ब्राह्मण सेवा मंडळाचा २०२५ चा 'ब्रह्मभूषण’ पुरस्कार सुमित्राताई महाजन यांना जाहीर

डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत पार पडणार सन्मान सोहळा

    05-Dec-2025   
Total Views |

Brahmabhushan Award 2025

मुंबई : ( Brahmabhushan Award 2025 ) दादर पश्चिम येथील ब्राह्मण सेवा मंडळाच्या माध्यमातून इंदूरच्या माजी खासदार, २०१४ ते २०१९ या कालावधीत लोकसभेचे अध्यक्षपद अत्यंत कुशलतेने व यशस्वीपणे सांभाळणाऱ्या व त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविलेल्या श्रीमती. सुमित्राताई महाजन यांना २०२५ च्या 'ब्रह्मभूषण' या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्यास माजी खासदार व भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष श्री. विनयजी सहस्त्रबुद्धे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बुधवार दि. १० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता भवानी शंकर रोड, दादर, मुंबई पश्चिम येथील ब्राह्मण सेवा मंडळाच्या तळमजल्यावरील सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
 
ब्राह्मण सेवा मंडळ या संस्थेने २०१६ या शतकमहोत्सवी वर्षापासून समाज जीवनाशी निगडित विविध क्षेत्रांपैकी दरवर्षी एक क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्ञातीतील मान्यवर व्यक्तींपैकी एकाचा 'ब्रह्मभूषण’ पुरस्कार देऊन गौरव करण्यास सुरुवात केली. २०१६ साली 'ब्राह्मण सेवा मंडळा'ने प्रथम 'ब्रह्मभूषण पुरस्कार' इतिहासकार आणि महाराष्ट्र भूषण मा. कै. श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना प्रदान केला. त्यानंतर २०१७ सालचा हा पुरस्कार भारतीय सेनेत कार्यरत असलेले लेफ्ट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर यांना प्रदान केला गेला होता.
 
२०१८ साली जेष्ठ वैद्यकीय आणि न्युक्लिअर मेडीसीन व न्युक्लिअर कार्डीओलॉजीचे भारतातील प्रणेते कै. डॉ. रामचंद्र दत्तात्रय लेले यांना प्रदान केला. तर २०१९ साली खगोल भौतिकशास्त्रज्ञ कै. डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांना प्रदान करण्यात आला. सबळ समाज रचनेसाठी सामाजिक जाणिवांचे भान असलेल्या संस्थांचे महत्वाचे योगदान असते. दादर पश्चिम येथील भवानी शंकर रोडवरील प्रतिष्ठित ब्राह्मण सेवा मंडळ, ही मुंबईतील दादरस्थित १०९ वर्षे जुनी संस्था सुरवातीपासूनच ज्ञाती आणि समग्र समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विविध उपक्रमांच्या माध्यमातून मंडळ कार्यरत आहे.
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.