भारतीयत्व, आर्य आक्रमण सिद्धान्त आणि डॉ. आंबेडकर!

    06-Dec-2025   
Total Views |

Dr. Babasaheb Ambedkar
 
संविधानाच्या निर्मितीतून बाबासाहेबांनी भारतीयत्वाचा पुरस्कार केला, भारतीय मूल्यांचे संवर्धन केले आणि एकात्म भारतीयत्वाचा पाया रचला. ज्यात त्यांनी स्पष्ट केले होते की, आर्य बाहेरून आलेले नव्हते. भारतीयांच्या एकात्मतेचा संकल्प मांडणार्‍या आणि सिद्ध करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘आम्ही सर्व भारतीय ऋणी आहोत, आर्य बाहेरून आले नाहीत,’ या सत्य संकल्पनेचा आणि वास्तवाचा आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने या लेखात घेतलेला हा मागोवा...
 
उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत, तसेच जातीभेद करत उच्चवर्णीय आणि तथाकथित सामाजिक मागासवर्गीय गट यांच्यात भेद करताना, आर्य आणि अनार्य, आर्य-द्रविड, आर्य-मूलनिवासी वगैरे वगैरे बद्दलची अशी विधाने आजही सर्रास ऐकू येतात. भारतीय लोक हे भिन्न वंशीय असून, दोन गटात विभागले आहेत, ही काही समाजविघातक लोकांची आवडती संकल्पना. विशेष म्हणजे, यातले काही लोक क्रांतिकारी ‘जय भीम...’ म्हणण्याचे अगदी नाटकही करतात; पण त्यांचे बाबासाहेबांवरचे प्रेम खोटे आहे. त्यांच्या अंतरंगात मार्क्स आणि अतिखोल मनात माओच दडलेला असतो. जे बाबासाहेब कधी बोललेच नाहीत, ते बाबासाहेबांच्या नावावर अशा या समाजविघातक शक्ती खपवत असतात. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आर्य बाहेरून आले आणि त्यांनी भारतातील मूलनिवासी किंवा द्रविडांवर अत्याचार करत राज्य केले, हा सिद्धान्त पुराव्यानिशी फेटाळला. भारतातील सर्व समाज भारतीय म्हणून एकाच वंशाचे आहेत, हे बाबासाहेबांनी प्रचंड संशोधनाद्वारे सिद्ध केले. त्यांनी ‘हू वेअर शुद्राज‘, ‘शुद्र पूर्वी कोण होते’ या पुस्तकात ‘आर्य सिद्धान्ता’ला चांगलीच चपराक दिली.
 
बाबासाहेब स्पष्ट लिहितात की, "वेदावरून असे कुठेही सिद्ध होत नाही की, आर्यांनी बाहेरून येऊन दास अथवा दस्युंवर विजय मिळवला. ‘आर्य’, ‘दास’, ‘दस्यु’ हे वेगवेगळ्या जातींचे होते, असे सिद्ध करणारा एकही पुरावा वेदांमध्ये नाही. आर्यांचा रंग दास किंवा दस्युंपेक्षा वेगळा होता, असे सिद्ध करणारा एकही पुरावा वेदांमध्ये नाही. ऋग्वेदात एकही उल्लेख नाही, ज्यातून सिद्ध होईल की, आर्य बाहेरून आले. उलट, त्यातून आर्य भारताचेच रहिवासी असल्याचे सिद्ध होते.” पुढे बाबासाहेब म्हणतात की, वेदांमध्ये सात नद्यांची वर्णने आहेत. त्यात ‘माझी गंगा’, ‘माझी यमुना’, माझी सरस्वती’, असे शब्दप्रयोग आहेत. आर्य जर बाहेरून आलेले असते, तर असे म्हणाले नसते.”
 
मात्र, तरीही काही समाजविघातक शक्ती भारतात वांशिक, प्रांतिक आणि भाषिक भेद करण्यासाठी आर्य बाहेरून आले, ते या देशाचेच नाहीत; मूलनिवासी किंवा द्रविड हेच या देशाचे मूळ नागरिक आहेत वगैरे वगैरे म्हणत, समाजात फूट पाडत असतात. त्यासाठी ते ब्रिटिश अभ्यासक प्रिचर्ड याच्या ‘नॅचरल हिस्ट्री ऑफ मॅन’ या ग्रंथाचा दाखला देतात. जर्मन संशोधक क्रिसिम लासेन ‘आर्य व द्रविड-वंशभेदा’ची संकल्पना सांगतात. ब्रिटिश डॉक्टर नॉर्मन चीव्हर्स याने भारतातील आर्य आणि इथल्या आदिवासी जमातींमध्ये वांशिकदृष्ट्या भेद असल्याचे मत मांडल्याचे सांगतात. या विदेशी लोकांची मते ते अशा आवेशात मांडतात, जणू काही हे विदेशी लोक त्यांचे बापजादाच आहेत. इंग्रज तर गेले, आपण स्वतंत्र तर झालोच; पण आर्य-अनार्य, आर्य-द्रविड आणि उच्चवर्णीय-मागासवर्गीय असा समाजात विद्वेष माजवणारे त्यांचे हस्तक आजही भारतात थोड्याफार प्रमाणात आहेत.
 
