भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ प्रखर ज्ञानमार्गी नव्हते, तर प्रज्ञावंतही होते. आपण शिकायचे कशासाठी, ज्ञानप्राप्ती करायची ती कशासाठी याचे भान प्रज्ञा देते. या अर्थाने बाबासाहेब ‘प्रज्ञावंत’ होते. बाबासाहेबांना उच्चशिक्षणासाठी अमेरिका व इंग्लंडमधील विद्यापीठांत जाऊन विविध विषयांचा अभ्यास करायचा होता. त्यांना बडोदे संस्थानचे नरेश सयाजीराव गायकवाड यांच्याकडून शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यासंदर्भात त्यांची व सयाजीराव महाराजांची मुंबईत भेटही झाली होती. या भेटीत सयाजीरावांनी बाबासाहेबांना विचारले, "भारतात एवढी विद्यापीठे असताना तुला परदेशात जाऊन शिकावेसे का वाटते?” त्या प्रश्नाला उत्तर देताना बाबासाहेब म्हणाले की, "मला परदेशी विद्यापीठातून राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, अनुवंशशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास करून, त्यावर संशोधन करावयाचे आहे.”
त्यावर सयाजीराव महाराजांनी विचारले, "हा अभ्यास, हे संशोधन तुला का करावेसे वाटते? त्या ज्ञानप्राप्तीचा उद्देश काय?” त्यावर बाबासाहेब म्हणाले, "हे विषय शिकून मला माझ्या दलित समाजाची अशी अवनत अवस्था का झाली, याचे ज्ञान मिळेल व या स्थितीतून त्यांना बाहेर कसे काढायचे, याचे मार्ग दिसतील.” त्यामुळे शिकायचे ते समाजासाठी आणि ज्ञानप्राप्ती देशहितार्थ याचे पक्के भान बाबासाहेबांना होते. त्यात स्वार्थाचा लवलेशही नव्हता. म्हणून ते ‘ज्ञानमार्गी प्रज्ञावंत’ म्हणून गौरविले जातात. महत्त्वाचे म्हणजे, या उद्दिष्टाचे आपल्या ध्येयवादाचे भान त्यांच्याकडून आयुष्यभर सुटले नाही.
अमेरिका व इंग्लंडमध्ये दहा वर्ष राहून त्यांनी तेथील नामवंत विद्यापीठांतून अनेक पदव्या मिळविल्या. प्रत्येक पदवीसाठी अध्ययन व संशोधन करून प्रबंध व ग्रंथलेखन केले. आज ते सर्व ज्ञान समाजोपयोगी व राष्ट्रहिताचे ठरले आहे. भारतात आल्यानंतर त्यांनी ज्या चळवळी उभारल्या, जे लढे दिले, जे समाज संघटन व समाजप्रबोधन केले, जी पत्रकारिता केली, जे वैज्ञानिक व राजकीय स्वरूपाचे कार्य केले, त्याचा हेतू निखळ समाजकारण व राष्ट्रोत्थान हाच होता. त्यांच्या या बहुआयामी कर्तृत्वाचा कळसाध्याय म्हणजे, भारतीय राज्यघटना निर्मितीतील त्यांचे अविस्मरणीय योगदान. समाजातील प्रत्येक घटक संपूर्ण समाज व राष्ट्रहित केंद्रस्थानी ठेवून, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचा अध्यक्ष व राज्यघटना समिती सदस्य या नात्याने त्यांनी जे योगदान दिले, ते अविस्मरणीय आहे. याही अर्थाने ‘ज्ञानप्राप्ती कशासाठी?’ या प्रश्नाचे आयुष्यभर शोध घेणारे प्रज्ञावंत म्हणून त्यांचे नाव कायम इतिहासात कोरले जाईल.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
भारतीय राज्यघटना निर्मितीच्या इतिहासातील दोन ठळक प्रसंगांची नोंद करणे मला आवश्यक वाटते. राज्यघटनेच्या निर्मितीसाठी तज्ज्ञ म्हणून ऑस्ट्रेलियातील घटनातज्ज्ञ डॉ. जेनिंग्स यांना निमंत्रण द्यावे, असे पंडित नेहरू यांना वाटत होते. तसा प्रस्ताव घेऊन ते व सरदार वल्लभभाई पटेल सल्लामसलतीसाठी महात्मा गांधी यांच्याकडे गेले. आपला प्रस्ताव त्यांनी गांधीजींसमोर ठेवला. त्यावर गांधीजी म्हणाले, "आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा प्रकांडपंडित घटनातज्ज्ञ असताना, आपण डॉटर जेनिंग्ससारख्या विदेशी व्यक्तीकडे का जायचे?” गांधीजींचे हे मत ऐकल्यानंतर राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांचे नाव निश्चित करण्याचा मार्ग मोकळा झाला. महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यातील मतभेद जगजाहीर होते. तरीही गांधीजींनी आपले मतभेद बाजूला ठेवून डॉ. आंबेडकरांच्या नावाचा पुरस्कार केला, हे महत्त्वाचे. ‘गुणी गुणत्तम वेची’ हेच शेवटी खरे!
