आफ्रिकेतील दहशतवाद

    31-Dec-2025   
Total Views |

'इस्लामिक स्टेट‌' ही दहशतवादी संघटना आफ्रिकी देशांमध्ये अलीकडच्या काळात वेगाने फोफावताना दिसते. म्हणूनच नाताळच्या रात्री अमेरिकन सैन्याने नायजेरियाच्या उत्तर-पश्चिम भागात हवाई हल्ले केले. हा हल्ला ‌‘इस्लामिक स्टेट‌’च्या तळांवर करण्यात आला. यासाठी नायजेरियन सरकारचीही संमती होती. कारण, तेही या दहशतवादी संघटनेमुळे त्रस्त आहेत. अमेरिकन टीव्हीवरील सुप्रसिद्ध निवेदक बिल माहेर यांनी सप्टेंबरमध्ये नायजेरियातील परिस्थितीला ‌‘नरसंहार‌’ असे संबोधत दावा केला की, 2009 पासून आतापर्यंत ‌‘बोकोहराम‌’ने एक लाखांहून अधिक लोकांची हत्या केली. त्याचबरोबर कथितरित्या 18 हजार चर्च जाळण्यात आली आहेत. सरकार या आकडेवारीला नाकारत नाही. मात्र, ते हेही सांगतात की, हिंसा केवळ ख्रिश्चनांवरच होत नाही; तर इस्लामव्यतिरिक्त अन्य धमयांवरही होत आहे. इतकेच नव्हे, तर उदारमतवादी मुस्लीम बांधवही ‌‘इस्लामिक स्टेट‌’चे बळी ठरले आहेत. नायजेरियातील मानवाधिकार संस्था ‌‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर सिव्हिल लिबटज‌’च्या आकडेवारीनुसार, नायजेरियात ‌‘इस्लामिक स्टेट‌’ पसरत चालल्याचे ट्रम्पसह अनेक अमेरिकी नेत्यांचे म्हणणे आहे.

अमेरिका व सहयोगी देशांनी साधारण 2016 ते 2017 दरम्यान असा दावा केला होता की, इराक आणि सीरियामधून ‌‘इस्लामिक स्टेट‌’चा नायनाट करण्यात आला. त्यानंतर काही काळ शांतता होती आणि असे मानले गेले की, संघटना खरोखरच संपली. पण, तसे झाले नाही. या गटाची विचारधारा अजूनही जिवंत होती, जी जगभर इस्लामिक अतिरेकी विचार पसरवू इच्छित होती.

मध्य-पूर्वेतून हुसकावून लावल्यानंतर या विचारधारेचे समर्थक सुरक्षित आश्रय शोधू लागले. पश्चिमेत धोकेच धोके होते, आशियाई देश कठोर दिसत होते. त्यामुळे सर्वाधिक संधी दिसल्या त्या आफ्रिकेमध्ये. ‌‘इस्लामिक स्टेट‌’ने आपली रणनीती बदलत स्वतःला एका जागतिक नेटवर्कमध्ये रूपांतरित केले आणि आफ्रिकेला आपले केंद्र बनवले. आज अनेक आफ्रिकी देश दीर्घकाळापासून गृहयुद्धांनी त्रस्त आहेत. तिथे अनेक अतिरेकी गट आहेत, जे आपले वर्चस्व प्रस्थापित करू इच्छितात. आफ्रिकेत ‌‘बोको हराम‌’ हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण. 2015 मध्ये ‌‘बोको हराम‌’च्या एका गटाने ‌‘इस्लामिक स्टेट‌’प्रती निष्ठा जाहीर केली आणि तो ‌‘इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रोव्हिन्स‌’ म्हणून ओळखला जाऊ लागला. ही संघटना नायजेरिया, चाड, नायजर आणि कॅमेरूनच्या सीमावत भागांत पसरली. नायजेरिया विशेषतः लक्ष्य बनला. कारण, तिथे आधीपासूनच हिंसा, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराचे राज्य होते. सरकारपासून सुरक्षा दलांपर्यंत सामान्य लोकांचा विश्वास कमी झाला होता. अशा नाराजांना ‌‘इस्लामिक स्टेट‌’ने लक्ष्य केले. त्यांना पैशांचे आमिष दाखवले. भरती सुरू झाली आणि आपली पाळेमुळे रोवली. नायजेरियाबरोबरच ‌‘इस्लामिक स्टेट‌’च्या शाखा माली, बुर्किना फासो, नायजर, तसेच मोझांबिक आणि काँगोमध्येही उभ्या राहिल्या.

दक्षिण आशियात ‌‘इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत‌’ ही त्याची सर्वात धोकादायक शाखा मानली जाते, जी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या काही भागांत सक्रिय आहे. मध्य आशियातही त्याची उपस्थिती आहे. उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तानशी संबंधित काही नेटवर्क याच्याशी जोडलेले असल्याचे सांगितले जाते. फिलीपिन्स, इंडोनेशिया आणि मलेशियातही लहान; पण सक्रिय ‌‘आयएस‌’-समर्थक गट राहिले आहेत.

एकूणच ‌‘इस्लामिक स्टेट‌’चा आफ्रिकेतील विस्तार केवळ आफ्रिकेपुरता मर्यादित नाही, तर तो जागतिक सुरक्षेला दिलेले गंभीर आव्हान आहे. पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियानंतर आफ्रिका हे दहशतवादी जाळ्यांचे नवे केंद्र बनत असताना भारतासाठी ही घडामोड विशेष चिंताजनक. कारण, आफ्रिका हा केवळ भारताचा आर्थिक व ऊर्जा भागीदार नाही, तर हिंद महासागर क्षेत्रातील सुरक्षेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आफ्रिका दौऱ्यामुळे भारत-आफ्रिका संबंधांना नव्या धोरणात्मक दिशेने वाटचाल मिळाली आहे. भारत आफ्रिकेतील मित्रदेशांसोबत दहशतवादाविरोधात संयुक्त आघाडी उभारू शकतो. आज ‌‘इस्लामिक स्टेट‌’ ज्या पद्धतीने आफ्रिकेतील अस्थिरता, गरिबी आणि राजकीय कमकुवतपणाचा फायदा घेताना दिसते, त्याला लष्करी कारवाईबरोबरच व्यापक धोरणांतूनही उत्तर देता येईल.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक