सह्याद्री राजस फुलपाखराची रत्नागिरीतून प्रथमच नोंद; 'या' देवराईतून झाली नोंद

    30-Dec-2025
Total Views |
sahyadri silver royal


मुंबई (अक्षय मांडवकर) -
'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत संरक्षण मिळालेल्या सह्याद्री राजस म्हणजेच 'सह्याद्री सिल्व्हर राॅयल' या फुलपाखराची रत्नागिरी जिल्ह्यातून प्रथमच नोंद करण्यात आली आहे (sahyadri silver royal). या फुलपाखराची महाराष्ट्रातील ही पहिलीच छायाचित्रित नोंद आहे (sahyadri silver royal). 'सह्याद्री संकल्प सोसायटी'च्या संशोधकांनी सोमवार दि. २२ डिसेंबर रोजी संगमेश्वर तालुक्यातील कुंडी गावातील देवराईमधून ही नोंद केली. (sahyadri silver royal)
कुंडी हे गाव संगमेश्वर तालुक्यातील देवरूखपासून साधारण १५ किमी अंतरावर आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात हे गाव असल्याने याठिकाणी उच्च प्रतीची जैवविविधता टिकून आहे. या गावापासून एक किलोमीटर अंतरावर महिमतगड आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेली श्री. केदारलिंगची देवराई आहे. देवराई जपल्याने याठिकाणी देखील सस्तन प्राण्यांची जैवविविधता उच्च दर्जाची आहे. कुंडी गाव आणि या देवराईमधून 'सह्याद्री संकल्प सोसायटी'च्या संशोधकांनी जानेवारी २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत ९५ फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद केली होती. त्यानंतर आता संस्थेचे संशोधक प्रतीक मोरे आणि विराज आठल्ये यांनी सह्याद्री राजस या दुर्मीळ फुलपाखराची नोंद कुंडीच्या देवराईमधून केली आहे.

सह्याद्री राजस हे फुलपाखरु राजस (सिल्व्हर राॅयल) या फुलपाखराची उपप्रजात आहे. जी सह्याद्रीसाठी प्रदेशनिष्ठ आहे. या प्रजातीच्या पंखाचा विस्तार ३० ते ४० मिमी असून त्यावर चांदी-निळ्या रंगाच्या खुणा आहेत. यापूर्वी या प्रजातीचा अधिवास पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील भागात असल्याचे ओळखले जात होते. मात्र, त्यानंतर या प्रजातीची नोंद आंबोली, पुण्यातील ताम्हिणी या भागामधून झाली. मात्र, त्याची छायाचित्रित नोंद नव्हती. कुंडी गावातून नोंदवलेल्या सह्याद्री राजस या फुलपाखराची नोंद ही राज्यातील या फुलपाखराची पहिली छायाचित्रित नोंद ठरली आहे. ही प्रजात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत द्वितीय श्रेणीत संरक्षित आहे.