
मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा २०२३ मध्ये रिलीज झाला होता. आणि त्यानंतर प्रचंड गदारोळ देशभरात पाहायला मिळाला. काहींनी विरोध केला तर काही ठिकाणी प्रंचंड हाऊसफुल शोसह चित्रपट सुपरहीट ठरला. ‘लव्ह जिहाद’ या संवेदनशील विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटामुळे देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विरोध, निदर्शने आणि टीकेच्या भोवऱ्यात अडकूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मात्र जबरदस्त यश मिळवलं. दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमात अभिनेत्री अदा शर्मा हिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता या वादग्रस्त पण यशस्वी सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या नव्या भागात काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता असणं साहजिकच आहे.
‘द केरळ स्टोरी 2’चं चित्रीकरण पूर्ण झाल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलं असून, निर्माते २०२६ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. पहिल्या भागानंतर प्रेक्षकांमध्ये या सिक्वेलबाबत उत्सुकता प्रचंड वाढली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ‘द केरळ स्टोरी 2’चं बहुतांश शूटिंग केरळमध्येच करण्यात आलं असून, या भागात आणखी गंभीर आणि गडद आशय मांडण्यात येणार आहे. मात्र, या सिनेमाची स्टारकास्ट आणि कथानकाबाबत निर्मात्यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. विशेष म्हणजे, सूत्रांच्या माहितीनुसार ‘द केरळ स्टोरी 2’चं चित्रीकरणदेखील अत्यंत नियंत्रित आणि सुरक्षित वातावरणात आधीच पूर्ण करण्यात आलं आहे.
निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी चित्रीकरणादरम्यान कोणताही वाद किंवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली होती. सेटवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यासोबतच ‘नो फोन पॉलिसी’ लागू करण्यात आली होती, ज्यामुळे कलाकार आणि तंत्रज्ञांना शूटिंगदरम्यान मोबाईल वापरण्यावर बंदी होती. चित्रपटातील कोणतीही माहिती किंवा दृश्य बाहेर लीक होऊ नये, यासाठी ही काळजी घेण्यात आली होती.
सध्या मिळालेल्या माहितीनुसार ‘द केरळ स्टोरी 2’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवल्यानंतर आता हा सिक्वेल प्रेक्षकांच्या अपेक्षांवर कितपत उतरतो आणि कमाईच्या बाबतीत कोणता विक्रम करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच कोणती अभिनेत्री किंवा अभिनेता मुख्य भूमिकेत असणार याची देखील प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांना आहे.