‘इंद्र’दरबाराला गरज सिंहाची

    30-Dec-2025
Total Views |
Balen Shah
 
नेपाळच्या राजकारणात सध्या घडणार्‍या घडामोडी लोकशाही व्यवस्थेच्या स्थैर्याविषयी आणि भवितव्याविषयी मूलभूत प्रश्न उपस्थित करणार्‍या ठरतात. काठमांडूचे विद्यमान महापौर, कलाक्षेत्रातून राजकारणात प्रवेश केलेले आणि युवकवर्गात विलक्षण लोकप्रिय ठरलेले बालन शाह यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य पक्षाशी युती साधत पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली आहे. ही घडामोड नेपाळच्या राजकारणात एका नव्या प्रवाहाची नांदी ठरू शकते किंवा एका धोकादायक भ्रमाची सुरुवातही!
 
पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळ पुन्हा एकदा राजकीय अस्थैर्याच्या गर्तेत सापडला. राजेशाहीऐवजी लोकशाही स्वीकारल्यानंतरच्या गेल्या दशकभरात, नेपाळला एकही स्थिर, निर्णायक व दूरदृष्टीपूर्ण सरकार लाभलेले नाही. सत्तास्थापना आणि सत्ताभंग यांची आवर्तने, विस्कळीत आघाड्या आणि नेतृत्वाचा अभाव या सर्व कारणांनी ‘लोकशाही’ ही व्यवस्थाच नेपाळी जनतेच्या क्षोभाचे कारण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर बालन शाह यांचा उदय समजून घ्यावा लागतो. हा उदय एखाद्या व्यक्तीचा नसून, व्यवस्थेविरोधात साचलेल्या जनक्षोभाचे प्रतीक आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ग्रासलेली सत्तायंत्रणा आणि पारंपरिक राजकीय नेतृत्वाविषयीचा असंतोष या भावनांनांचे नेतृत्व शाह करताना दिसतात. विशेषतः ‘जेन-झी’ने रस्त्यावर उतरून सत्तेला आव्हान दिल्यानंतर, लोकप्रिय चेहर्‍यांकडे प्रकर्षाने राजकीय पर्याय म्हणून पाहिले जाऊ लागले आहे.
 
राष्ट्रीय स्वातंत्र्य पक्षाची भारतविरोधी भूमिका नसल्याचे जरी सांगितले जात असले, तरी नेपाळच्या तथाकथित ‘राष्ट्रीय अस्मितेच्या’ प्रश्नांवर या पक्षाची भूमिका भारताची अस्वस्थता वाढवणारीच आहे. सीमावाद, सार्वभौमत्व या भावनिक मुद्द्यांवरच नेपाळी राजकारणात वारंवार राजकीय पोळी भाजली जाते. परराष्ट्र धोरण हे भावनांच्या भरात नव्हे, तर विवेक आणि व्यवहार्यतेच्या आधारे ठरवले गेले पाहिजे; अन्यथा अल्पकालीन लोकप्रियता दीर्घकालीन राजनैतिक तणाव निर्माण करते. नेपाळच्या डाव्या सरकारांनी गेल्या काही वर्षांत, चीनच्या प्रभावाखाली आपली स्वायत्तता गमावल्याचा आरोप नवा नाही. कर्ज, पायाभूत प्रकल्प आणि राजकीय हस्तक्षेप यांचा फास चीन हळूहळू आवळत आहे. अशा स्थितीत अनुभवहीन नेतृत्व सत्तेवर आले, तर नेपाळचे परराष्ट्र धोरण अधिकच दिशाहीन होण्याची भीती आहे.
 
कलाकारांची राजकीय क्षमता यावर अलीकडच्या काळात युक्रेनच्या उदाहरणामुळे, प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. विनोदवीर म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या झेलेन्सकी यांना जनतेने सत्तेच्या सर्वोच्च स्थानावर बसवले. मात्र, आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुंतागुंतीचा सामना करताना अनुभवाचा अभाव किती महागात पडतो, याची प्रचिती युक्रेनच्या जनतेला आली आहे. ‘कावळ्याच्या हाती दिला कारभार आणि त्याने घाण करून ठेवला दरबार’ अशी युक्रेनच्या राज्यव्यवस्थेची अवस्था झाली आहे. लोकप्रियतेच्या मोहात घेतलेले निर्णय राष्ट्राच्या भवितव्याला कसे विवंचनेत टाकू शकतात, याचाच हा प्रत्यय. बालन यांच्याबाबतीतही हाच प्रश्न उभा राहतो. लोकप्रियतेच्या जोरावर सत्ता मिळवणे शक्य असले, तरी त्या सत्तेचे सुयोग्य वहन त्यांना करता येईल का? राष्ट्रपातळीवरील कारभार हाकताना परिपक्वता आणि दूरदृष्टीची सांगड घालावी लागते. सर्व आघाड्यांवर केवळ करिष्मा हा अपुराच ठरतो.
 
नेपाळमध्ये अधूनमधून राजेशाहीसाठी आंदोलने होतात. लोकशाही अपयशी ठरत असल्याचा समज जर जनमानसांत दृढ झाला, तर लोकप्रिय पण अनुभवहीन नेतृत्व हे संकटाला गती देणारेच ठरू शकते. लोकप्रियता, युवकांवरील प्रभाव आणि व्यवस्थेविरोधातील रोष ही बलस्थाने असू शकतात; मात्र राज्यशकट हा मंचावरील शब्दवैभवावर किंवा समाजमाध्यमांवरील प्रसिद्धीवर चालवता येत नाही. त्यासाठी संयम, विवेक आणि जागतिक वास्तवाचे भान महत्ताचे ठरते. करिष्मा क्षणभंगुर असतो; परंतु राष्ट्रकारभारासाठी शाश्वत बुद्धिमत्ता आवश्यक असते. शाह यांना काठमांडूच्या लोकप्रियतेपासून ‘इंद्र’ दरबारच्या सत्तेपर्यंतचा प्रवास आकर्षक वाटत असला, तरी तो नेपाळसाठी कितपत कल्याणकारी ठरेल, याचा निर्णय भावनेवर नव्हे, तर विवेकपूर्ण चिंतनावर आधारित असायला हवा, अन्यथा, त्याची किंमत पुन्हा एकदा सामान्य नेपाळी जनतेलाच मोजावी लागेल.
 
- कौस्तुभ वीरकर