात.
 
विमानतळावर उतरल्यानंतर पुतीन हे ‘ऑरस मोटर्स’ आणि रशियाच्या संरक्षणविषयक खास संस्थेने बेतलेल्या ‘ऑरस सीनेट’ या कारमधून प्रवास करतात. ही कार पुतीन यांच्या अगोदर त्या-त्या देशात येऊन तयार असते, ती बुलेटप्रूफ असते; ती ग्रेनेडचा हल्लाही सहन करू शकते. तिला आग लागू शकत नाही. आपत्कालीन परिस्थितीत ऑसिजन पुरवठा करण्याची व्यवस्था या कारमध्ये असते. तिची प्रगत कमांड सिस्टम; प्रगत आणि सुसज्ज असते. विशेष म्हणजे, या कारचे चारही टायर पंचर झाले, तरी ती धावू शकते आणि तिचा वेग २४९ किमी प्रतितासापर्यंत जाऊ शकतो.
 
पुतीन हे कोणत्याही देशात दौर्‍यावर जाण्यापूर्वी, रशियाची राष्ट्रपती सुरक्षासेवेचा चमू (प्रेसिडेन्शियल सियुरिटी सर्व्हिस टीम) त्या देशातील गुन्हेगारी, दहशतवाद, आंदोलने आणि धार्मिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करते. त्यांच्यासाठी त्या देशात एक स्वतंत्र टेलिफोन बूथसह सुरक्षित दळणवळण लाईन्स उभारल्या जातात.
 
पुतीन ज्या विमानातून प्रवास करतात, त्याचे नाव ‘इल्युशिन आयएल ९६-३०० पीषू’ असून, त्याला ‘फ्लाईंग प्लॅट्यून’ म्हटले जाते. या विमानात प्रगत दळणवळण साधने, क्षेपणास्त्र संरक्षणव्यवस्था, बैठक कक्ष, एक जिम आणि बार अशा वैद्यकीय सुविधा असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यात एक आपत्कालीन ‘न्यूलियर कमांड बटण’ आहे, ज्यामुळे पुतीन हवेत असतानाच आण्विक हल्ल्याची कमांड देऊ शकतात. हे विमान २६२ लोकांना घेऊन जाऊ शकते आणि न थांबता ११ हजार किमीपर्यंत उड्डाण करू शकते. कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी पुतीन यांच्या मुख्य विमानासोबत एक किंवा दोन ‘बॅकअप जेट्स’देखील तयार ठेवले जातात.
 
पुतीन यांच्या दौर्‍यापूर्वी त्यांचे बॉडीगार्ड पूर्णपणे तयार आहेत, हे सुनिश्चित करण्यासाठी त्यांना दोन आठवड्यांसाठी क्वारंटाईनमध्ये (वेगळ्या गृहात) ठेवले जाते. हल्ला झाल्यास पुतीन यांच्या अंगरक्षकांना तातडीने त्यांच्याभोवती एक ‘मानवी कडे’ तयार करण्याचे प्रशिक्षण दिलेले असते. ‘कडे’ तयार केल्यानंतर त्यांना त्यांच्या ‘ऑरस सीनेट’ कारमधून थेट विशेष ठिकाणी पार्क केलेल्या विमानात (किंवा बॅकअप जेटमध्ये) सुरक्षितपणे कसे न्यायचे, ते शिकवलेले असते.
आधुनिक ‘ड्रोन’च्या धोयाची पुतीन यांच्यासाठी अत्यंत सक्षम अशी सुरक्षाव्यवस्था केलेली आहे. त्यांच्या एका अंगरक्षकाजवळ हाताने वाहून नेता येणारे ‘अ‍ॅण्टी-ड्रोन इंटरसेप्टर’ असते. हे उपकरण कोणत्याही परिस्थितीत शत्रूच्या ड्रोनला निकामी करण्यास किंवा पाडण्यास सक्षम असते. ही सर्व व्यवस्था मुद्दाम उद्धृत करण्यामागे एक उद्देश आहे. आपल्या येथील काही विरोधक मोदींच्या सुरक्षेवर अनाठायी खर्च होतो, अशी टीका करीत असतात. जगातील प्रमुख राष्ट्रे आपल्या नेत्यांना कसे जपतात, याची माहिती त्यांचे मतपरिवर्तन करील, अशी अपेक्षा आहे.
 
