सेंद्रिय शेती आणि उद्योजकतेच्या संगमातून व्यवसायाची नवीन वाट निर्माण करणाऱ्या मंजिरी निरगुडकर यांची गोष्ट...
व्यवसाय उभा करण्यासाठी, तो टिकवण्यासाठी भांडवलाची व उपयुक्त अशा संकल्पनांची आवश्यकता असतेच. मात्र, त्याचबरोबर एक सर्वात महत्त्वाचा अदृश्य घटक जो व्यवसायाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो, तो म्हणजे उद्यमशीलता. यातूनच पुढे नवनवीन संधी निर्माण होतात. भारतामध्ये आजच्या घडीला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ही उद्यमशीलता आपल्याला बघायला मिळते. शेतकरी आपल्या विकसित भारताचा कणा आहेत. येणाऱ्या काळात सेंद्रिय शेतीमधून निर्माण होणाऱ्या घटकांना मोठ्या प्रमाणात मागणी असेल, असे भाकीत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. याच क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करणारी मराठी उद्योजिका म्हणजे मंजिरी निरगुडकर.
व्यवसाय या गोष्टीचे घरातच बाळकडू मिळाल्यामुळे मंजिरी यांचा जीवनप्रवास कुठल्या दिशेने होणार, हे एकाप्रकारे नियतीने आखलेच होते. मात्र, या वाटेवर त्यांना केवळ चालायचेच नव्हते; तर नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून आणखी एक वेगळी वाट तयार करायचे होती. वाणिज्य शाखेमधून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी व्यवसाय प्रशासनामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. याच काळामध्ये त्यांनी ‘खाद्यसंस्कृती आणि त्याचा समाजातील वेगवेगळ्या समूह गटांवर होणारा परिणाम’ याविषयी अभ्यास केला. ’Food culture and impact on community well-being' हा तर त्यांचा ‘डॉक्टरेट’चा विषय होता. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर लगेचच व्यवसायाच्या जगामध्ये शिरण्यापेक्षा त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. या कालावधीमध्ये त्यांना असंख्य अनुभव आले, ज्यामुळे त्यांच्या व्यावसायिकतेचा पाया भक्कम होत गेला.
पारंपरिकदृष्ट्या व्यवसाय करून चार पैसे कमवायचे, असा हेतू त्यांच्या मनात नव्हता. आपण जे करू त्याच्या माध्यमातून समाजामध्ये नवा विचार रुजला पाहिजे, हा विचार त्यांच्या कामाच्या केंद्रस्थानी होता. याच विचारातून पुढे ‘प्युअर ओरिजन्स बाय निरगुडकर फार्मस्’चा जन्म झाला. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत ताज्या फळभाज्या पोहोचाव्यात, हा विचार मनात ठेवून त्यांनी कामाला सुरुवात केली. सामान्यपणे आज आपल्या ताटात जे जेवण येतं, त्यामध्ये हमखास कुठल्या ना कुठल्या केमिकलचा वापर असतो. लोकांनी केमिकलयुक्त अन्न न घेता, त्यांच्या ताटात ताज्या फळभाज्या असाव्यात, या हेतूने मंजिरी काम करत राहिल्या. शेतीचा वारसा घरातच लाभल्यामुळे स्वाभाविकच आपल्या जीवनातील व जेवणातील ताजेपण लोकांनीसुद्धा अनुभवायला हवं, हा विचार त्यांनी केला. त्याचबरोबर काळाच्या ओघामध्ये आपण आपल्याच स्वयंपाकघरातील अनेक पारंपरिक पदार्थ विसरलो आहोत, हे लक्षात घेता त्यांनी लोकांसमोर असे अनेक पदार्थ ठेवले.
आपण कुठल्या प्रकारचे अन्न ग्रहण करतो, याचा आपल्या आरोग्यावरच नाही; तर एकंदरीत जीवनावरती परिणाम होत असतो. त्यामुळे जेवणाचा विचार हा फक्त खाण्यापुरता मर्यादित नाही. त्यातल्या त्यात आपल्याकडे खाद्यसंस्कृतीचा समृद्ध वारसा आपल्याला लाभलेला आहे. त्याअनुषंगाने मंजिरी यांनी ‘ट्रेडिशन ऑफ टेस्ट’ नावाचं पुस्तक लिहिलं, ज्याच्या माध्यमातून त्यांनी मराठी खाद्यसंस्कृतीवर प्रकाश टाकला. मराठी खाद्यसंस्कृतीची ओळख सर्वव्यापी असायला हवी, हा विचार मनात ठेवून त्यांनी हा ग्रंथ इंग्रजीमध्ये लिहिला.
नोकरीमधील स्थिर झालेले जीवन सोडताना, व्यावसायिकतेच्या नव्या जगामध्ये पाऊल टाकताना मनाची चलबिचल होणे स्वाभाविक होते. मात्र, यावेळीसुद्धा साऱ्या बदलाला त्या सामोऱ्या गेल्या. ‘कोविड’च्या काळामध्ये अनेक व्यापाऱ्यांना, तरुण उद्योजकांना संकटांना सामोरे जावे लागले. मंजिरी यास अपवाद नव्हत्या. मात्र, समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला समर्थपणे तोंड देत त्या पुन्हा उभ्या राहिल्या. याच काळामध्ये ‘फूड इंडस्ट्री’मध्ये सुरू असलेल्या भेसळीचे अनेक धक्कादायक प्रकार त्यांनी पाहिले. यामुळे त्यांच्या सेंद्रिय शेतीवरील कामाचा निर्धार आणखीनच पक्का झाला.
उद्यमशीलतेचा ध्यास घेत डॉ. मंजिरी निरगुडकर यांनी यशाची नवनवीन शिखरं गाठली. त्यांच्या यशाचे उत्तुंग शिखर हे त्यांच्या कष्टाचं फळ असलं, तरी त्या शिखराचा भक्कम पाया त्यांचे कुटुंब आहे, याचा त्या वारंवार उल्लेख करतात. त्यांचा ‘कश्तियां’ हा कवितासंग्रह मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. ‘मोस्ट इन्स्पायरिंग इंडियन अचिव्हर’ अवॉर्ड, ‘यंग अचिव्हर’ अवॉर्ड, ‘वूमन आंत्रप्रेन्युअर’ अवॉर्ड अशा असंख्य पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. जितके त्यांचे त्यांच्या कामावर प्रेम आहे, तितकेच शास्त्रीय संगीतावरसुद्धा. ‘उद्योजकता आणि स्त्रिया’ या विषयाबद्दल बोलताना त्या म्हणतात की, “स्त्रियांचे आर्थिक सक्षमीकरण आवश्यक आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय, स्त्रीला स्वतःची ओळख घडवायची असेल, तर नव्या वाटा शोधाव्या लागतील.” डॉ. मंजिरी निरगुडकर यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे त्यांना शुभेच्छा.