माननीय स्वराज कौशल यांचे नुकतेच निधन झाले. दोन दिवसांपूर्वी ही बातमी वाचली तेव्हा दुःख झाले. काही काही व्यक्तिमत्त्वे आणि त्यांनी केलेले कार्य हे काळाच्या ओघात विसरले जाते. त्यापैकीच एक म्हणजे माननीय स्वराज कौशल...
राज कौशल हे समाजवादी विचारसरणीचे होते. त्यांनी आपली विचारसरणी कधीच सोडली नाही. त्यांच्या पत्नी स्व. सुषमा स्वराज मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये होत्या. ‘व्यक्तिस्वातंत्र्यवादी दाम्पत्य’ म्हणून त्यांनी एकमेकांबद्दल नेहमीच आदरयुक्त संबंध जपले. आज त्यांची कन्या बासुरी स्वराज ही भाजपतर्फे लोकसभेमध्ये खासदार म्हणून त्या दोघांचे कार्य पुढे चालवत आहे. स्वराज पती-पत्नीचे आपापसातील नाते दृढ होते. किंबहुना, सुषमा स्वराज यांच्या कारकिर्दीला वाव मिळावा म्हणून स्वराज कौशल स्वतः पाठी राहिले. परंतु, त्यामुळे त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात केलेल्या कामाचे महत्त्व कमी होत नाही. राष्ट्रप्रेमी स्वराज यांच्याबाबत माझ्या ‘अग्निशिखा सुषमा स्वराज’ या पुस्तकातील काही भाग आपल्यासाठी देत आहे-
आणीबाणीनंतर १९७७ साली स्वराज कौशल हे दिल्लीमध्ये वकिली करीत होते, तेव्हा जनता पक्षाची स्थापना झाली होती. तेव्हा स्वराज कौशल हरियाणाकडून राज्यसभेचे खासदार होते. सुषमाजी हरियाणामध्ये जनता पक्षाचे काम करीत होत्या. मंत्री झाल्यामुळे त्या चंदीगढ येथे राहत होत्या, तर स्वराज कौशल दिल्लीला. ‘वरिष्ठ वकील’ हे पद त्यांना बहाल केले होते आणि एका वर्षानंतर त्यांना ‘अॅडव्होकेट जनरल’चा किताबही मिळाला. सुषमाजी चंदीगढला राज्यमंत्री होत्या. १९९० साली जेव्हा हरियाणामध्ये जनता पार्टीचे सरकार गडगडले, त्यावेळी त्या आपल्या पतीबरोबर राहण्यासाठी दिल्लीला आल्या; पण त्याच वेळेला त्यांचे पती स्वराज कौशल हे मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले व राजधानी ऐझवालला गेले.
दि. ८ फेब्रुवारी १९९० रोजी केवळ ३७ वर्षांच्या स्वराज्य कौशल यांना मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले गेले आणि दि. ९ फेब्रुवारी १९९३ पर्यंत ते ‘राज्यपाल’ म्हणून पदावर कार्यरत होते.
आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासात इतया कमी वयामध्ये कोणीही कोणत्याही प्रदेशाचा राज्यपाल म्हणून नियुक्त केला गेला नाही आणि अजूनही हा रेकॉर्ड मोडलेला नाही. स्वराज कौशल यांना ईशान्य भारतामधील मिझोरामचे राज्यपाल केले गेले, त्याच्या पाठीमागे त्यांचा ईशान्य भारतातील घडामोडींचा, इतिहासाचा आणि तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास हे फार महत्त्वाचे कारण होते.
तेथे त्याकाळी असंतोष आणि बंडाचे वातावरण होते. त्याचा समग्र अभ्यास स्वराज कौशल यांनी केला होता आणि तेथील लोकांच्या संपर्कामध्ये ते सतत होते. सुमारे १५ वर्षे ते या विषयांच्या अभ्यासामध्ये गर्क होते. १९७९ साली त्यांनी मिझोरामचे तत्कालीन बंडखोर नेते लाल डेंगा यांना अटकेतून मुक्त करणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी सरकारला पटवून दिले. त्यांना अटकेतून मुक्त करून सरकारबरोबर बोलणी करण्यासाठी तयार केले. लाल डेंगा आणि सरकार यांच्यामध्ये सातत्याने बातचीत होत राहील, यासाठी अथक प्रयत्न केले.
‘संविधानिक सल्लागार’ म्हणून सरकारतर्फे त्यांनी कित्येक फेर्या ‘मिझोराम शांती समझोता’ अस्तित्वात येण्यासाठी घडवून आणल्या आणि सुमारे २० वर्षे चालत असलेला हा मिझोरामचा संघर्ष, मिझोरामचे बंड आणि विद्रोही चळवळ शेवटी शांत झाली. त्यामुळेच त्यांना मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले गेले होते. या काळामध्ये अनेक वेळा त्यांना भूमिगत व्हावे लागले. एकदा नक्षलवादी अतिरेयांनी त्यांचे अपहरण केले होते आणि त्यावेळेला त्यांची मुलगी केवळ सात वर्षांची होती; पण त्या संकटावर मात करून भारत सरकारबरोबर राहणे, हे ईशान्य भारतातील सात भगिनींच्या कसे हिताचे आहे, याचे महत्त्व लाल डेंगा आणि त्यांच्याबरोबरच्या समस्त बंडखोरांना समजावून ‘शांती समझोता’ घडवून आणला. हे त्यांचे योगदान किंवा हे त्यांचे काम राष्ट्राची एकता आणि अखंडता यासाठी खूपच महत्त्वपूर्ण होते. याबाबतीमध्ये आजही इतिहासाच्या पानांवर त्यांचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले गेले आहे.
