सांस्कृतिक निर्वसाहतीकरणाचे आयाम

    31-Dec-2025
Total Views |
Colonialism
 
‌‘वसाहतवाद‌’ या सदराच्या माध्यमातून आपण आजवर निर्वसाहतीकरणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यापैकी सांस्कृतिक निर्वसाहतीकरणाचे चिंतन एकांगी होऊ नये म्हणून, त्याचाही विविध आयामांतून विचार करणे क्रमप्राप्त ठरते. त्यासंबंधी आजच्या लेखात केलेले हे विवेचन...
 
सांस्कृतिक स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? या प्रश्नाचे उत्तर एकप्रकारे स्वातंत्र्य म्हणजे काय? या प्रश्नातच दडलेले आहे. भारताला राजकीय स्वातंत्र्य 1947 साली मिळाले. परंतु, त्यापूर्वीच स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय? या प्रश्नाचा विचार सुरू झाला होता. प्राचीन भारतीय राष्ट्राने जेव्हा कित्येक शतके अनेक परकीय शत्रूंचा सामना केला आणि या प्रदीर्घ कालखंडात जेव्हा अनेक परकीय विचारांचे समाज भारतातच स्थायिक झाले, तेव्हा भारतीय राष्ट्राच्या संस्कृतीचाही विकास होत गेला. त्यामुळे सांस्कृतिक स्वातंत्र्याचा विचार करताना नेमक्या कोणत्या संस्कृतीकडे आपला निर्देश आहे, त्याची निश्चिती करणे आवश्यक आहे. हा विचार आपल्याला भारतीय संस्कृतीची नेमकी ओळख काय? या प्रश्नाकडे घेऊन जातो. समाजव्यवहारात वापरल्या जाणाऱ्या विविध सांस्कृतिक संरचनांचा विचार या विषयाचे विविध आयाम समजून घेण्यास आवश्यक आहे. गेले वर्षभर आपण या लेखमालेतून अशा सर्व आयामांची माहिती जाणून घेतली आहे. या सर्व विषयांचे साररूपात एकत्रित आकलन निर्वसाहतीकरण विषयाची व्याप्ती समजण्यास उपयुक्त ठरेल.
 
सांस्कृतिक स्वातंत्र्याचा विचार करताना सर्वप्रथम संस्कृती म्हणजे काय, या विषयाचे स्पष्टीकरण आवश्यक आहे. साहित्य, कला, क्रीडा, खाद्यपदार्थ, वेशभूषा इथून सुरू करून समाज, धर्म, नातेसंबंध, सणवार, व्रतवैकल्ये या सर्व विषयांना आपण ‌‘संस्कृती‌’ या एका शब्दात गुंफतो. या सर्व विषयांना समांतर असा वाहणारा काळाचा प्रवाह संस्कृतीमध्ये सतत बदल घडवत असतो. भारतीय चिंतनाने कोणत्याही तत्त्वांचा विचार करताना ती शाश्वत आहेत अथवा देशकालसापेक्ष हा विवेक नेहमीच केलेला आहे. या विवेकाच्याच आधारे जर सांस्कृतिक स्वातंत्र्य साधायचे असेल, तर भारतीय संस्कृतीतील शाश्वत तत्त्वांचा शोध घ्यायला हवा. हा शोध घेतानाच, अन्य जगात याच संकल्पनांशी साधर्म्य सांगणाऱ्या कोणत्या संकल्पना विकसित झाल्या आहेत आणि तरीही त्यांच्यात आणि भारतीय संकल्पनांमध्ये काय भेद आहेत, याचेही आकलन महत्त्वाचे आहे. वसाहतवादी विचारात अशा साधर्म्याच्या संकल्पना या एकच आहेत, अशी मांडणी करून त्यातील सूक्ष्म भेद मिटवायचा प्रयत्न होतो किंवा जरी सारख्या दिसल्या तरी आमची संकल्पना तुलनात्मकरित्या श्रेष्ठ आहे, असा दावा करून अन्य संकल्पना दाबल्या जातात. त्यामुळे सांस्कृतिक निर्वसाहतीकरणासाठी स्वसंस्कृतीच्या सखोल ज्ञानाबरोबर परसंस्कृतींचे भेदही जाणून घेणे आवश्यक आहे.
 
