राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ‘भारतरत्न’ डॉक्टर आंबेडकर

    06-Dec-2025
Total Views |
Dr. Babasaheb Ambedkar
 
आजही काही समाजद्वेष्ट्यांकडून रा. स्व. संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधांवरुन विचारभ्रम निर्मितीचे काम सुरु असते. पण, वास्तवात संघ संस्थापक डॉ. हेडगेवार आणि डॉ. आंबेडकर यांनी निवडलेले मार्ग जरी वेगळे असले तरी, राष्ट्रीय एकता आणि समरसतेसाठी दोघांचेही योगदान अनन्यसाधारण असेच. आज डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संघ-आंबेडकर संबंधांबरोबरच, दोन्हींच्या विचारांतील साधर्म्याचे चिंतन करणारा हा लेख...
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. हिंदू समाज हा देशाचा राष्ट्रीय कणा असून एकात्म, शोषणविरहित व समतायुक्त समाजनिर्मिती हे संघाचे प्रारंभापासून ध्येय राहिले. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी दैनंदिन शाखेच्या स्वरूपात संघटन बांधण्याची अभिनव पद्धती अवलंबिली. जातिभेदरहित व वर्णभेदरहित सामाजिक समतायुक्त समाजाचे एक छोटेसे मॉडेल निर्माण केले. ‘भारतरत्न’ डॉटर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ सुरू केली, तिचेही अंतिम गंतव्य समाजातील अस्पृश्यतेचे निर्मूलन होऊन त्यास एकात्म बनविणे हे होते. डॉ. आंबेडकरांना रा. स्व. संघाची पूर्ण माहिती होती.
 
रा. स्व. संघ ही हिंदू संघटनेचे कार्य करणारी अखिल भारतीय संघटना आहे; परंतु हिंदू महासभा व हिंदू संघटन करणार्‍या संस्था व संघामध्ये फरक आहे, याची पुरेपूर जाणीव बाबासाहेबांना होती. सर्व हिंदूंचे संघटन व्हावे, असे हिंदू महासभेचे नेते त्यावेळी म्हणत; परंतु भाई परमानंद, लाला लजपतराय, स्वा. सावरकर यांचे अपवाद वगळले, तर हिंदू महासभेच्या अन्य मंडळींना चातुर्वर्ण्य व जातिभेद नष्ट न करता ही एकी व्हावी, असे वाटे. त्यामुळे हिंदू महासभेच्या नेत्यांविषयी बाबासाहेबांच्या मनात नाराजी होती.
रा. स्व. संघ आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न येथे काही मंडळींनी केले. रा. स्व. संघाचे उगमस्थान नागपूर असल्यामुळे बाबासाहेबांनी धर्मांतराच्या दीक्षाविधीसाठी मुद्दाम नागपूरची निवड केली, असा अपप्रचार या मंडळींनी केला; परंतु बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवर केलेल्या भाषणात त्याचे खंडन केले व बौद्ध धर्मप्रसाराचा ‘नाग’ लोकांशी असलेला संबंध व नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी नाग नदी आणि त्यावरून पडलेले नागपूर नाव, यामुळे हे स्थान निवडल्याचे बाबासाहेबांनी स्पष्ट केले.
 
संघाचे ज्येष्ठ प्रचारक स्व. दत्तोपंत ठेंगडी, मोरोपंत पिंगळे, मिलिंद महाविद्यालयातील संघ-कार्यकर्ते प्रा. ठकार यांसारख्यांचा बाबासाहेबांशी नित्य संपर्क असे. बाबासाहेबांनी १९३५ व पुढे १९३९ मध्ये पुणे येथील संघाच्या संघ शिक्षावर्गांस भेट दिली. त्यावेळी डॉ. हेडगेवार यांची भेटही झाली होती. १९५४ मध्ये बाबासाहेबांनी भंडारा येथून लोकसभेची निवडणूक लढविली. या निवडणुकीत संघ-स्वयंसेवकांनी बाबासाहेबांचा प्रचार केला होता. धर्मांतरापूर्वी दत्तोपंत ठेंगडी डॉ. आंबेडकरांना भेटले व त्यांनी संघाच्या कार्याविषयी त्यांच्याशी चर्चा केली होती. बाबासाहेब ठेंगडींना तेव्हा म्हणाले, "१९२५ साली तुमचा संघ निघाला व आज तुमची संख्या २७-२८ लाख धरून चालू; परंतु एवढ्या लोकांना एकत्र आणायला तुम्हाला २५ ते ३० वर्षे लागली. तर या हिशेबाने सगळ्या समाजाला एकत्र करायला तुम्हाला किती वर्षे लागतील? ‘एक बेडूक कितीही फुगला, तरी त्याचा बैल होणार नाही’, याला बरीच वर्षे लागतील. तोपर्यंत परिस्थिती वाट पाहणार आहे काय?
 