दुसरा प्रसंगही असाच बाबासाहेबांचे मोठेपण अधोरेखित करणारा आहे. बाबासाहेब तत्कालीन अखंड बंगाल प्रांताच्या विधिमंडळातून राज्यघटना समिती व केंद्रीय कायदेमंडळ सदस्य म्हणून निवडून आले होते. देशाची १९४७ साली फाळणी झाल्यानंतर आपोआपच बाबासाहेबांचे सदस्यत्व रद्द झाले होते. मात्र, त्यांचे राज्यघटना समितीत सदस्य असणे समितीचे अध्यक्ष डॉटर राजेंद्र प्रसाद यांना अनिवार्य वाटत होते. म्हणून त्यांनी तातडीने तत्कालीन मुंबई प्रांताचे पंतप्रधान म्हणजे आत्ताचे मुख्यमंत्री बी. जी. खेर यांना पत्र दिले. त्यात त्यांनी या प्रांतातून घटनासमिती सदस्य म्हणून असलेल्या व्यक्तींपैकी एकाचा राजीनामा घेऊन त्या जागी डॉटर आंबेडकरांची रीतसर निवड करावी आणि तीही त्वरेने करावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या. खेरांनी ताबडतोबीने त्या सूचनेची अंमलबजावणी करून बाबासाहेबांची निवड जाहीर केली. बाबासाहेबांचे घटना समितीतील स्थान किती महत्त्वाचे व अढळ होते, हे दर्शवण्यासाठी या मनोज्ञ आठवणी.
डॉ. आंबेडकरांनी मसुदा समितीत व घटना समितीत जी भाषणे केली, ती दोन खंडात उपलब्ध आहेत. त्यावरून त्यांच्या ज्ञानाचा राज्यघटना समितीत व राज्यघटना निर्मितीतील योगदानाचा आवाका लक्षात येऊ शकतो. व्यक्ती, समाज व राष्ट्र यांचे हित लक्षात ठेवून, त्यांचे यातील प्रत्येक भाषण झाले आहे. राज्यघटना समितीची स्थापना दि. ९ डिसेंबर रोजी झाली. डॉ. राजेंद्र प्रसाद यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या घटना समितीत दहा उपसमित्या कार्यरत होत्या. त्यातील सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे घटनेची मसुदा समिती. त्यात सात सदस्य होते. या समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर होते. या समितीची पहिली बैठक दि. ३० ऑगस्ट १९४७ रोजी झाली. तिच्या एकूण ४४ बैठका झाल्या.
दि. १३ फेब्रुवारी १९४६ रोजी या समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीच्या अध्यक्षांना कच्चा मसुदा सादर केला. पुढे तो विचारार्थ जनतेसाठी खुला करण्यात आला. आठ महिन्यांत जनतेकडून ७ हजार ५३५ सूचना प्राप्त झाल्या. त्यातील पुनरावृत्तीच्या सूचना टाळून काही सूचना फेटाळून एकमेकांशी संबंधित सूचना एकत्र करून अंतिमतः २ हजार ७४३ सूचनांवर १४४ दिवस चर्चा झाली. दि. ४ नोव्हेंबर १९४९ रोजी ही प्रक्रिया पूर्ण झाली. दि. २५ जानेवारी १९४९ रोजी डॉटर आंबेडकर यांनी आपले अखेरचे भाषण केले. दि. २६ नोव्हेंबर रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सुधारित मसुदा स्वीकारून समारोपाचे भाषण केले. दोन वर्ष, ११ महिने, १२ दिवस घटना समितीचे कामकाज चालले.