ते सिंधू संस्कृतीचा विनाश आर्यांनी केला, असेही बरळत असतात. नशीब, २०१९-२०च्या दरम्यान डेक्कन कॉलेज, हार्वर्ड मेडिकल स्कूल, बिरबल सहानी इन्स्टिट्यूट, सीसीएमबी, कॅलिफोर्निया विद्यापीठ अशा जगभरातील १३ प्रख्यात संशोधन संस्थांनी आर्य आणि भारतीयांबद्दलचे संशोधन पूर्ण केले. २८ शास्त्रज्ञांनी तीन वर्षे अथक प्रयत्न करून हरियाणातील राखीगडी इथे सापडलेल्या मानवी सांगाड्यांमधून यशस्वीरीत्या ‘डीएनए’ मिळवला. तेव्हाच्या माणसांच्या जनुकीय रचनेचा अभ्यास करून जगभरातील हे सर्व शास्त्रज्ञ या निष्कर्षावर आले आहेत की, "भारतात कोणीही बाहेरून आलेले नाही, तर भारतातील लोक अगदी प्राचीन काळापासून इथेच राहत असून, सिंधू संस्कृतीतील माणसे आपलेच पूर्वज आहेत.” या संशोधनामुळे आर्य कुठूनतरी बाहेरून आले होते, हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा इतिहास मोडीत निघाला आहे. या संशोधनाद्वारे संशोधकांनी भारतीय संस्कृतीच्या प्राचीनत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. प्राचीन भारतीय संस्कृती रूजवणारे आर्य हे भारतीयच असून, ते भारताबाहेरून आलेले नव्हते, असे संशोधनाअंती सिद्ध करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे.
 
त्यांचे संशोधन आणि निष्कर्ष महत्त्वाचे, अनमोल आहेत; पण या सगळ्या परिक्षेपात आर्य बाहेरून आलेले नाहीत, असे ठामपणे स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता, द्रष्टेपणाची थोरवी अगाध आहे, याची प्रचिती येते.
कारण, बाबासाहेबांनी ज्यावेळी आर्य बाहेरून आलेलेच नाहीत, हे प्रमाण देत म्हटले, त्यावेळी त्यांनी विदेशी विद्वत्तेने लादलेल्या कटकारस्थाला उलथून लावले. बाबासाहेबांनी मांडलेल्या या सिद्धान्ताला भारतीय इतिहासात महत्त्व आहे. कारण, इंग्रजांनी भारतीय कधी एक होऊच नयेत, यासाठी लबाडीने आणि क्रूरपणे कारस्थान रचले होतेे. दुर्दैवाने त्याचे पडसाद आजही भारतीयांना भोगावे लागत आहेत, तर काही शतकांपूर्वी इंग्रजांनी भारतात पाय तर रोवले; पण काही वर्षांतच त्यांना जाणवले की, हिंदुस्थानात विविध राजसत्ता आहेत. लोकांच्या भाषा मैलोगणिक बदलतात. खानपान, केशभूषा, वेशभूषा, राहणीमान बदलते. मात्र, तरीही यांना एकत्र बांधून ठेवणारे आहे; ते म्हणजे त्यांच्या अंतरंगातला बंधुभाव, त्यांचा धर्म आणि त्यांची संस्कृती. इंग्रजांचा अंदाज खराच होता. कारण, पुढे १८५८ साली भारतीयांनी जातपात, भाषा, प्रांत विसरून एकत्रितपणे इंग्रजांविरोधात लढा दिला. या एकत्र आलेल्या लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी या भारतीयांचा इतिहासच तोडून-मोडून सांगायला हवा, हे इंग्रजांनी ओळखले. त्यातूनच मग समाजात भेद कसा पाडता येईल, याचे कटकारस्थान त्यांनी सुरू केले. याचे मोठे उदाहरण म्हणजे जॉन विल्सन याने १८५८ मध्ये ‘इंडिया थ्री थाऊसंड इयर्स अगो’ हा ग्रंथ लिहिला.
 
