नव्या जागतिक समीकरणांची नांदी

    06-Dec-2025
Total Views |
 
Vladimir Putin
 
संपूर्ण जगाचे लक्ष पुतीन यांच्या भारतदौर्‍याकडे लागले होते. या दौर्‍याने पुन्हा एकदा भारत हा आपली स्वायत्तता जपणारा देश आहे, हे जगाला दाखवून दिले. एकाअर्थाने नव्या जागतिक समीकरणांची नांदी पुतीन यांच्या या दौर्‍यातून झाली असून, भारत त्यात निर्णायक भूमिका बजावणारा देश असेल, हे नि:संशय!
 
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा दोनदिवसीय भारतदौरा संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारा ठरला. खरं तर भारत-रशिया संबंध हे काळाच्या कसोटीवर टिकलेली एक धोरणात्मक भागीदारी असून, या भागीदारीला नवे वळण देणारा, जागतिक शक्तिसंतुलनाला सूचक संदेश देणारा, तसेच पश्चिम आशियापासून युरोपपर्यंतच्या राजनैतिक पटावर नवी चाल रचणारा असा हा दौरा म्हणावा लागेल. जगावर रशिया-युक्रेन युद्धाचे सावट कायम असताना, तसेच आंतरराष्ट्रीय ध्रुवीकरण तीव्र होत असतानाच, हा दौरा झाला. या दौर्‍यातही अनेक अर्थ दडले असून, नव्या जागतिक समीकरणांची नांदीचेच हे द्योतक!
 
अमेरिका, रशिया आणि चीन या जागतिक शक्तींच्या बरोबरीने भारताचा उदय होत आहे, हे जगाला सांगणारा हा दौरा होता, असे निश्चितपणे म्हणता येते. युक्रेन युद्धाचा भडका उडाल्यानंतर अमेरिकेसह जगाकडून रशियावर कडक निर्बंध लादले गेले, त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या, प्रचंड आर्थिककोंडीही केली. त्याचा परिणाम म्हणून जागतिक व्यापारमार्ग अस्थिर झाले, ऊर्जा राजकारणाचे गणित बदलले. तथापि, अशा विपरीत वातावरणातही भारताने रणनीतिक स्वातंत्र्य कायम राखले. पाश्चिमात्यांचा दबाव झुगारुन, रशियाशी संबंध कायम राखत भारताने अतिशय संतुलित भूमिका घेतली. आताही भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, यासाठी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दबाव आणत असताना, भारताने तसे करणे नाकारले. परिणामी, भारतीय आयातीवर जास्तीचे शुल्क लादले गेले. मात्र, भारत त्याला बधला नाही. भारताने रशियाबरोबरचे व्यापारीसंबंध संपुष्टात आणावेत, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी वारंवार व्यक्त केली असताना, भारताने तसे करण्याचे टाळले, हे विशेष. एकीकडे अमेरिका रशियाकडून इंधन खरेदी करत असताना, भारताने ती करू नये, हा त्यांचा आग्रह अनाकलनीय असाच!
 
या पार्श्वभूमीवर पुतीन यांनी भारताला प्राधान्य देत दौरा करणे, ही मोठी घडामोड ठरली. आंतरराष्ट्रीय पातळीवर एकट्या पडलेल्या रशियासाठी भारत हे केवळ मित्रराष्ट्र नाही, तर तो सुरक्षित सामरिक, आर्थिक आणि धोरणात्मक आधार आहे. या भेटीतून रशियाने जगाला सांगितले की, भारतासोबतची त्याची मैत्री दृढ आहे आणि ती कायम राहील. भारताच्या दृष्टीने, ऊर्जापुरवठा, संरक्षण-सहकार्य, अवकाश तंत्रज्ञान, व्यापारमार्ग, अणुऊर्जा आणि बहुराष्ट्रीय मंचांमध्ये परस्परपूरक भूमिका या सर्व क्षेत्रांत रशिया हे निर्णायक राज्य आहे. त्यामुळे या भेटीचे महत्त्व पारंपरिक मैत्रीपुरते मर्यादित न राहता, नव्या जागतिक आर्थिकव्यवस्थेतील भारताच्या भूमिका अधोरेखित करणारे ठरले.
 
या दौर्‍यात २०३० पर्यंतच्या भारत-रशिया आर्थिक सहकार्याचा सविस्तर आराखडा जाहीर झाला. यामध्ये ऊर्जाक्षेत्रातील दीर्घकालीन सुरक्षेवर प्रकर्षाने भर देण्यात आलेला दिसतो. रशिया आजही भारताच्या कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. पाश्चिमात्य निर्बंधांनंतरही भारताने स्वस्तदरात ऊर्जा आयात करणे थांबवलेले नाही. या भेटीत दीर्घकालीन ऊर्जापुरवठा करारांवर चर्चा झाली. त्यामुळे भारताची ऊर्जा-सुरक्षितता २०३० पर्यंत मजबूत राहणार आहे. तसेच, अणुऊर्जा सहकार्याचा विस्तार करण्यावरही भर देण्यात आला. कुडानकुलमच्या पुढील टप्प्यांसह नव्या अणुऊर्जा प्रकल्पांवर सहमती झाली. अमेरिकन आणि युरोपीय देश अणुऊर्जा पुरवठ्यात अडथळे आणत असताना, रशिया भारताला तांत्रिक मदत आणि इंधनपुरवठा करणारे सर्वात विश्वासार्ह राष्ट्र आहे, हे लक्षात घ्यायला हवे. तसेच येणार्‍या दशकात भारतात संरक्षणक्षेत्रात रशियाची महत्त्वाची भूमिका असेल, हे आता स्पष्ट झाले आहे. ‘गगनयान’ मोहीम, ‘सॅटेलाइट नेव्हिगेशन’ यंत्रणा, ‘क्वांटम’ तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा या क्षेत्रांतही संयुक्त कार्य योजना दोन्ही देशांकडून आखण्यात आली आहे. अमेरिकेवर अत्याधिक अवलंबून राहू नये, हा भारताचा रणनीतिक उद्देश यामुळे साध्य होताना दिसतो. हे करार आर्थिकदृष्ट्या जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच ते भारताच्या स्वायत्त परराष्ट्र धोरणाला बळ देणारे आहेत.
 
पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांची भेट म्हणजे दोन राष्ट्रप्रमुखांच्या औपचारिक भेटीपेक्षा अधिक महत्त्वाची होती. या दोघांच्या मैत्रीचे काही वैशिष्ट्यपूर्ण पैलू समोर येतात. दोघेही दृढ निर्णयक्षमता असलेले आणि स्वतंत्र जागतिक दृष्टी बाळगणारे नेते आहेत. भारत-रशिया संबंधांचे केंद्रीकरण भूतकाळाच्या भावनिक स्मृतींवर नव्हे, तर नव्या रणनीतिक वास्तवांवर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच, परस्पर सन्मानावर आधारित संवाद पद्धती त्यांनी विकसित केली आहे. यामुळेच, पश्चिमी दडपण, निर्बंध, युद्धाचे वातावरण या सर्वांमुळे संबंधांवर ताण येत असतानाही नेतृत्व-स्तरावरील विश्वास दोन्ही देशांनी कमी होऊ दिला नाही. भारताने जगाला अत्यंत स्पष्ट संदेश दिला असून, आम्ही अमेरिका किंवा चीन यांच्या इशार्‍यावर चालणारे नसून, आम्ही आमच्या हिताला प्राधान्य देणारे स्वतंत्र राष्ट्र आहोत, हे भारताने जगाला सांगण्यात यश प्राप्त केले आहे.
 
या दौर्‍यातील सर्वात महत्त्वाचा आणि प्रतीकात्मक क्षण म्हणजे, पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांना रशियन भाषेत अनुवादित केलेली भगवद्गीता भेट दिली. यामागेही एक गहिरा अर्थ दडला आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोलाचा संदेश यातून देण्यात आला. संपूर्ण जग पुतीन यांना आक्रमक, हुकूमशाह, निर्दयी अशी संभावना करत असताना, मोदींकडून दिली गेलेली ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’चा संदेश देणारी ‘गीता’ म्हणजे एकप्रकारे धर्मनिष्ठा, युद्धातील मर्यादा, कर्तव्यनिष्ठा आणि आत्मसंयम यांचे स्मरण करून देणारीच म्हणावी लागेल. भारताने कधीही रशियाच्या विरोधात उघड भूमिका घेतलेली नाही; पण गीतेच्या प्रतीकातून युद्धाला अंत असावा, हा सूक्ष्म संकेत मोदींनी दिला असे म्हणता येते. पाश्चिमात्य राष्ट्रे दबाव टाकतात, निर्बंध लादतात, त्या तुलनेत मोदी सांस्कृतिक प्रतीकांचा वापर करून एक वेगळी कूटनीती राबवतात. ‘गीता’ भेट देणे म्हणजे मैत्री, आध्यात्मिक संदेश आणि संघर्षाऐवजी संवादावर भर देण्याची आवश्यकता या कृतीतून मोदींनी विशद केली. भारत केवळ भूराजकारणानुसार वागत नाही; आमची कूटनीती संस्कृतीमूल्ये आणि समतोल दृष्टिकोनावर आधारित आहे, असा संदेशही पश्चिमेकडे यातून दिला गेला आहे.
 
बहुध्रुवीय जगात भारत हा रशिया आणि पश्चिम यांच्यातील ‘संवादाचा सेतू’ असू शकतो. कोणत्याही गटाच्या बाजूने पूर्णपणे झुकण्याऐवजी भारत संतुलन राखत आहे, हिच शांत, प्रबुद्ध भूमिका आज जगभर कौतुकास पात्र ठरते आहे. युक्रेन युद्धामुळे युरोप ऊर्जासंकटात सापडला; पण भारताने उलट स्वस्त तेल खरेदी करून महागाई नियमन केली. या दौर्‍यानंतर भारताला ऊर्जा-सुरक्षिततेचे आणखी भक्कम पडसाद मिळाले. भारत आज अमेरिकेचा मित्र किंवा रशियाचा मित्र अशा चौकटीबाहेर जाऊन स्वतःच्या हिताचा विचार करणारा जागतिक पातळीवरील महत्त्वाचा देश म्हणून उदयास आला आहे. पुतीन यांचा दौरा हा औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर तो नव्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या स्वतंत्र भूमिकेचे प्रदर्शन करणारा, रशियासोबतच्या ऐतिहासिक मैत्रीचे पुनरुज्जीवन करणारा, अमेरिका-युरोपला भारताची धोरणात्मक स्वायत्तता दाखवणारा संदेश देणारा, ऊर्जा-अणुऊर्जा-संरक्षण क्षेत्रांत २०३० पर्यंतच्या नव्या सहकार्याची पायाभरणी आणि जागतिक संघर्षांच्या काळात शांततेचा सांस्कृतिक संदेश देणारी गीता-कूटनीती राबवणारा ठरला आहे.