‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या ‘महापरिनिर्वाण’ वर्षात बाबासाहेबांच्या शिक्षणदालनाचा वारसा जपणार्या मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयातील दुर्मिळ ग्रंथसंपदेचे संरक्षण अत्यावश्यक ठरत आहे. शतकापेक्षा जुनी वास्तू, लाखो ग्रंथ आणि स्व-संग्रहित वस्तूंना नवजीवन देण्याच्या या निर्णायक क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला संरक्षणनिधी महत्त्वपूर्ण ठरत असल्याची माहिती महाविद्यालयातील मान्यवर संचालक व प्राध्यापकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिली, याबाबतचे विस्तृत वृत्तांकन...
जुलै १९४५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली आणि तिच्याअंतर्गत दि. २० जून १९४६ रोजी सिद्धार्थ कला आणि विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला हे महाविद्यालय मरीनलाइन्स येथील सैनिकांच्या बराखीतून सुरू केले गेले. शिक्षणाच्या समतेचे दार सर्वांसाठी खुले राहावे, या उद्देशाने सुरू झालेली ही संस्था पुढे बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने आणि अविरत पाठपुराव्याने स्वायत्त इमारतीत स्थापन झाली.
बाबासाहेबांनी काही निधी जनतेकडून उभारला आणि उर्वरित रक्कम तत्कालीन नेहरू सरकारकडून १० लाख रुपये कर्जरूपाने मिळवली. सुमारे १६ लाख रुपये देऊन ‘मॅनकाव’ आणि ‘अल्बर्ट’ या दोन इमारती विकत घेण्यात आल्या. त्यानंतर त्यांचे अनुक्रमे ‘बुद्ध भवन’ आणि ‘आनंद भवन’ असे नामकरण करण्यात आले. या ऐतिहासिक इमारती आजही अभिमानाने उभ्या आहेत आणि सिद्धार्थ महाविद्यालयाच्या शिक्षणप्रकाशाचे केंद्रस्थान आहेत. या संपूर्ण प्रक्रिया आणि पुनर्बांधणी उपक्रमात ’पीपल्स एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष यांचे मोलाचे मार्गदर्शन आजही संस्थेस बळ देत आहे.

सिद्धार्थ महाविद्यालयातील ग्रंथालय हा बाबासाहेबांच्या पाऊलखुणांचा जिवंत पुरावा आहे. बाबासाहेबांच्या वैयक्तिक संग्रहातील अनेक दुर्मिळ ग्रंथ येथे जतन केलेले आहेत. संविधानाची मूळ प्रत, संविधानसभेचे संवादखंड, ‘गॉस्पेल ऑफ बुद्धा’, बाबासाहेबांचे गुरू यांच्या मूळ लिखाणाचे ग्रंथ, फ्रेंच राज्यक्रांतीचे विचारवंत यांची पुस्तके, जागतिक नेत्यांची आत्मचरित्रे, पाली भाषेतील त्रिपिटक, तसेच वेद-उपनिषदांसह संस्कृत साहित्याचा महत्त्वाचा साठा असा अनमोल ठेवा येथे उपलब्ध आहे. ‘हाऊस ऑफ कॉमन्स’, लंडनच्या ऐतिहासिक चर्चांचे अधिकृत खंडही या ग्रंथालयाची शान वाढवतात.
जगभरातून जमावलेली आणि नंतर राजगृहातून स्वतः बाबासाहेबांनी महाविद्यालयाला दिलेली सुमारे एक लाख ४० हजार पुस्तकांची देणगी ही संस्थेची सर्वात मौल्यवान ओळख आहे. या ग्रंथांवर बाबासाहेबांची स्वहस्ताक्षरी नोंद आजही स्पष्ट दिसते. या समृद्ध ज्ञानसंपदेच्या अभ्यासासाठी दरवर्षी देश-विदेशातून अनेक विद्यार्थी ‘पीएचडी’ संशोधनासाठी येथे भेट देतात. अशाप्रकारे सिद्धार्थ महाविद्यालयाने आपल्या ज्ञानपरंपरेला जिवंत ठेवले आहे.
मात्र, काळाच्या ओघात या सर्व अजेय वारशाची अवस्था चिंताजनक बनली आहे. इमारतीला सव्वाशे वर्षे उलटल्याने तिचा जीर्णोद्धार अत्यावश्यक झाला आहे. अनेक ग्रंथ कालांतराने जर्जर झाले असून, त्यांचे शास्त्रीय संवर्धन न झाल्यास ते नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. बाबासाहेबांचा हा अपूर्व शैक्षणिक वारसा धोयात येऊ नये, अशी तीव्र भावना महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केली आहे.
