सावध ऐका, पुढल्या हाका!

    29-Dec-2025   
Total Views |

2025 या वर्षामध्ये कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित तंत्रज्ञानाचा विकास आपण सगळ्यांनीच अनुभवला. आपल्या जीवनामध्ये ज्या सॉफ्टवेअर किंवा ॲप्सचा चंचूप्रवेश झाला होता, त्या गोष्टी आता जीवनाच्या अविभाज्य भाग झाल्या आहेत. बघताबघता कामाच्या ठिकाणी ‌‘चॅटजीपीटी‌’, ‌‘जेमिनी‌’ हे शब्द नित्याचेच झाले. त्याच्या शिक्षणाला महत्त्व येऊ लागले आहे. कर्मचारी ‌‘अपस्कील‌’ झाले नाहीत, तर त्यांची गच्छंती पक्की असल्याचे भाकीत अनेकांनी वर्तवले. एका बाजूला ‌‘घिबली‌’चा ट्रेंड असेल किंवा ‌‘एआय‌’च्या माध्यमातून तयार करण्यात आलेले व्हिडिओज, या सगळ्यांमुळेच तंत्रज्ञानाचे आकलन, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलला. रोजच्या रोज आपण समाज माध्यमांवर तासन्‌‍तास वेळ घालवू लागलो. आपल्या नकळत या माध्यमांचे आपण गुलाम झालो. एखाद्या गोष्टीवर आपली नजर किती काळ स्थिर राहते, आपण एखादी गोष्ट किती कालावधीमध्ये बघतो या साऱ्या गोष्टी टिपत, ही माध्यमे रोज नवीन कात टाकत आहेत. अशातच, आता एका सर्वेक्षणातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा माणसाच्या डिजिटल जीवनाभोवतीचा विळखा किती घट्ट झाला आहे, याबद्दलची माहिती समोर आली.

‌‘कॅपविंग‌’ नावाच्या कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, युट्यूबवर 20 टक्क्यांहून अधिक व्हिडिओ हे ‌‘एआय स्लोप‌’ या प्रकारामध्ये मोडतात. आता ‌‘स्लोप‌’ या शब्दाचा अर्थ म्हणजे ओसंडून जाणे. अगदी अशाच पद्धतीने युट्यूबवरती एका विशिष्ट पद्धतीचा ॲनिमेटेड कंटेंट आपल्याला आढळतो. यामध्ये काही माणसं, प्राणी हे आपआपसामध्येच संवाद साधताना दिसतात. त्यांच्या बोलण्याच्या शैलीवरूनच हा कंटेंट ‌‘एआय‌’जनरेटेड आहे, हे ओळखता येते. या सर्वेक्षणासाठी कंपनीने, प्रत्येक देशातील 100 अशा एकूण 15 हजार चॅनेल्सची माहिती गोळा केली. त्यामध्ये असे आढळून आले की, 278 चॅनेल्सवर केवळ ‌‘एआय स्लोप‌’वर आधारित कंटेंटच उपलब्ध आहे. यातील व्हिडिओ मजकुराचा ठाव घेण्यासाठी कंपनीने एक नवीन युट्यूब चॅनेल सुरु केले. त्यामध्ये त्यांना असे आढळले की, पहिल्या 500 व्हिडिओजपैकी 104 व्हिडिओ हे ‌‘एआय स्लोप व्हिडिओ कंटेंट‌’मध्ये मोडतात.

कंपनीच्या सर्वेक्षणानुसार अशा पद्धतीच्या व्हिडिओ, जगभरामध्ये 63 अब्जांपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारच्या व्हिडिओ मजकुराला पसंती दर्शवणारे, 221 दशलक्ष सबसक्राईबर्स जगभरामध्ये आहेत. (अर्थात, वाढता वाढता वाढे, या न्यायाने ही संख्या आणखीन वाढणार आहेच.) ‌‘एआय स्लोप‌’ व्हिडिओच्या निर्मितीमागे केवळ लक्ष आकर्षित करणे हा एकमेव उद्देश असतो, त्यामुळे व्हिडिओचा मजकूर नेमका काय आहे, तो किती चांगला आहे, किती वाईट आहे हा सगळाच भाग दुय्यम ठरतो. आजमितीला अशा प्रकारचा मजकूर दिवसेंदिवस लोकप्रिय होत असतान, त्याला डिजिटल युगाची समाजमान्यताही मिळत आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.

लोकांना नेमकं काय आवडतं, लोकं कुठल्या गोष्टीचा तिरस्कार करतात, याची बेरीजवजाबाकी करतच नवनिर्मिती केली जाते. यामध्येही ‌‘एआय‌’च्या मदतीनेच वेगवेगळे प्रयोगही केले जातात. युट्यूबवर असे असंख्य चॅनेल्स आहेत, जे लहान मुलामुलींना केंद्रस्थानी ठेवून सुरु केले गेले आहेत. वयवर्षे पाच ते 12 या गटातील मुलामुलींच्या हातात मोबाईल आल्यामुळे, आता कंटेंट क्रिएटर्ससाठी नवीनच बाजारपेठे खुली झाली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या सर्वव्यापी अस्तित्वामुळे, भविष्यात समाज म्हणून आपल्याला असंख्य गोष्टींवर विचार करावा लागणार आहे. ‌‘एआय‌’च्या क्रांतीवर स्वार होऊन नवनवीन तंत्रांचं दालन आपल्यासमोर उपलब्ध तर झाले आहेच, मात्र याची अपरिहार्यता आपल्या जीवनामध्ये कुठला बदल घडवणार आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ ‌’चॅटजीपीटी‌’मुळे सॉफ्टस्किल्सवर काम करणे थांबणार असेल, तर ही धोक्याचीच घंटा आहे. महात्मा गांधींनी आपल्या कार्यकाळात ‌’साधन‌’ आणि ‌’साध्य‌’ या दोन्ही गोष्टींवर चिंतन केले होते. येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आपली जीवनशैली जर आपलं साधन असेल, तर आपलं साध्य काय? आपल्याला हे जग कसे घडवायचे आहे? याची वैचारिक बैठक पक्की करावी लागेल.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.