गौरवची गौरवगाथा...

    06-Dec-2025
Total Views |
 
Gaurav Mohan
 
जिद्द, सचोटी आणि प्रचंड मेहनत करून सटाणा शहरात आपला व्यवसाय सांभाळून आई-वडिलांची सेवा करणार्‍या गौरव मोहन यांच्याविषयी...
 
पुण्यभूमी नाशिकक्षेत्रातील अनेक गावे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध. त्यापैकीच एक म्हणजे सटाणा तालुका. हा तालुका देशभर प्रसिद्ध आहे, तो येथील एक सरकारी अधिकारीपदावर राहिलेल्या देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या मंदिरामुळे. देव मामलेदारांनी स्वतः निष्काम कर्मयोग साधत, शिस्त, स्वच्छता आणि मेहनत ही त्रिसूत्री सांगितली. जो ही त्रिसूत्री अंगीकारतो, तो विकसित होतो आणि ‘विकसित जीवन हेच प्रभू पूजन‘, हा संदेश त्यांनी सटाणावासीयांना दिला. सत्य संकल्पाचा दाता नारायण असतो. ज्यांचे उद्देश स्वच्छ असतात, जे लोक मेहनती असतात, त्यांना देव नक्कीच मदत करत जातो. याचाच प्रत्यय गौरव यांच्या आयुष्यावर नजर टाकल्यावर येतो.
 
खरं म्हणजे त्यांच्या नावातच गौरव आहे. त्यामुळे त्यांची कामगिरीही गौरवास्पदच ठरलेली दिसते. देवमामलेदारांचा हाच आदर्श घेऊन चार पिढ्यांपासून चहाचा व्यवसाय करत असलेल्या मोहन कुटुंबीयांत गौरव यांचा जन्म झाला. गौरव यांनी ‘आयटीआय’चे शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी प्रयत्न केले; परंतु नोकरीसाठी ते जणू बनलेच नव्हते. काही दिवस नोकरी करून त्यांनी माघारी येऊन आई-वडिलांना मदत करण्याचे ठरवले. पहिल्यांदा त्यांच्या या निर्णयाला आई-वडिलांनीही नकार दिला. मात्र, हिंमत न हारता त्याने आई-वडिलांच्या पारंपरिक व्यवसायात स्वतःला झोकून दिले. पहाटे ५ वाजता उठून इतर गावांतील बाजारासाठी शेव, मुरमुरे, चिवडा बनविण्यास त्यांनी सुरुवात केली.
 
ऊन, वारा, थंडीची तमा न बाळगता, १०० किलोच्या गोण्या बाजारात घेऊन जाणे, दिवसभर बाजार करणे, पुन्हा रात्री उरलेला माल व्यवस्थित घरी आणणे, हिशोब करणे हा त्यांचा नित्यक्रम झाला. ‘कांदा मुळा भाजी॥ अवघी विठाई माझी|‘ या संत श्री सावतामाळींच्या अभंगाप्रमाणे गौरव चिवडा बनवत असताना, त्यांच्यामुखी सदैव महाकालचे जपध्यान असते. त्यामुळेच की काय, त्यांच्या चिवड्याला अतिशय सुंदर चव असते. बाजारात जायचा अवकाश की, लोक वाट बघत थांबलेले असतात. हे सर्व करताना अगदी त्याचीं तरुणाई त्यात मिसळून गेली. दिवसभर काबाडकष्ट करून त्यांचा चिवडा-फरसाणचा उद्योग अतिशय मोठ्या प्रमाणात सुरू केला. गावातील बाजार असो किंवा परगावातील बाजार असो, मुल्हेरची यात्रा असो किंवा देवीच्या गडाची यात्रा असो, एकही दिवस सुट्टी न घेता त्यांनी दुकान सांभाळले.
 