निर्वसाहतीकरण आणि संस्कृती या दोन संकल्पनांचा विचार केल्यास ओघाने येणारी पुढची संकल्पना म्हणजे राष्ट्र. ‌‘राष्ट्र‌’ आणि ‌‘राष्ट्रवाद‌’ या संकल्पनांवर प्रदीर्घ विचार पाश्चात्त्य विद्वत्साहित्यात झालेला आहे. एकसांस्कृतिक समाजाचे एक राष्ट्र आणि त्या संस्कृतीचे जतन करण्यास त्या समाजाचे स्वयंभू राज्य, असा राष्ट्र-राज्य सिद्धांत आपल्याला पाश्चात्त्य विवेचनातून पाहावयास मिळतो. युरोपीय अनुभवात भाषा हे संस्कृतीचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे भाषिक आधारावर तेथील राष्ट्रे बनली आहेत आणि दुभंगलीही आहेत. साम्यवादाने या विचारास छेद देत काही नवे प्रयोग करून पाहिले. पण, समाजामध्ये संस्कृतीच्या आधारावरील राष्ट्रभावना तीव्र असते, हा अनुभव वारंवार आला आहे. भारतीय अनुभव याच्या काहीसा विपरीत असून भारतीय राष्ट्र हे बहुभाषक आणि इतिहासात पाहता बहुराज्यीय असे राहिलेले आहे. संस्कृती-समाज-राष्ट्र यांचा परस्परसंबंध आणि त्याअनुसार राज्यसंस्थेची संकल्पना मांडणे, हा निर्वसाहतीकरणाचा प्रमुख आयाम आहे. किंबहुना, अर्वाचीन काळात शासन यंत्रणेच्या हातात समाजाच्या सर्व नाड्या असताना या आयामावर चर्चामंथन सर्वाधिक आवश्यक असेल.
 
परंतु, समाज म्हणजे काय? असा प्रश्न या सर्व संकल्पनांच्या मुळाशी उभा राहतो. समाज म्हणजे व्यक्तींचा समूह अशी सरळसोट व्याख्या मानल्यास कळप आणि समाज यात फरक करता येणार नाही. स्वाभाविक निष्कर्ष असा काढता येतो की, समाजाचे अस्तित्व हे केवळ व्यक्तिसमुच्चयापुरते मर्यादित नसून देशकालाच्या पटलावर त्यास एक स्वतंत्र अस्तित्व आहे. हे अस्तित्व समजून घेण्यास सर्वच संस्कृतींमध्ये विविध सिद्धांतने निर्माण झाली आहेत. त्या सर्वच सिद्धांतनांच्या केंद्राशी व्यक्तीचे अस्तित्व नेमके काय, याचा ऊहापोह आहे. भारतीय तत्त्वज्ञान प्रत्येक जीवास आत्मस्वरूप असल्याचे मानते, तर अन्य संस्कृतींमध्ये व्यक्तीच्या जड अस्तित्वास महत्त्व दिलेले आहे. यातच समाजाच्या परमेश्वरविषयक संकल्पनांचा अंतर्भाव होतो. दक्षिण अमेरिकेच्या कीहानोप्रभृती चिंतकांच्या मते, युरोपीय वैचारिक वसाहतीकरणाचा उगम त्यांच्या ख्रिस्ती रिलीजनमधील मान्यतांमध्ये आहे. निर्वसाहतीकरण साधणे म्हणजे ईश्वरविषयक सर्व कल्पनांना समभावाने पाहून प्रत्येक संस्कृतीस स्वतःच्या मार्गाचे पालन करून देणे. परंतु, खऱ्या अर्थाने ईश्वरविषयक संकल्पनांचे सन्मानपूर्वक आदान-प्रदान झाल्यास व्यक्तीचे अस्तित्व आणि या विश्वातील तिचे प्रयोजन या संकल्पनांनाही त्यांच्या सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात पाहावे लागेल. स्वाभाविकपणे व्यक्ती आणि समाज यांच्यातील संबंधही एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे लागतील. पाश्चात्त्य विचारातील तर्कप्रधानता काहीशी दूर ठेवून संदर्भप्रधान पद्धतीने ही सर्व चिंतने पुन्हा नव्याने करावी लागतील.
 
