भारताला शिकवणारा पुतीन आणि बुश यांचा संवाद...

    31-Dec-2025
Total Views |

या वर्षातील जागतिक राजकारणाला ढवळून टाकणाऱ्या घटनांमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध, इराणचे अण्वस्त्रनिर्मिती प्रकल्प फलरूपास येताना पाहून इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणमधील अणुप्रकल्पांवर केलेले हवाई हल्ले आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध सुरू केलेल्या ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’चा समावेश होतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाकिस्तानप्रेमाने भारतीयांना बुचकळ्यात टाकले आहे. या तीनही घटनांचे धागेदोरे 2001, 2005 आणि 2008 साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये झालेल्या संभाषणांमध्ये जुळतात. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा दस्तावेज संस्थेकडून नुकतेच या संभाषणाचे तपशील प्रसिद्ध करण्यात आले.

जॉर्ज डब्ल्यू बुश आणि व्लादिमीर पुतीन यांची पहिली द्विपक्षीय भेट दि. 16 जून 2001 रोजी स्लोव्हेनियातील ब्रनो किल्ल्यावर झाली. तेव्हा 9/11च्या दहशतवादी हल्ल्यांना तीन महिन्यांचा अवकाश होता. या पहिल्या वैयक्तिक भेटीत व्लादिमीर पुतीन अमेरिकेबद्दल आणि एकूणच रशियाने पाश्चिमात्य जगाचा भाग होण्याबाबत आशावादी दिसतात. या भेटीमध्ये एकेकाळी साम्यवादी सोव्हिएत रशियाच्या गुप्तहेरसेवेत अधिकारी असणाऱ्या पुतीन यांनी बुश यांना त्यांच्या धार्मिक श्रद्धा आणि त्यांच्या डचामधील आगीतून बचावलेल्या त्यांच्या क्रॉसची कहाणी सांगितली. संभाषणाच्या ओघात त्यांनी रशियाला ‌‘नाटो‌’ समूहाचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली. रशियाने 1954 सालीही अशी तयारी दाखवली होती. पण, तेव्हा परस्परांतील मतभेदांचे कारण देत त्यांना ‌‘नाटो‌’मध्ये घेतले नव्हते. बुश यांनी रशियात वृत्त-स्वातंत्र्य नसणे, तसेच चेचन्यामधील रशियाच्या लष्करी कारवाईतील मानवाधिकार-हननाचा मुद्दा उपस्थित करून रशियाच्या ‌‘नाटो‌’प्रवेशामध्ये अडथळा असल्याचे सूचित केले. तेव्हा पुतीन यांनी अमेरिकेचे लक्ष अफगाणिस्तानमध्ये असलेल्या ओसामा बिन लादेनकडे वेधले. बिन लादेन विरुद्ध रशिया आणि अमेरिका संयुक्तपणे करत असलेल्या कारवाईची माहिती फुटल्याने रशियन गुप्तचर यंत्रणेच्या सदस्यांना प्राण गमवावे लागल्याचे त्यांनी सांगितले. चेच्येन फुटीरतावादी ‌‘अल-कायदा‌’च्या संपर्कामध्ये असून त्यांच्याइतकेच क्रूर असल्याचे सांगितले. आपण याबाबत बिल क्लिंटन यांनाही सांगितले होते. पण, त्यांनी भूमिका घेतली नाही. पुतीन यांनी पाकिस्तानची संभावनाही ‌‘अण्वस्त्र असलेली हुकूमशाही‌’ अशी केली होती. ‌‘9/11‌’च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध पुकारलेल्या युद्धात रशिया वापरत असलेल्या मार्गांचाच वापर करण्यात आला.

