डहाणूची धवललक्ष्मी पोरबंदरच्या समुद्रात; आजवर ४५० किलोमीटरपर्यंत प्रवास
30-Dec-2025
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - डहाणूच्या किनाऱ्यावरुन सॅटेलाईट टॅग लावून सोडलेली धवललक्ष्मी नावाच्या मादी कासवाने गुजरातच्या सागरी परिक्षेत्रात प्रवास केला आहे (dhavallaxmi sea turtle). सध्या ती पोरबंदर किनाऱ्यापासून १०० किलोमीटर दूरवर असलेल्या समुद्रात आहे (dhavallaxmi sea turtle) . येत्या काळात ती अजून पश्चिमेकडे सरकरण्याची शक्यता असून यंदा ती प्रजनन करुन अंडी घालणार का, याकडे संशोधकांचे डोळे लागले आहेत. (dhavallaxmi sea turtle)
सागरी कासवांच्या नेहमीच्या खाद्याच्या जागा आणि विणीसाठीच्या जागा यामधील अंतर काही हजार किलोमीटर इतके दूर असू शकते. तसेच सागरी कासवे स्थलांतरही करु शकतात. सागरी कासवांचे स्थलांतर किंवा त्यांच्या कायमस्वरुपी अधिवासाचा मागोवा घेण्यासाठी दोन प्रकारे त्यांचा शास्त्रीय अभ्यास केला जातो. त्याच्या परांवर खुणचिठ्ठी (टॅग) लावून किंवा कवचावर ’सॅटेलाईट ट्रान्समीटर’ लावून. ’सॅटेलाईट ट्रान्समीटर’द्वारे आपल्याला दररोज त्यांची इत्यंभूत माहिती अवगत होते. 'कांदळवन कक्षा'ने 'भारतीय वन्यजीव संस्थान'च्या (डब्लूआयआय) मदतीने गुरुवार दि. २० नोव्हेंबर रोजी डहाणू येथील सागरी कासवाला 'सॅटलाईट टॅग' लावून समुद्रात सोडले होते. आता २९ डिसेंबर रोजी तिने पोरबंदरपर्यंत प्रवास केल्याची नोंद संशोधकांनी केली आहे.
समुद्रात सोडल्यानंतर १४ डिसेंबरपर्यंत धवललक्ष्मी डहाणूपासून ८० किलोमीटर अंतरावरच होती. मात्र, त्यानंतर तिने जोर धरला. २१ डिसेंबर रोजी तिचे स्थान सोमनाथ समुद्र किनाऱ्यापासून ८५ किलोमीटर अंतरावर, तर डहाणूपासून २०० किलोमीटर अंतरावरुन नोंदवण्यात आले. त्यानंतर २९ डिसेंबर रोजी ती पोरबंदरपर्यत पोहोचल्याची माहिती संशोधकांना मिळाली. सध्या ती डहाणूपासून ४०० किलोमीटर लांब असून पोरबंदर किनाऱ्यापासून १०० किलोमीटर अंतरावर आहे. आजवर तिने ४५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.