व्यक्ती आणि समाजाचे परस्परसंबंध आणि त्यातील ईश्वरतत्त्वाचे कार्य याचा विचार केल्यास निर्वसाहतीकरणाचा अजून एक पैलू समोर येतो, तो म्हणजे या सर्व व्यापारातील स्थिरचर सृष्टीचे स्थान. व्यक्तींच्या परस्परव्यवहारातील अन्य सजीव सृष्टीचे स्थान, त्यांचा मानवी समाजाशी असणारा संबंध आणि त्याचप्रमाणे निजव जगताविषयीचा मानवाचा दृष्टिकोन हा संस्कृतीसापेक्ष, तसेच कालसापेक्ष आहे. आजचा आपला या सर्व व्यवहारांविषयीचा दृष्टिकोन युरोपीय जीवनशैलीतून निर्माण झाला आहे. या जीवनशैलीस ख्रिस्ती ‌‘रिलीजन‌’ची आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालेल्या तर्कप्रामाण्यवादी आणि इहवादी विचाराची पार्श्वभूमी आहे. ज्या संस्कृतींची जीवनदृष्टी या चिंतनास विपरीत आहे, त्यांनी त्यांचे सृष्टीसंबंध पाश्चात्त्य प्रतिमानावर आधारणे विसंगतीस जन्म देते. विज्ञानाचा वस्तुविषय सृष्टीव्यवहारांचे नियम अभ्यासणे हा असल्याने सृष्टीसंबंधांविषयीचे प्रतिमान विज्ञानाच्या विभिन्न आकलनांना जन्म देते. पाश्चात्त्य मान्यतेनुसार, विज्ञानाचे नियम निरीक्षकनिरपेक्ष; म्हणजेच व्यक्तिनिरपेक्ष असतात. मूलभूत विज्ञानाबद्दल जरी हे खरे मानले, तरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत निश्चितच चुकीचे आहे. विज्ञानाची मूलभूत विज्ञान आणि तंत्रज्ञान ही विभागणीही युरोपीय विचारातून आलेली आहे. निर्वसाहतीकरणाचा विज्ञानाच्या आयामातील अर्थ हा केवळ विभिन्न संस्कृतींचे विज्ञानाच्या प्रगतीतील योगदान यथार्थपणे मान्य करणे एवढाच नाही, तर मानवी समाजाचे या चराचरसृष्टीतील स्थान कोणते आणि तिच्या कार्याविषयी आपल्याला झालेल्या ज्ञानाचा नेमका उपयोग कसा करावा, याविषयी काही नवी चिंतने निर्माण करणे हाही आहे.
 
भारतीयसंदर्भात या सर्व विषयांचा विचार केल्यास पुरुषार्थचतुष्टयाची कल्पना समोर येते. व्यक्तीच्या जीवितकार्याच्या पूर्ततेसाठी प्राचीन काळी निर्माण केल्या गेलेल्या या चार पुरुषार्थांची फेरमांडणी आधुनिक काळात समाजपुरुषासाठी एकात्म मानव दर्शनाने केलेली आहे. युरोपीय विकलन पद्धतीच्या मांडणीने धर्मविचार हा अर्थकामाच्या विचारातून सर्वस्वी वेगळा असल्याचे प्रतिपादन केले आहे. त्याचबरोबर अर्थकामाच्या व्यवहारांचे आकलन गणिती पद्धतीने करणे शक्य असल्याचे मानले जाते. धर्माला वेगळे करत अर्थव्यवहारांच्या प्रसंगी अर्थकामाची पूर्तता हाच त्यावेळचा धर्म असल्याची समकक्ष मांडणी या पद्धतीत होते. भारतीय चिंतनातील पुरुषार्थांचे अंतिम एकत्व या मांडणीत नाही. तसेच जो चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष, त्याला या सर्व मांडणीच्या परिघाबाहेरच बसवलेले आहे. सांस्कृतिक निर्वसाहतीकरणाचा विचार करताना आपल्या अर्थव्यवहारांची दिशा कोणती याचा फेरविचार आवश्यक आहे. त्याचबरोबर कामपूत हे स्वतःतच एक धर्मतत्त्व नसून, धर्म्य मार्गांनीच कामपूत आवश्यक आहे आणि असे मार्ग नेमके कोणते, याविषयीही वैचारिक मंथन करावे लागेल. आजच्या जगातील अर्थव्यवहार परस्परांत गुंतलेले असताना अर्थकामाची संस्कृतीसापेक्ष मांडणी कितपत शक्य आहे, याचाही विचार आवश्यक असेल. अर्थकामाचे चिंतन हा सांस्कृतिक निर्वसाहतीकरणाचा अन्य एक प्रमुख पैलू असेल.
 