पुतीन आणि बुश यांच्यातील दुसरे संभाषण दि. 16 सप्टेंबर 2005 रोजी वॉशिंग्टनमधील ‌‘व्हाईट हाऊस‌’च्या ओव्हल ऑफिसमध्ये पार पडले. त्यात त्यांच्यासोबतच दोन्ही देशांचे राजदूत आणि वरिष्ठ सचिव आणि मंत्री सहभागी होते. त्यातील चर्चा इराण आणि उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र तंत्रज्ञान विकास कार्यक्रमावर केंद्रित होती. पुतीन यांनी इराणचे उद्दिष्ट अण्वस्त्रे बनवण्याचे असून धर्मांध लोकांच्या हातात अण्वस्त्रे पडता कामा नये, याबाबत स्पष्ट प्रतिपादन केले. इराणने ‌‘पॅरिस करारा‌’वर स्वाक्षऱ्या करून अण्वस्त्र बनवणार नाही, असे घोषित केले असताना ते तसे करण्याचे प्रयत्न करत आहेत, यावर जॉर्ज बुश यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुतीन यांनी इराणकडे अण्वस्त्र असता कामा नये, हे स्पष्ट करताना आपल्याकडील माहितीचा आधार अधिक व्यापक करायला हवा, असे सांगितले. बुश म्हणाले की, “आपण इस्रायलचे पंतप्रधान अरिएल शारोन यांच्या जागी असतो, तर आपणही हे प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची तयारी केली असती.” त्यावेळेस इराणचे अध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांनी इस्रायलचे अस्तित्व जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्याची धमकी दिली होती. त्यावर पुतीन यांनी हल्ला करताना “इराणच्या प्रयोगशाळा कुठे आहेत हे कसे कळणार?” असा प्रश्न उपस्थित केला. तसेच इराणच्या सेंट्रिफ्युजमधील युरेनियम पाकिस्तानमधून आले असून, आजही इराण आणि पाकिस्तान यांचे सहकार्य चालू असल्याचे सांगितले. त्यांच्या बोलण्याचा उद्देश होता की, इराणचा अण्वस्त्र निर्माण कार्यक्रम थांबवायचा असेल, तर त्याचे उत्तर पाकिस्तानमध्येही आहे. उत्तर कोरियातील आर्थिक परिस्थितीबद्दल दोन्ही नेत्यांनी चिंता व्यक्त केली. पण, ती आणखी बिघडल्यास तेथील लोक उठाव करू शकतील; या बुश यांच्या अपेक्षेशी असहमती व्यक्त करत पुतीन म्हणाले की, “मी स्वतः साम्यवादी व्यवस्थेचा भाग होतो. साम्यवादी लोकही आपल्या ध्येयासाठी जीवन समर्पित करायला तयार असतात.” इस्रायलबद्दल आपल्या मतामध्ये तिथे भेट दिल्यानंतर आमूलाग्र परिवर्तन झाल्याचे पुतीन यांनी सांगितले. त्यामुळे अशा देशांशी संवादातून मार्ग काढण्यात यावा.

दि. 6 एप्रिल 2008 रोजी पुतीन आणि बुश यांच्यातील शेवटची भेट आहे, जी काळ्या समुद्रकिनाऱ्यावरील सोची येथील पुतीन यांच्या निवासस्थानी पार पडली. तेव्हा बुश यांची आठ वर्षांची कारकीर्द संपत आली होती आणि नोव्हेंबर 2008 मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार होत्या. ही भेट रोमानियाची राजधानी बुखारेस्टमध्ये पार पडलेल्या ‌‘नाटो‌’ परिषदेनंतर झाली असल्याने तिच्यावर ‌‘नाटो‌’ परिषदेत जॉर्जिया आणि युक्रेन या एकेकाळच्या सोव्हिएत महासंघाचा भाग असलेल्या देशांना ‌‘नाटो‌’चे सदस्य करण्याच्या चर्चेचा तणाव होता. या बैठकीत दोन्ही नेत्यांमधील विसंवादाचा सूर स्पष्टपणे जाणवत असला, तरी अतिशय सभ्य भाषेत हे संभाषण पार पडले. पुतीन यांनी अत्यंत स्पष्टपणे आणि तितक्याच प्रभावीपणे रशियाची काळजी आणि भूमिका बुश यांच्यासमोर मांडली. उत्तर युरोपमधून पाणबुडीतून डागलेली अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे अवघ्या सहा मिनिटांत मॉस्कोपर्यंत पोहोचू शकतात, असे सांगताना त्यांनी पोलंड आणि झेक रिपब्लिकमध्ये ‌‘नाटो‌’ने स्थापलेले सैन्यतळ रशियन पथकाच्या पाहणीसाठी खुले करून पारदर्शकता निर्माण करण्याची सूचना केली.

