२०२५ वर्ष 'या' ५ सिने दिग्दर्शकांनी गाजवलं

    30-Dec-2025
Total Views |

मुंबई : २०२५ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं. प्रेक्षकांची अभिरुची, कंटेंटची गुणवत्ता आणि बॉक्स ऑफिसचा ताळमेळ साधत काही दिग्दर्शकांनी यंदा आपली स्वतंत्र ओळख नव्याने प्रेक्षकांना करुन दिली. व्यावसायिक यशासोबतच कथानक, सादरीकरण आणि दिग्दर्शनशैलीमुळे हे दिग्दर्शक चर्चेत राहिले. २०२५ मध्ये विशेष गाजलेले टॉप ५ चित्रपट दिग्दर्शक ज्यांच्या चित्रपटांची आजही चर्चा होते.

१) मोहित सूरी
रोमँटिक आणि भावनिक कथानकांसाठी ओळखले जाणारे मोहित सूरी यांनी २०२५ मध्ये ‘सैयारा’ या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवली. संगीत, प्रेमकथा आणि तरुणाईला भावणारी मांडणी ही त्यांच्या चित्रपटांची खासियत. सैयाराने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत मोहित सूरी यांना वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय दिग्दर्शक बनवलं. या चित्रपटातून त्यांनी अहान पांडे आणि अनीट पड्डा या नव्या कोऱ्या जोडीला प्रेक्षकांसमोर आणलं. आणि सिनेमा सुपरहीट ठरला.

२) आदित्य धर
‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’नंतर आदित्य धर यांच्याकडून अपेक्षा प्रचंड वाढल्या होत्या आणि २०२५ मधील ‘धुरंधर’ या चित्रपटाने त्या अपेक्षा पूर्ण केल्या. धारदार पटकथा, राजकीय-गुप्तहेर पार्श्वभूमी आणि प्रभावी संवाद यामुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला. गंभीर आणि ताकदीचा सिनेमा सादर करणारा दिग्दर्शक म्हणून आदित्य धर यांची प्रतिमा अधिक मजबूत झाली.

३) लोकेश कनगराज
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावी दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या लोकेश कनगराज यांनी ‘कुली’ या चित्रपटातून २०२५ गाजवलं. अ‍ॅक्शन, स्टायलिश ट्रीटमेंट आणि तांत्रिक भव्यता हे त्यांच्या दिग्दर्शनाचे बलस्थान. त्यांचा सिनेमॅटिक युनिव्हर्स प्रेक्षकांना सातत्याने भुरळ घालत आहे.

४) लक्ष्मण उतेकर
२०२५ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि भव्य चित्रपटांसाठी खास ठरलं असून त्यात ‘छावा’ या बहुप्रतिक्षित चित्रपटामुळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचं नाव विशेषत्वाने चर्चेत आलं. आजवर संवेदनशील, सामाजिक आणि नातेसंबंधांवर आधारित चित्रपटांसाठी ओळखले जाणारे लक्ष्मण उतेकर यांनी ‘छावा’च्या माध्यमातून पूर्णपणे वेगळ्या आणि मोठ्या पटावर उडी घेतली.‘मिमी’, ‘लुका छुपी’ आणि ‘जरा हटके जरा बचके’ यांसारख्या चित्रपटांतून सामान्य माणसाच्या भावना, विनोद आणि वास्तव यांचा सुंदर मिलाफ साधणारे उतेकर ‘छावा’मध्ये थेट इतिहासाच्या रणभूमीवर पोहोचले. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट केवळ ऐतिहासिक कथा न राहता शौर्य, बलिदान आणि स्वाभिमान यांचा भव्य उत्सव ठरला.

५) ऋषभ शेट्टी
‘कांतारा’च्या यशानंतर ‘कांतारा: चॅप्टर १’मधून ऋषभ शेट्टी यांनी २०२५ मध्ये इतिहास रचला. लोककथा, श्रद्धा, संस्कृती आणि भव्य दृश्यरचना यांचा संगम साधत त्यांनी पॅन-इंडिया स्तरावर प्रचंड यश मिळवलं. अभिनेता-दिग्दर्शक म्हणून त्यांची क्रेझ यंदा शिखरावर पोहोचली.

एकूणच, २०२५ हे वर्ष दिग्दर्शकप्रधान सिनेमा, दमदार कथानक आणि वेगवेगळ्या शैलींच्या प्रयोगांसाठी लक्षात राहणार आहे. या पाच दिग्दर्शकांनी भारतीय चित्रपटसृष्टीला नवा वेग आणि नवी दिशा दिली, असं नक्कीच म्हणता येईल.