या ग्रंथात त्याने भारतीय आदिवासी अनार्यवंशीय आहेत, हे जाहीर केले. देशातील उच्चवर्णीयांचा समाजावर पगडा आहे, हे त्याला माहिती होते. त्यामुळे ते इंग्रजांच्या सोबत यावे, यासाठी त्याने या ग्रथांत लिहिले की, "आर्यन्स आणि आपण स्वाभाविकपणेच एका मानववंशाचे आहोत, त्यामुळे परस्परांचे बांधव आहोत.” त्यानंतर मोहेंजोदडो येथील उत्खननात छिन्न-भिन्न व विखुरलेल्या अवस्थेत सापडलेल्या मानवी सांगाड्यांवरून स्टअर्ट पिगॉट व सर मॉर्टिमर व्हीलर यांनी आर्य आक्रमणामुळे सिंधू संस्कृतीचा विनाश झाल्याचा निष्कर्ष काढला. अर्थात, हे सगळे भारतीय समाजाची विभागणी करण्यासाठीचा खटाटोप होता. १८८४ मध्ये मॅक्समुल्लरने युरोपमध्ये म्हटले होते की, "राजा राममोहन रॉय यांनी इंग्लंडला भेट दिली, ती घटना म्हणजे प्राचीन काळात विभक्त झालेल्या आर्यवंशाच्या दोन महान शाखांची पुनर्भेटच होती.” विल्सन आणि मॅक्समुल्लर यांनी उच्चवर्णीय हे आमच्यासारखे श्रेष्ठ वंशाचे आहेत, असे मुद्दाम प्रदर्शित केले. कारण, त्यांना देशातील परस्पर सहयोगाने जगणार्‍या समाजाचे तुकडे पाडायचे होते. दोन समाजगटात विद्वेष पसरवायचा होता. त्यांचे ते विघातक विषारी काम त्यांनी पुढेही सुरूच ठेवले.
 
या सगळ्या परिक्षेपात आर्य बाहेरून आलेलेच नाहीत, सगळे भारतीय एका वंशाचे आहेत, असे ठामपणे मत मांडत इंग्रजांच्या कारस्थानाला उघडे पाडण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. तो काळ असा होता की, इंग्रज त्यांची सत्ता गुंडाळून त्यांच्या देशात परतत होते. देशाला स्वातंत्र्य मिळत होते; पण काही संस्थाने देशात विलीन होण्यास का-कू करत होती. अशातच मुस्लिमांचा वेगळा देश म्हणून ‘पाकिस्तान’ निर्माण होत होता. इंग्रजांनी आणि समाजविघातक शक्तींनी समाजात आर्य-अनार्य द्वेषाचे बी पेरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. कदाचित, यातून त्यांना भारताचे आणखीन काही तुकडे करायचा विचार असेल; पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आर्य-अनार्य सिद्धान्तच खोडून टाकला. ते विद्वेषाचे बीज रूजू नये यासाठी स्पष्ट म्हटले की, आर्य बाहेरून आलेले नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या द्रष्ट्या विचारांनी देशाची एकता, अखंडता अबाधित आहे. आर्य कधीच बाहेरून आलेले नव्हते. ‘आम्ही सगळे भारतीय एकच आहोत,’ हा एकतेचा मंत्र समाजात रूजवणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या ‘महापरिनिर्वाणदिनी‘ विनम्र अभिवादन!
 
आर्य बाहेरून आलेले नाहीत, ते मूळचे भारतातलेच आहेत, हे सांगताना बाबासाहेब म्हणतात- :
 
१) आर्य भारतात बाहेरून आले आहेत, हा सिद्धान्त सापाला ठेचल्याप्रमाणे ठेचून मारला पाहिजे.
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १९४६. (‘हू वेअर द शुद्राज?’, ‘डॉ. आंबेडकर रायटिंग अ‍ॅण्ड स्पीचेस’, खंड ७, प्रकरण- ५, पृष्ठ क्र. ८६).
 
२) आर्यन वंश सिद्धान्त हा इतका बिनबुडाचा व मूर्खपणाचा आहे की, या सिद्धान्ताचा फार पूर्वीच मृत्यू व्हायला पाहिजे होता.
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर,१९४६, ‘हू वेअर द शुद्राज?’ पृष्ठ क्र.- ८०)
 
३) बाहेरून आर्यांनी भारतावर आक्रमण केल्याचा कणाइतकाही पुरावा ऋग्वेदामध्ये सापडत नाही. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १९४६, ‘हू वेअर द शुद्राज?’ पृष्ठ क्र.-७४)
 
४) पाश्चिमात्यांनी उभा केलेला हा आर्य वंश सिद्धान्त प्रत्येक पातळीवर पराभूत होतो, हे निर्विवाद सत्य आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर,१९४६, ‘हू वेअर द शुद्राज?’ पृष्ठ क्र. - ७८)
 
५) आर्य वंश सिद्धान्ताचे प्रसारक इतके उतावीळ आहेत की, त्यांच्या हे लक्षातच येत नाही की, त्यामुळे ते मूर्खांच्या नंदनवनात जाऊन पोहोचतात. त्यांना काय सिद्ध करायचे आहे हे त्यांनी आधीच ठरविले असून, त्याप्रमाणे त्यांच्या सोयीने ते वेदांमधून पुरावे शोधत बसतात. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १९४६, (‘हू वेअर द शुद्राज?’ पृष्ठ क्र. - ८०)
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.