त्यानंतर पुतीन युक्रेनच्या मुद्द्यावर आले. युक्रेनच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश, म्हणजेच एक कोटी, 70 लाख रशियन भाषिक असून, युक्रेन हे नैसर्गिक राष्ट्र नसल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत रशियाला पोलंड, रोमानिया आणि हंगेरीकडून मिळालेला प्रदेश युक्रेनला जोडण्यात आला. त्यापूव, म्हणजे 1920 आणि 1930च्या दशकात रशियाचा काही प्रदेश युक्रेनच्या पूर्वेला जोडण्यात आला होता. 1956 मध्ये क्रीमिया युक्रेनला जोडण्यात आला होता. युक्रेनची लोकसंख्या 4.5 कोटी असून, तो एकमेकांपासून भिन्न असलेल्या लोकांनी तयार झाला आहे. बोलण्याच्या ओघात पुतीन यांनी चेतावणी दिली की, ‌‘नाटो‌’ने युक्रेनमध्ये झेंडा रोवण्याचा प्रयत्न केला, तर रशिया तेथील ‌‘नाटो‌’विरोधी लोकांना हाताशी धरून तिथे कायमस्वरूपी अस्वस्थता निर्माण करेल. रशियाच्या दक्षिणेला असलेल्या जॉर्जिया या देशालाही ‌‘नाटो‌’मध्ये सामावून घेण्यास विरोध करताना पुतीन यांनी सांगितले की, “नाटोची छत्री वापरून जॉर्जिया आपल्या अब्खाझिया आणि दक्षिण ओसेटिया या स्वायत्त प्रांतांवर प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. ‌‘नाटो‌’ सदस्य देश जॉर्जियाच्या युद्धामध्ये आपले सैन्य पाठवणार नसल्यामुळे तिथे यादवी निर्माण होऊ शकेल.” थोडक्यात, युक्रेन आणि जॉर्जियाला ‌‘नाटो‌’चा भाग करून घेण्यापेक्षा त्यांच्या अर्थव्यवस्थेचे सशक्तीकरण महत्त्वाचे असल्याचे पुतीन यांनी सुचवले. जॉर्ज बुश पुतीन यांचे कौतुक करत म्हणाले की, “तुम्ही ‌‘नाटो‌’विरोधी भूमिका ‌‘नाटो‌’चे नेतृत्व करत असलेल्या देशाच्या प्रमुखास ज्या स्पष्टपणे मांडली, त्याबाबत मला तुमचे कौतुक वाटते.”

पुतीन आणि बुश यांच्यातील शेवटच्या संभाषणालाही आता 17 वर्षे झाली आहेत. यादरम्यान, अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प, जो बायडन आणि आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाले असले, तरी पुतीन आजही रशियाचे अध्यक्ष आहेत. या संभाषणांमध्ये चर्चा झालेल्या मुद्द्यांचे युद्धांमध्ये रूपांतर झाले आहे. यात जाणवलेल्या दोन गोष्टी म्हणजे, रशियाची भूमिका 2001 सालापासून स्पष्ट आहे, तर अमेरिकेचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी संभाषणांमध्ये चतुर असून पुतीन यांना समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत असले; तरी प्रत्यक्षात स्वतःला जे करायचे तेच करतात. भारतासाठी या संभाषणांमधून खूप काही शिकण्यासारखे आहे.

- अनय जोगळेकर