मी जाण्यापूर्वी माझ्या समाजाला काहीतरी निश्चित दिशा द्यावयास पाहिजे, नाहीतर हा शोषित व पीडित समाज ‘साम्यवादा’च्या आहारी जाईल. ‘शेड्युल्ड कास्ट समाज’ साम्यवादाकडे वळावा असे मला वाटत नाही, म्हणून त्यांना निश्चित दिशा दाखवणे हे राष्ट्राच्या दृष्टीने मला आवश्यक वाटते. तुम्ही संघवाले राष्ट्राच्या दृष्टीने प्रयत्न करता; पण एक लक्षात ठेव, Between scheduled castes and communism Ambedkar is the barrier and between caste hindus and communism Golwalkar is the barrier. मी जाण्यापूर्वी त्यांना दिशा देऊ शकलो नाही, तर साम्यवादाकडे जाणारा एक मोठा वर्ग तयार होईल आणि त्यांना पुन्हा आपल्या राष्ट्रीय प्रवाहात समाविष्ट करून घेणे तुम्हा लोकांना जमावयाचे नाही.” (सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉ. आंबेडकर-लेखक द. बा. ठेंगडी, प्रकाशक : भारतीय श्रमशोध मंडळ, २००४, पृष्ठ ११६-११७).
 
अमानुष अन्यायाचे शिकार झाल्यानंतरही बाबासाहेबांनी राष्ट्राचे हित कायम जपले. हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान आणि हिंदूंचा विपरीत व्यवहार यावर बाबासाहेबांचा मुख्य आक्षेप होता. स्वामी विवेकानंद हिंदू समाजाविषयी एकदा म्हणाले, "एवढे उदात्त तत्त्वज्ञान असलेला समाज जगात कुठेही नाही व आपल्याच समाजबांधवांना एवढी अमानुष वागणूक देणारा नीच समाजही जगाच्या पाठीवर सापडणार नाही.” विवेकानंदांप्रमाणे डॉ. आंबेडकरांना हिंदू समाजाचे श्रेष्ठ तत्त्वज्ञान व वर्तनातील विदारक फरक हा व्यथित करत असे. अस्पृश्यांना राजकीय, सामाजिक व मानवी हक्कांचे भान निर्माण झाले असून, त्यासाठी प्रबोधन, संघटन व आवश्यक संघर्ष करण्याची बाबासाहेबांनी इच्छा व्यक्त केली होती; परंतु असे असूनही आपण हिंदू समाजाचे एक अविभाज्य अंग आहोत, ही बाबासाहेबांची प्रारंभी अनेक वर्षे भूमिका होती.
 
अस्पृश्यता निवारणाचे कार्य म्हणजे हिंदू समाज एकात्म व समर्थ करण्याचे कार्य आहे व त्यामुळेच हे राष्ट्रीय कार्य आहे, ही त्यांची धारणा होती. पुणे करारानंतर ठक्कर बाप्पांना त्यांनी अस्पृश्यता निवारक संघाच्या संदर्भात पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, "यास्तव हिंदू समाज समर्थ करावयाचा असेल, तर चातुर्वर्ण्य व असमानता याचे उच्चाटन करून हिंदू समाजाची रचना एकवर्णत्व व समता या दोन तत्त्वांच्या पायावर उभी केली पाहिजे. अस्पृश्यता निवारणाचा मार्ग हा हिंदू समाज समर्थ करण्याच्या मार्गापासून भिन्न नाही.” बाबासाहेबांचे म्हणणे होते की, "जोपर्यंत जाती आहेत, तोपर्यंत हिंदू धर्म हा मिशनरी धर्म होऊ शकत नाही. जोपर्यंत जाती आहेत, तोपर्यंत संघटन अशय आहे व जोपर्यंत संघटन होत नाही, तोपर्यंत हिंदू समाज दुर्बल व अवनत राहील.”
 
समाजाचे विघटन जातिभेदावर आधारित होता कामा नये, हे बाबासाहेबांचे प्रतिपादन असे. मात्र, सवर्णांकडून अपेक्षित असे समर्थन न मिळाल्यामुळे बाबासाहेबांना सरकार व उच्चवर्णीयांविरुद्ध दलित समाजास संविधानिक संघर्षासाठी सिद्ध करावे लागले; परंतु बाबासाहेबांनी राष्ट्रीय एकात्मतेची तडजोड होऊ दिली नाही. डॉटर आंबेडकर आणि डॉटर हेडगेवार यांची ‘धर्म’ या संकल्पनेविषयी समान धारणा होती. डॉ. हेडगेवार यांनी कर्मकांडासारख्या गोष्टी दूर ठेवल्या. रूढीवाद व दैववादाने ग्रासलेल्या धर्मास हेडगेवार यांना मुक्त करायचे होते आणि संघ शाखेच्या कार्यपद्धतीतून खर्‍या धर्माचे आचरण करणार्‍या व्यक्ती उभ्या करायच्या होत्या. बाबासाहेबांनाही कृतिप्रवण व विषमतेस थारा न देणारा धर्म अपेक्षित होता.
 
त्यांचे अधिष्ठान धर्म होते. डॉ. हेडगेवार यांनी सामाजिक परिवर्तनासाठी संघर्षाचा मार्ग स्वीकारला नाही, तर व्यक्ती-व्यक्तींवर संस्कार करण्याचा मार्ग निवडला. एकत्र येऊन व्यक्तीच्या मनातील संकुचित भाव दूर करून सर्व हिंदू एक असल्याची त्यांनी स्वयंसेवकांना अनुभूती दिली. बाबासाहेबांनी दलितांच्या सामाजिक न्याय व समतेसाठी संघर्ष केला; परंतु दलित समाजात पृथकतेची भावना निर्माण होणार नाही, याचीही नेहमी काळजी घेतली. धर्मांतराचा निर्णय घेतल्यानंतरही हिंदूंनी एकजीव होणे, दोषनिर्मूलन करून अंतर्गत सामर्थ्य वाढविणे, संरक्षणासाठी सामर्थ्य वाढविणे या गोष्टींचा हितोपदेश बाबासाहेबांनी हिंदूंना केला. हिंदू संघटन हे राष्ट्रीयकार्य आहे, असे त्यांनी धर्मांतराच्या घोषणेनंतरही म्हटले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक प्रा. शेषराव मोरे यांनी आपल्या पुस्तकात केले आहे. (डॉ. आंबेडकर : सामाजिक धोरण-एक अभ्यास) डॉ. आंबेडकर व डॉ. हेडगेवार यांना सामाजिक समरसतेत सामाजिक समतेची हमी अभिप्रेत होती. एकात्म हिंदू समाजासाठी अस्पृश्यता निर्मूलनाचे काम करणे ही सवर्ण समाजाची जबाबदारी आहे, असे बाबासाहेब म्हणत. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनीही, "अस्पृश्यता हा सवर्णांच्या मनातील संकुचित भाव असून तो काढून टाकला, तर अस्पृश्यता जाईल,” असे म्हटले होते. बाळासाहेब देवरस यांनी १९७४ मध्ये ‘वसंत व्याख्यानमाले’त ‘सामाजिक समता व हिंदू संघटन’ या विषयावर बोलताना संघाची एकात्म समाजनिर्मितीची भूमिका विशद केली होती. डॉ. हेडगेवार व डॉ. आंबेडकर या दोघांच्या कार्यपद्धती भिन्न होत्या; पण दोघांची दिशा मात्र एकच होती.
 
डॉ. हेडगेवार यांनी संघाच्या कार्यपद्धतीतून सामाजिक समरसतेचे पालन करणारे लक्षावधी स्वयंसेवक निर्माण केले. डॉ. आंबेडकर यांनीही आपल्या कर्तृत्वाने लक्षावधी दलितांच्या मनातील अस्पृश्यता व न्यूनगंडाची भावना घालवून त्यांना सन्मान मिळवून दिला. राष्ट्रीय एकता व समरसता या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा या दोन थोर व्यक्तींचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते.
 
 - रवींद्र साठे
(लेखक सभापती (राज्यमंत्री दर्जा) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आहेत.)