यानंतरच ईशान्य भारतातील नागरिक भारताबरोबर खर्याअर्थाने जोडले गेले. भारतातील आपण एक भाग आहोत, हे मानू लागले आणि आसामसह पूर्ण ईशान्य भारताला गिळंकृत करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न यामुळे हाणून पाडला गेला. त्यानंतर ईशान्य भारत गिळंकृत करण्याचे चीननेही जोरदार प्रयत्न केले. आजही सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये चीनच्या हस्तक्षेपाचे प्रतिध्वनी उमटत आहेत; पण ईशान्य भारतातील जनता मात्र त्याला बळी पडली नाही आणि सिक्कीम-अरुणाचलची जनतासुद्धा चीनला आता धूप घालत नाही. कारण, तिबेटच्या बाबतीमध्ये जे घडले, ते त्यांच्या समोरच आहे. हे समजावून सांगण्याचे सर्वात जास्त व प्रथम प्रयत्न हे स्वराज कौशल यांनी केले होते, हा गौरवाचा भाग आहे.
त्यानंतर १९९८ ते २००४ यादरम्यान स्वराज कौशल यांनी हरियाणा राज्याचे प्रतिनिधित्व केले. ‘हरियाणा विकास पार्टी’तर्फे ते राज्यसभेमध्ये नियुक्त झाले. तेव्हा सुषमाजी भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय होत्या. दोघेही वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये, पक्षांमध्ये राजकीय पक्षांचे प्रमुख नेते असूनही त्यांच्यामध्ये कौटुंबिक किंवा पारिवारिक जीवनात कुठेही विसंवाद निर्माण झाला नाही. कारण, दोघेही याबाबतीत समजूतदार होते.
सुषमाजी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेतेपदी हळूहळू यशाच्या पायर्या चढत गेल्या आणि त्यासाठी त्यांचे पती स्वराज कौशल यांची भूमिका खूपच महत्त्वाची आणि प्रेरणादायी होती, असे स्वतः सुषमाजी नेहमी नमूद करीत असत. ते केवळ त्यांचे पती नव्हते, तर मित्र, सल्लागार, आलोचक, त्याचप्रमाणे आधारस्तंभ होते.
दोघेही एकमेकांशी रोज विविध राजकीय विषयांवर, तसेच सामाजिक विषयांवर चर्चा, विचारविनिमय करीत असत. सुषमा स्वराज यांनी एकदा असे सांगितले होते की, "माझे पती स्वराज कौशल समाजवादी जरूर आहेत; पण ते अन्य नेत्यांपेक्षा खूपच वेगळे आहेत, भिन्न आहेत. त्यांनी आपल्या स्वतःच्या राजकीय करिअरचा त्याग करून माझ्या राजकीय करिअरला या उंचीवर आणून ठेवले. मला सातत्याने प्रोत्साहन दिले. ते खूपच समजूतदार आणि स्त्री-पुरुष समानता मानणारे नेते आहेत.”
दोघेही पती-पत्नी वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये उच्चपदावर असण्याची खूप कमी उदाहरणे आपल्यासमोर आहेत आणि त्यामध्ये एक नाव हे सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल या पती-पत्नीचे घ्यावे लागेल आणि तेही अभिमानाने घ्यावे लागेल. व्यावसायिक मते भिन्न जरूर होती. अनेकदा चर्चा, विचार मतभेदाच्या कडेलोटापर्यंत पोहोचत असत; परंतु संध्याकाळचा चहा आणि रात्रीचे जेवण हे सर्व कुटुंबाने एकत्र करायचे, हा रिवाज त्यांनी कायमस्वरूपी पाळला होता आणि त्याचबरोबर तेथे मतभेदाचे वातावरण निवळेल, याची दक्षता ते घेत होते. वेळ मिळेल तेव्हा निवांत, फुरसतीच्या क्षणांमध्ये दोघांचा आवडता छंद होता तो म्हणजे संगीत व शेरोशायरी आणि ती एकत्रितरीत्या ऐकणे. हे त्यांच्या दाम्पत्य जीवनामधले खूप जिव्हाळ्याचे क्षण होते.
अशारीतीने आणीबाणीनंतर दोघांच्याही राजकीय कारकिर्दीची सुरुवात जनता पार्टीद्वारे झाली; परंतु त्यानंतर त्या दोघांनी वेगवेगळ्या पक्षांतून राष्ट्रसेवेमध्ये स्वतःला समर्पित केले. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षातून खासदार म्हणून कार्य करणार्या या दाम्पत्याचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदले गेले आहे. या राजकीय प्रवासात दोघांनाही त्यांच्या परिवारांची आणि मित्रांची खूपच साथ मिळाली, मदत मिळाली.
- मेधा किरीट