मुंबई : ( Goregaon College Bans Burkha-Niqab ) मुंबईच्या गोरेगाव येथील विवेक ज्युनिअर कॉलेजमध्ये वस्त्रसंहिता लागू केल्याने काही विशिष्ट धर्मियांना पोटशूळ उठले आहे. कॉलेजकडून जारी केलेल्या आचारसंहितेत स्पष्ट लिहिले आहे की, विद्यार्थिनी बुरखा-नकाब घालून वर्गात येऊ शकत नाहीत, तसेच विद्यार्थ्यांसाठी टोपी आणि कुर्ता-पायजामा घालण्यासही बंदी असेल. कोणतेही योग्य भारतीय किंवा पाश्चात्त्य पोशाख परवानगीयोग्य आहेत; परंतु धर्म दर्शवणारे किंवा सांस्कृतिक विषमता दाखवणारे कपडे निषिद्ध आहेत.
कॉलेजचे म्हणणे आहे की, हा नियम शिस्त राखण्यासाठी आणि ओळख लपवून होणारी चीटिंग थांबवण्यासाठी लागू करण्यात आला आहे. कॉलेजच्या या निर्णयावर मात्र विशिष्ट धर्माच्या विद्यार्थ्यांना पोटशूळ उठल्याचे दिसतेय. मिळालेल्या माहितीनुसार, ‘हिजाब’ आणि ‘हेडस्कार्फ’ला परवानगी आहे, परंतु चेहरा झाकणारा बुरखा-नकाब बंदीच्या यादीत टाकण्यात आला आहे. याप्रकरणी निषेध करणार्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद आणखी चिघळला; ज्या व्हिडिओमध्ये बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींना कॉलेजच्या गेटवर थांबवले जात असल्याचे दिसत आहे. एआयएमआयएम महिला विभागाच्या नेत्या जहानारा शेख देखील विद्यार्थ्यांच्या समर्थनात उभ्या आहेत. त्यांचा आरोप आहे की हा निर्णय धार्मिक स्वातंत्र्यावर बंधन आणणारा आहे.
निर्णय सुरक्षेच्या कारणास्तव
विद्यार्थ्यांच्या धार्मिक भावनांचा आदर राखूनच ‘हिजाब’ आणि ‘हेडस्कार्फ’ला परवानगी आहे. आजकालची परिस्थिती पाहता, सुरक्षिततेच्या दृष्टीने चेहरा झाकणारा बुरखा-नकाबबंदी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. त्यामुळे विरोधकांनी फक्त धार्मिक बंड करण्यासाठी मुद्दे उकरून काढणे चुकीचे आहे. सुरक्षेच्या कारणास्तव विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाचा स्वीकार करणे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे.
- प्रिया सावंत, प्रांत उपाध्यक्षा, विश्व हिंदू परिषद