आतापर्यंत उल्लेखलेले अनेक आयाम आणि त्यांच्याविषयीचा भारतीय दृष्टिकोन असा विचार केल्यास एक प्रमुख अडसर समोर येतो, तो म्हणजे भाषेचा. भाषा हे संस्कृतिसंवहनाचे माध्यम असल्याने भाषेतील अनेक शब्द आणि शब्दप्रयोग यांना सांस्कृतिक पार्श्वभूमी असते. संस्कृती-निरपेक्षपणे त्यांचे भाषांतर करता येत नाही. त्यामुळे सांस्कृतिक निर्वसाहतीकरणासाठी स्वभाषेचा उपयोग अत्यावश्यक ठरतो. परंतु, याच कारणाने जागतिक मानवी समाजासाठी निर्वसाहतीकरणाचे सिद्धांतन निर्माण करणे, ही अशक्यप्राय बाब बनते. त्यामुळे व्यवहारात स्वभाषा आणि प्रमुख जागतिक संवादभाषांचे ज्ञान आवश्यक तर आहेच. परंतु, भाषांतराच्या मर्यादा समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे. या मर्यादांमध्ये प्रामुख्याने संकल्पनात्मक शब्द हे त्यांच्या सांस्कृतिक संदर्भांसहित समजून घेणे आवश्यक आहे. साधारणपणे सारख्या अर्थाच्या परभाषेतील शब्दांच्या वापराने होणारे सांस्कृतिक अनर्थ आता सुपरिचित झाले आहेत. त्यामुळे सांस्कृतिक निर्वसाहतीकरणात भाषिक निर्वसाहतीकरण हा स्वतः एक आयाम आहेच. पण, तो अन्य आयामांच्या आकलनातील महत्त्वाचा घटक आहे.
 
सरतेशेवटी सांस्कृतिक निर्वसाहतीकरणासाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जित समाजाच्या न्यूनगंडास नष्ट करणे. समाजाचा आत्मसन्मान त्याच्या इतिहासाच्या जाणिवेत सामावलेला असतो. वसाहतकार देशांनी जित राष्ट्रांच्या इतिहासाचे जाणूनबुजून विकृतीकरण केल्याचे आपल्याला दिसते. भारताचा विचार केल्यास, स्वातंत्र्योत्तर काळात साम्यवादी विचारांच्या इतिहासकारांनी यात भर घातली आहे. आपल्या इतिहासाविषयी अभिमानाची भावना असल्याशिवाय आपल्या संस्कृतीवर आधारित समाजरचना उभी करण्याचे स्वप्न कोणतेही राष्ट्र पाहू शकणार नाही. भारताची इतिहासविषयक दृष्टी इतिहासाच्या अवास्तव गौरवीकरणाची नाही. परंतु, तथ्याधारित आकलन आणि योग्य ते श्रेयनिर्देशन इतिहासलेखनात करणे, हे राष्ट्रीय समाजाचा आत्मगौरव वाढवण्यास आवश्यक आहे.
 
अशाप्रकारे सांस्कृतिक निर्वसाहतीकरण बहुआयामी प्रकल्प असला, तरी त्याच्या मुळाशी संस्कृतीच्या शाश्वत तत्त्वांतून निर्माण झालेले मानव आणि ईश्वर यांच्या स्वरूपाविषयीचे आकलन आहे. या आकलनाच्या आधारे समाजाची बांधणी आहे आणि त्याच आधारे सृष्टीविषयक व्यवहार आहेत. स्वतःच्या परंपरांविषयी यथार्थ अभिमान बाळगून, त्यांच्याविषयी सखोल ज्ञानप्राप्ती करून आणि अन्य सांस्कृतिक परंपरांचा योग्य सन्मान ठेवत त्यांच्यापासून आवश्यक ते अंतर राखूनच आपल्याला सांस्कृतिक निर्वसाहतीकरण साधता येईल.
 
- डॉ. हर्षल भडकमकर
(लेखकाने मुंबईतील ‌‘टीआयएफआर‌’ येथून ‌‘खगोलशास्त्रा‌’त ‌‘पीएच.डी.‌’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‌‘प्रज्ञा प्रवाह‌’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)
9769923973