कशाचीही भीती न बाळगता ते बाजारात व यात्रेत अतिशय उत्कृष्टपणे दुकान सांभाळतात. आरामाची सुटी तर प्रत्येकाला हवी असते; पण त्यांच्या नजरेत आराम हाच की, दुकानात गेल्यावर ग्राहकांशी संवाद साधताना जो आनंद मिळतो, तो आरामापेक्षाही मोठा असतो, असे त्यांचे स्पष्ट मत. आरामाबद्दल गौरव यांना विचारले असता, ते म्हणतात की, "माऊली, आराम हा शत्रू आहे. आराम हा शरीराने कधीच नसतो. तो तर मनाने असतो. मी ज्यावेळी लोकांमध्ये असतो, तेव्हा त्यांचे कौतुकच माझ्यासाठी आराम आहे.” याच आशीर्वादाने ते रोज त्यांची दिनचर्या सांभाळतात. आजकालची तरुणाई वेगळ्याच धुंदीत असते; पण गौरव यांच्यासारखे तरुण ‘पुंडलिका’सारखे आई-वडिलांना मदत करत असतात. असेच एकेदिवशी त्यांना मसाला दूध व्यवसायाची कल्पना सुचली.
 
१९५५ सालापासून मोहन कुटुंबीय ‘मोहन टी हाऊस’ या नावाने पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. पंजोबांचा वारसा लक्षात घेऊन गौरव यांनी सहा वर्षांपूर्वी दूध-व्यवसायात उडी घेतली. सुरुवातीला मसाला दूध विक्री करण्यासाठी कढई व भांडी त्यांनी उसनवारीने घेतले. पहिल्या वर्षाची कमाई लक्षात घेऊन दुसर्‍या वर्षी स्वतःची भांडी विकत घेतली. तिसर्‍या वर्षी पुन्हा हिंमत करून प्रतिदिवस १०० लीटरपर्यंत दूध व्यवसाय वाढवला. तीन लीटर दुधापासून सुरुवात केलेला व्यवसाय आता ४०० लीटर प्रतिदिवस इतका प्रचंड वाढला. प्रत्येकाशी सौजन्याने बोलणे, ‘माऊली’ म्हणून हाक मारणे, पहाटे पाच वाजल्यापासून चिवडे बनवायचे आणि रात्री आठ वाजेपासून मसाला दूध विकायचे, असा गौरव यांचा दिनक्रम आहे. जेथे तरुणाई मद्याच्या आहारी गेलेली दिसते, तेथे सटाण्यात गौरव यांच्याकडे दूध प्यायला गर्दी झालेली असते. जशी चिवड्याला चव, तशीच त्यांच्या दुधालाही अप्रतिम चव आहे. त्यामुळेच लोक इतकी गर्दी करतात. त्यांच्या मदतीला मित्रपरिवारही असतो. व्यवसाय करत असताना अगदी शांत-समाधानाने हसत सर्व व्यवहार सुरू असतात. दिवसभराची सगळी कमाई गौरव त्यांच्या आईकडे सुपूर्द करतात.
 
आज गौरव तरुणांसाठी आदर्श ठरत आहे. बहुतेक तरुण पारंपरिकवडिलोपार्जित व्यवसाय नाकारतात. वडिलांच्या हाताखाली काम करणे त्यांना आवडत नाही. काहींना तर त्याची लाज वाटते. काय व्यवसाय करावा, या विवंचनेत त्यांचे आयुष्य वाया घालवतात; परंतु गौरव वेगळी वाट निवडून पारंपरिक व्यवसायात आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम व्यवसाय चालवत आहे. मेहनत व चिकाटी करण्याची धमक असेल आणि आई-वडिलांचे आशीर्वाद पाठीशी असतील, तर कितीही मोठा अडथळा आपण पार करू शकतो, असे गौरव यांचे म्हणणे. त्याच हिमतीने त्यांचे कार्य सुरू आहे. त्यात देव मामलेदारांचाही आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. गौरव यांच्या मेहनतीचा आणि यशस्वी जीवनाचा आदर्श इतरही तरुणांनी घ्यावा, असाच आहे. भविष्यात व्यवसायात उत्तम प्रगती साधावी, असे त्याला वाटते. गौरव यांच्या मेहनतीला आणि कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत‘कडून शुभेच्छा.
- विराम गांगुर्डे