‌‘बेस्ट‌’चे अपघातसत्र

    31-Dec-2025   
Total Views |

उपनगरीय लोकल सेवेनंतर मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी म्हणजे मुंबईतील ‌‘बेस्ट‌’ बस. पण, मागील काही काळात हीच ‌‘बेस्ट‌’ मुंबईकरांच्या जीवावर उठली आहे का? असा प्रश्न पडावा अशी स्थिती. त्याचे कारण म्हणजे, मुंबईतील ‌‘बेस्ट‌’ बसचे वाढते अपघात. परवाच भांडुपमध्ये रात्रीच्या वेळी ‌‘बेस्ट‌’ बस रिव्हर्स घेताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि चारजणांचा चिरडून मृत्यू झाला, तर दहापेक्षा अधिक नागरिक जखमी झाले. गेल्याच वष कुर्ल्यालाही अशाच प्रकारे ‌‘बेस्ट‌’ बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून, 30 ते 40 पादचाऱ्यांना धडक दिली होती, ज्यामध्ये नऊ पादचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पण, आता वर्षभरानंतर पुन्हा एकदा तशीच घटना घडल्याने ‌‘बेस्ट‌’ प्रशासनाने या अपघातसत्रांतून कोणताही धडा घेतला नसल्याचीच भावना व्यक्त होताना दिसते.

भांडुपच्या अपघातानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, बसचालकाने ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबला. त्यामुळे बस भरधाव वेगाने पदपथावर चढली आणि पादचारी चिरडले गेले. संतोष सावंत या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचे ‌‘बेस्ट‌’ने निलंबनही केले. पण, यानंतर संबंधित चालकाला आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले होते की नाही, याची चौकशी केली जाईल, असे उत्तर ‌‘बेस्ट‌’च्या एका अधिकाऱ्याने माध्यमांना दिल्याचे वृत्त झळकले. याचाचा अर्थ, ‌‘बेस्ट‌’च्या सेवेतील चालक व्यवस्थित प्रशिक्षित आहेत अथवा नाही, याचीही प्रशासनाला 100 टक्के खात्री नाही का? आणि तशी खात्री नसेल, तर बसचे स्टेअरिंग अशा चालकांच्या हाती देऊन मुंबईकरांच्या जीवाशी असा खेळ का? यांसारखे प्रश्न उपस्थित होतात.

मुंबईत काही बसचालक अगदी बेदरकारपणे ‌‘बेस्ट‌’ बस पळवतात. त्यामुळे मुंबईकरांना एकप्रकारे जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ येते. त्यातच अरुंद रस्ते, त्या तुलनेत मोठाल्या एसी बसेस, रिक्षाचालकांची बेशिस्ती, वाहतुककोंडी यामुळे बसचालकांचीही तारांबळ उडतेच. पण, असे असले तरी ‌‘बेस्ट‌’ बसचालकांना विशेषकरून नवीन एसी बसेस चालवण्याचे प्रशिक्षण, त्यांनी कामावर असताना मद्यपान केले आहे अथवा नाही याची नियमित चाचणी; मानसिक आरोग्य चाचणी यांसारख्या बाबींकडे प्रशासनाला अधिक गांभीर्याने लक्ष द्यावेच लागेल.

उत्साहाचा जनतेला दाह

महानगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस. त्यामुळे हौशे-नवशे-गवशांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. कुठे उमेदवारी मिळाल्याचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता; तर कुठे नाराजी, बंडाळीतून आक्रोश धगधगत होता. एकूणच, मागील दोन दिवस हे सर्वच राजकीय पक्षांसाठी, कार्यकर्त्यांसाठी प्रचंड तणावाचेच गेले. त्यातच ‌‘उमेदवारी अर्ज भरायला चला‌’ म्हणून सर्वपक्षीय उमेदवारांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जंगी मिरवणुकाच काढल्या. पण, उमेदवारांच्या या उत्साहाचा जनतेला जो दाह सोसावा लागला, त्याकडे मात्र सरसकट दुर्लक्षच झालेले दिसते.

राजकीय पक्षांत अटीतटीच्या लढाईनंतर आघाड्या-युतींच्या संघर्षानंतर उमेदवारी पदरात पडणे, हे साहजिकच कौतुकास्पद. तो आनंद उमेदवाराने आपल्या कार्यकर्त्यांबरोबर शक्तिप्रदर्शनातून साजरा करण्यातही गैर काहीच नाही. पण, आपल्या या अतिउत्साहामुळे आपण सर्वसामान्यांना वेठीस तर धरत नाही ना, याचेही भान या भावी लोकप्रतिनिधींनी ठेवायला हवे. अशा उत्साही मिरवणुकांमधील ढोल-ताशांचा कर्कश्य आवाज, कार्यकर्त्यांची रस्त्यांवरील बेशिस्ती, त्यांच्या वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग आणि त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगा हे चित्र मुंबईत बऱ्याच ठिकाणी दिसून आले. वाहतूक पोलीसही या कार्यकर्त्यांसमोर हतबल दिसले. मालाडमध्ये तर आमदाराच्या कार्यालयाबाहेरून सुरू झालेल्या अशाच एका उमेदवाराच्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांच्या गदमुळे रुग्णवाहिकेलाही मार्ग काढताना नाकीनऊ आले आणि तब्बल पाऊणतास वाहने जागच्या जागीच थबकली. तेव्हा, उमेदवारांनी आपल्या आनंदापोटी जनतेच्या आयुष्यात वीरजण तर पडणार नाही, याची किमान संवेदनशीलता दाखवायला हवी. आगामी 15 दिवस प्रचाराचा जोरदार धुरळा उडणार आहे. उमेदवारांसह कार्यकर्ते दारोदार फिरतील. मतदारांना सामोरे जातील. पण, या प्रचारात कुठेही अरेरावी, नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि आपल्याकडून नागरी-सामाजिक भानही राखले जाईल, याची दक्षता घेणेही गरजेचे. कारण, मतदार केवळ उमेदवाराच्या प्रचारसाहित्यालाच नव्हे, तर त्याच्या व्यक्तिचारित्र्यालाही यादरम्यान बारकाईने न्याहाळत असतो, याचा विसर न पडलेला बरा!


विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची