मविआ दुभंगली!

    30-Dec-2025
Total Views |
MVA
 
काही गोष्टी शाश्वत असतात. त्यांच्यावर कशाचाही म्हणावा इतका फरक पडत नाही. त्यामुळेच त्या अजेय असतात. तसेच त्यांच्यावर बदलत्या काळाचा कोणत्याही प्रकारचा म्हणावा इतका प्रभाव पडत नाही. अशीच २५ ते ३० वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयी-अडवाणी या जोडगोळीने मिळून महाराष्ट्राला स्थैर्य देण्याच्या उद्देशाने भाजप-शिवसेना युती केली. पुढे महाजन-मुंडे यांनीही बाळासाहेबांशी जुळवून घेत महाराष्ट्र हितासाठी युती तुटेल, इथपर्यंत कधीच ताणले नाही. पण, बाळासाहेबांनंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी शक्य होईल, तेव्हा भाजपला चिमटीत पकडत आपला स्वार्थ साधण्याची एकही संधी सोडली नाही. पुढे तर २०१९ साली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच, मुख्यमंत्रिपदाच्या मोहापायी युतिधर्माला नख लावण्याचे काम केले. त्यातूनच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची मिळून अभद्र महाविकास आघाडी जन्माला घालण्याचे पाप ठाकरेंच्या आडून विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी केले. पुढील अडीच वर्षे या तीन पायांच्या रिक्षाने रडतखडत राज्याचा गाडा हाकला. पण, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना दणका देत आपला नैसर्गिक सहकारी असलेल्या भाजपबरोबर युती करत हिंदुत्व जपण्याचे काम केले.
 
आताही महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मविआ दुभंगल्याचे चित्र आहे. त्यात आपले बंधू राज ठाकरेंसोबत आल्याने उद्धव ठाकरे यांना आकाश ठेंगणे झाले असून दोन्ही काँग्रेससोबत वाटाघाटी करण्याची तसदी ठाकरेंनी घेतली नाही. परिणामी, दोन्ही काँग्रेसने सोबत लढवण्याचे जवळपास निश्चित केले. सोबत लढूनही विधानसभा आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये जिल्ह्यात मविआची पाटी कोरी राहिली. आता वेगळे लढून महापालिका निवडणुकीत दारुण अवस्था होईल, अशी भविष्यवाणी राजकीय जाणकार करत आहेत. त्यात मविआतील नेतेमंडळी विकासाच्या मार्गावर सुसाट निघालेल्या भाजपमध्ये दाखल होत असून भाजपच्या ‘१०० प्लस’हा नारा आणखी बुलंद करत आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीपर्यंत दुभंगलेली मविआ पूर्णपणे नेस्तानाबूत झाली, तर कोणालाही आश्चर्य वाटणार नाही.
 
युवराजांचा कलकलाट
 
राज्याचे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर शहरातील विविध भागांत वृक्षलागवड केल्यानंतर नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा प्रश्न काहीसा मागे पडला असून, महापालिका निवडणुकांचे वारे चांगलेच वाहण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिल्याने सर्वच पक्षांच्या चांगल्याच जोरबैठका सुरू आहेत. तत्पूर्वी मागील आठवड्यात उबाठा गट, काँग्रेस आणि शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत शहरातील बिनीच्या शिलेदार भाजपमध्ये प्रवेशित झाले. त्यानंतर खडबडून जाग आलेले उबाठा गटाचे युवराज आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीतून डोके काढत आपली पायधूळ नाशिकमध्ये झाडली. यावेळी त्यांनी अपेक्षेप्रमाणे तपोवनाला भेट दिली. तेथे पक्षांऐवजी आदित्य यांचा माध्यमांसमोर अधिक कलकलाट दिसला. माजी पर्यावरणमंत्री असलेल्या आदित्य यांनी तपोवन परिसराला ‘ग्रीन झोन’ घोषित करावे, अशी मागणी केली. तसेच पुणे शहरातील घटनेचा संदर्भ देत पंचवटीतील ‘एसटीपी’ प्रकल्पात अनियमितता झाल्याची शंका घेत चौकशीची मागणीही केली.
 
सिंहस्थाला विरोध नसून, माईस प्रकल्पासाठी पर्यायी जागा शोधावी, यावर जोर दिला. यावरूनच ठाकरे कुटुंबीय कायम विकासाच्या आड येत असल्याचे दिसून येते. सर्वसामान्य मुंबईकरांच्या रोजच्या धकाधकीशी निगडित असलेल्या आरे मेट्रो कारशेड उभारणीवेळीदेखील राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना खोडा घालण्याचे काम केले. आताही तपोवनातील प्रकरणावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार सुरू आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी नाशिकरोड येथे रावनाचे राज्य उलथावून श्रीरामांचे राज्य आणायचे आहे. अशी पोपटपंची केली. २५ वर्षे मुंबईला लुटणार्‍या ठाकरेंनी आपल्याला आपला महापौर या शहरात बसवायचा आहे. आमचे नाशिकवर प्रेम असून बिल्डरांवर नाही. आम्ही जे मुंबईत करून दाखवले, ते नाशिकमध्ये करून दाखवणार आहोत, असे नाशिककरांना स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न केला. पण, आता नाशिककर यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. भले आदित्य ठाकरेंना कितीही कलकलाट करू द्या!
 
- विराम गांगुर्डे