दि. २६ जानेवारी १९५० पासून या राज्यघटनेचा देशभर अंमल सुरू झाला. गेल्या काही वर्षापासून केंद्र सरकारने २६ नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. घटना समितीत प्रत्येक टप्प्यावर डॉ. आंबेडकर यांनी भाष्य करणारी भाषणे केली आहेत. राज्यघटनेला आकार व दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या या भाषणांनी केले. त्यांच्या मैलाचा दगड ठरलेल्या भाषणांचा चिकित्सक आढावा घेणारे व त्याची चर्चा करणारे १५० पृष्ठांचे ‘भारतीय राज्यघटनेची निर्मिती - डॉटर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान‘ हे माझे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. ‘भारतीय विचार साधना, पुणे‘ या संस्थेने प्रकाशित केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीत जी असंख्य भाषणे केली, त्यातील तीन भाषणे अत्यंत महत्त्वाची आहेत. दि. १६ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीतील उद्देश ठरावावर सविस्तर भाष्य करणारे त्यांचे पहिले भाषण, दि. ४ नोव्हेंबर १९४८ रोजी घटनेचा सुधारित मसुदा डॉ. आंबेडकरांनी घटना समितीच्या अध्यक्षांकडे सुपुर्द केला व त्यावर प्रदीर्घ भाषण केले. तिसरे दि. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. आंबेडकरांचे समारोपाचे विवेचक भाषण झाले. ही तीनही भाषणे इतकी महत्त्वाची आहेत की, त्या प्रत्येक भाषणाची चर्चा करणारे स्वतंत्र लेख लिहावा लागेल.
माझ्या मते, राज्यघटना समितीसमोर त्यांनी दि. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी जे समारोपाचे भाषण केले, ते केवळ अद्वितीय नसून, भारतीय राज्यघटना व लोकशाही यशस्वी करावयाची असेल तर काय करावे, याचा तो मूलमंत्रच आहे. भारताच्या भविष्यकालीन वाटचालीला मार्गदर्शक ठरेल, असे ते दृष्टिपत्र - ‘व्हिजन डॉयुमेंट’ आहे. विशेषत: त्या भाषणाचा उत्तरार्ध इतका महत्त्वाचा आहे की, प्रत्येक पिढीतील तरुणांनी तो पाठ करावा. त्याचा अभ्यास करावा. त्यावर चिंतन-मनन करावे. ते भाषण आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग समजून त्यासाठी अनुकूल असा व्यवहार जीवनभर करण्याचा प्रयत्न करावा. विशेषत: शिक्षण क्षेत्रात कार्य करणार्यांनी तो आपला जीवन उद्देश - ‘लाईफ मिशन’ समजावा इतके ते महत्त्वाचे आहे.
ते सर्व भाषण महाभारत, भगवद्गीता व ज्ञानेश्वरीतील पसायदान इतके महत्त्वाचे आहे. ते भाषण किमान त्याचा उत्तरार्ध तरी सर्वांनी विशेषत: तरुण पिढीने अवश्य वाचावा, समजून घ्यावा, आचरणात आणावा, असे आवाहन मी आजच्या व उद्याच्या तरुण पिढीला कळकळीने करीत आहे. त्या युगप्रवर्तक भाषणातील एक उतारा येथे देऊन मी माझ्या लेखाचा समारोप करणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "जर लोकशाही यापुढे केवळ बाह्य स्वरूपात नव्हे, तर प्रत्यक्षातही कायम राहावी, अशी आपली इच्छा असेल, तर आपली सामाजिक, आर्थिक, राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण घटनात्मक पद्धतीलाच चिकटून राहायला हवे. याचा अर्थ असा की, आपण रक्तलांच्छित क्रांतीचा त्याग केला पाहिजे.
ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जेव्हा घटनात्मक मार्गाची शयताच नव्हती, तेव्हा घटनाबाह्य मार्गाचे समर्थन करता येण्यासारखे होते. परंतु, जेव्हा घटनात्मक मार्ग खुले आहेत, तेव्हा या घटनाबाह्य मार्गाचे काहीही समर्थन असू शकत नाही. हे मार्ग म्हणजे, दुसरे-तिसरे काही नसून, अराजकतेचे व्याकरण आहे ‘ग्रामर ऑफ अनारकी.’ जितया लवकर या मार्गाचा त्याग केला जाईल, तितके आपल्या देशाच्या दृष्टीने अधिक चांगले व हितवाहक होईल.” आज आपल्या देशात विविध प्रश्नांवरून ऐतद्देशीय व देशबाह्य शक्तींच्या साहाय्यताने जे अराजक माजवण्याचा प्रयत्न सुरू आहेत, त्या पार्श्वभूमीवर डॉटर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा इशारा औचित्यपूर्ण व महत्त्वाचा ठरतो.
- प्रा. श्याम अत्रे