ही स्थिती पाहता, केंद्र सरकारमधील अनुसूचित जाती-जमातीच्या संसदीय समितीतील ३८ सदस्यांच्या शिष्टमंडळाने महाविद्यालयाला भेट देऊन सखोल पाहणी केली. त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे ‘बाबासाहेब ग्रंथस्मारक’ उभारण्याची औपचारिक मागणी करणारा अहवाल सादर केला. शिक्षण, इतिहास आणि संविधाननिर्मितीशी निगडित या ग्रंथसंपदेचे संरक्षण करणे, हे राष्ट्राचे कर्तव्य असल्याचे मतही समितीने व्यक्त केले.
’पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ आणि महाविद्यालय प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर दि.१४ ऑटोबर २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने ‘पीईएस’ अंतर्गत येणार्या महाविद्यालयांच्या जतनासाठी निधी मंजूर करणारा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल महाविद्यालय व प्राचार्य डॉ. अशोक सुनतकारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. हा निधी लवकरात लवकर वितरीत होऊन ग्रंथालयाचे संवर्धन, इमारतीचा जीर्णोद्धार आणि नवीन शैक्षणिक पायाभूत सुविधा यांची उभारणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
नवीन शिक्षण धोरणाशी सुसंगत आधुनिक विषय, संशोधनपर अभ्यासक्रम आणि प्रगत सुविधांची आवश्यकता तीव्रतेने जाणवत आहे. बाबासाहेबांनी कर्मठ परिश्रमातून उभा केलेला ‘सर्वांसाठी गुणवत्ता शिक्षण’ हा मूलमंत्र पुढे न्यायचा असेल, तर सिद्धार्थ महाविद्यालयाचा वारसा सुदृढ ठेवणे अत्यावश्यक ठरते. येथे साठवलेली ग्रंथसंपदा ही केवळ पुस्तके नसून भारतीय लोकशाहीची, बहुजन पुनर्जागरणाची आणि संविधाननिर्मितीच्या ज्ञानप्रक्रियेची मूळ शिदोरी आहे.
‘महापरिनिर्वाण दिना’च्या निमित्ताने या वारशाचे स्मरण अधिक वेधक ठरते. हा ऐतिहासिक वारसा वाचला, तरच बाबासाहेबांचे ‘शैक्षणिक मिशन’ पुढील पिढ्यांपर्यंत अढळ राहील आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन, समाज आणि संस्था यांनी आता युद्धपातळीवर पावले उचलणे, हिच काळाची गरज आहे.
सिद्धार्थ महाविद्यालयाचा हा ज्ञानवारसा जपणे म्हणजे केवळ एका संस्थेचे दायित्व नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राची जबाबदारी आहे. संविधाननिर्मितीशी संबंधित इतया दुर्मिळ पुस्तकांचा एकत्रित साठा देशात दुर्मिळ आहे. संशोधनासाठी देश-विदेशातून येणारे विद्यार्थी याच संग्रहामुळे लाभ घेतात. त्यामुळे ग्रंथालयाचा जीर्णोद्धार, डिजिटल संरक्षण आणि आधुनिक संशोधन सुविधा उभारणे अत्यावश्यक आहे. बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या शिक्षणमूल्यांचे हेच खरे रक्षण ठरेल.
- अशोक सुनतकरी,
प्राचार्य सिद्धार्थ महाविद्यालय
बाबासाहेबांनी स्वतः जमवलेली ही ग्रंथसंपदा म्हणजे आपल्या लोकशाहीचा जिवंत इतिहास आहे. अनेक ग्रंथांच्या पानांवर त्यांची नोंद, टिपणे आणि विचार आजही स्पष्ट दिसतात; पण कालांतराने या अमूल्य ठेव्याची झीज वेगाने वाढत आहे. शासनाकडून निधी मिळणे ही सकारात्मक बाब असली, तरी संवर्धनाची प्रक्रिया तत्काळ सुरू झाली पाहिजे. कारण, एका ग्रंथाचेही नुकसान म्हणजे संपूर्ण पिढीच्या चिंतनसाखळीचा तुटलेला दुवा आहे.
-विजय मोहिते
प्राध्यापक सिद्धार्थ महाविद्यालय
- सागर देवरे
(सर्व छायाचित्रे : अजिंय सावंत)