सुरेखा कुडची आणि हिंदवी पाटील येणार एकत्र, दिसणार लावणीचा धमाल ठसका

    31-Dec-2025
Total Views |

मुंबई : लावणी ही केवळ नृत्यशैली नसून महाराष्ट्राची ओळख आणि सांस्कृतिक शान आहे. सुरेल संगीत, ठसकेबाज ताल आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना कायमच भुरळ घालत आली आहे. आता लावणीप्रेमींसाठी एक खास पर्वणी ठरणार असून लोकप्रिय लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील आणि प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना सुरेखा कुडची या पहिल्यांदाच एकत्र लावणी सादर करताना दिसणार आहेत.

तारा करमणूक निर्मित आणि प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ या आगामी मराठी चित्रपटात या दोघींची एक दमदार लावणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या ६ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, त्याआधीच या लावणीची झलक समोर आली आहे.

या व्हिडीओमध्ये हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची यांची ठसकेबाज जुगलबंदी लक्ष वेधून घेत आहे. दोघींच्या नृत्यातील ऊर्जा, लय आणि भावपूर्ण अदाकारीमुळे ही लावणी विशेष ठरणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. लावणी सादर करताना आम्हाला प्रचंड आनंद मिळाला आणि तोच आनंद प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास दोघींनीही व्यक्त केला आहे. ‘जब्राट’मधील ही लावणी चित्रपटाची उत्सुकता अधिक वाढवणारी ठरणार आहे.

किती सावरु पुन्हा पुन्हा
कशा झाकू या खाणाखुणा
नाही बिचाऱ्या पदराचा या गुन्हा


या डॉ.जयभीम शिंदे लिखीत शब्दांना हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची यांनी आपल्या मोहक अदाकारीने झक्कास रंग भरले आहेत. बेला शेंडेच्या स्वरातील या लावणीला डॉ.जयभीम शिंदे यांनी ठेका धरायला लावणारं संगीत दिलं आहे. या बहारदार लावणीचं नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांनी केले आहे.

‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी, प्रगती कोळगे आहेत. छायांकन अनिकेत खंडागळे यांचे, तर सहाय्यक असोशीएट चार्लेस गोम्स हे आहेत. वेशभूषा युगेशा ओमकार यांची आहे. बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमप, डॉ. जयभीम शिंदे, अनुराग जगदाळे, स्वराज्य भोसले, राजनंदिनी मगर, स्वाती शिंदे यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.