मुंबई : ( Dr. Ambedkar Mahaparinirvan Day ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी तसेच मुंबईत लाखो अनुयायी मोठ्या संख्येने दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिण्याचे पाणी, स्वच्छता, सूचना फलक, वैद्यकीय सुविधा, गर्दी नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि बेस्टच्या अतिरिक्त बसेस आदी सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी महापरिनिर्वाण दिनासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे अनावरण आणि माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. अनुयायांची सुरक्षितता आणि सोयीसुविधा अबाधित राहाव्यात, यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
चैत्यभूमी परिसरातील इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात विविध सूचना प्राप्त झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या अनुषंगाने समन्वय समिती स्थापन करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय गिरकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, बेस्टचे महाव्यवस्थापक सोनिया सेठी, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, जिल्हाधिकारी आंचल गोयल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.