मानापमान नाट्य!
 
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासाठी राष्ट्रपती भवनात भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते; पण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आमंत्रण देण्यात आलेले नव्हते. याबद्दल आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी या अपमानाबद्दल रण पेटवले.
 
राष्ट्रपतींकडून आयोजित कार्यक्रमांचे आमंत्रण हा कोणत्याही पदाधिकार्‍याचा अधिकार नसतो. अशी आमंत्रणे देताना काही गोष्टी विचारात घेतल्या जातात. ज्या व्यक्तीला आमंत्रण दिले जाते आहे, त्याने भूतकाळात राज्य समारंभांमध्ये हजेरी लावली होती का, याचा विचार केला जातो. प्रजासत्ताक दिन, सरन्यायाधीशांचा शपथविधी सोहळा यांसारख्या महत्त्वाच्या समारंभांना विरोधी पक्ष अनुपस्थित राहिले होते. ज्यावेळी भारताचे राष्ट्रपती एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक स्वरूपात आमंत्रण देतात, तेव्हा त्या व्यक्तीने त्या आमंत्रणाचा सन्मान राखणे अपेक्षित असते. तरीही, एखाद्याला आमंत्रण द्यायचे किंवा नाही द्यायचे, हा राष्ट्रपती भवनाचा विशेषाधिकार आहे. भारत दौर्‍यावर येणार्‍या अन्य देशाच्या प्रमुखांना सरकारकडून भेटू दिले जात नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कालच केला होता. अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अन्य देशांचे प्रमुख भारत दौर्‍यावर यायचे, तेव्हा विरोधी पक्षनेत्याला आमंत्रण असायचे, त्यांना त्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेऊ दिली जायची; पण आजकाल हा संकेत पाळला जात नसल्याचे राहुल गांधी म्हणाले होते.
 
राहुल गांधी यांच्या आरोपावर सरकारने लगेच उत्तर दिले. राहुल गांधी गेल्यावर्षी जुलैमध्ये विरोधी पक्षनेते झाले. तेव्हापासून त्यांनी भारतात आलेल्या चार राष्ट्रप्रमुखांची भेट घेतलेली आहे. यामध्ये बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचाही समावेश आहे, याची आठवण सरकारकडून राहुल गांधींना करून देण्यात आली. परदेशांमधून आलेल्या अध्यक्षांना, पंतप्रधानांना, राष्ट्रपतींना कोणी भेटायचे, याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालय घेत नाही, तर त्या व्यक्तीसोबत आलेल्या शिष्टमंडळाचा तो अधिकार असतो, असेही सरकारकडून सांगण्यात आले. अपुर्‍या माहितीच्या आधारे एखादी भूमिका घेतली तर कसे हसे होते व मुखभंग होतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. शिवाय असे की, आपण अनेक निमंत्रणांना प्रतिसाद देत नाही हे खरे असले, तरी राष्ट्रपतींचा यात समावेश असू नये, ही माफक अपेक्षा बाळगावी काय?
 
‘भगवद्गीता जशी आहे तशी’...
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना रशियन भाषेत अनुवादित ‘भगवद्गीते’ची प्रत भेट दिली. ‘भगवद्गीता जशी आहे तशी‘ या शीर्षकाची ही आवृत्ती आहे. हे सूचक यासाठी की, पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना सादर केलेल्या ‘भगवद्गीते’च्या आवृत्तीवर मागे रशियामध्ये मोठा खटला सुरू होता. २०११ मध्ये रशियामध्ये ‘गीते’वर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. तेव्हा भारत सरकारने तत्कालीन रशियन सरकारकडे त्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला होता. पुढे न्यायालयाने हा खटला फेटाळला होता.
 
ते आलेच नाहीत हो!
 
हिना रब्बानी खार परराष्ट्रमंत्री असताना त्यांनी पुतीन यांनी पाकिस्तानला यावे, यासाठी प्रयत्न केले. पुतीन पाकिस्तानात येतील, असेही विधान रब्बानी यांनी केले होते; पण पुतीन आलेच नाहीत. रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इस्लामाबादचा दौरा केला; पण त्यातून पाकिस्तानला फारसा लाभ झाला नाही. काही मिळाले नाही, अशी आठवण पाकिस्तानचे राजकीय भाष्यकार कमर चीमा यांना आठवले. असो.
- वसंत काणे