
मुंबई : अनेकदा सिने कलाकार, खेळाडू राजकारणात उतरताना दिसतात. अशातच आता आणखी एक मराठी अभिनेत्री राजकारणात डावपेच खेळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम वेळ जवळ येत असून केवळ २९ आणि ३० डिसेंबर हे दोनच दिवस उरले आहेत. त्यातच आता मुंबई महानगरपालिकेसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. २२७ प्रभाग असलेल्या मुंबई महापालिकेची ही निवडणूक सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावे गुप्त ठेवण्यात आली होती.
अशा पार्श्वभूमीवर भाजपकडून ६६ उमेदवारांची पहिली यादी अखेर जाहीर झाली आहे. रविवारी रात्री पक्षाकडून काही इच्छुकांना एबी फॉर्म्स देण्यात आले. या यादीतील एक नाव विशेष लक्ष वेधून घेत आहे. आणि ती म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निशा परुळेकर. विविध चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी निशा परुळेकर आता थेट राजकीय मैदानात उतरली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने निशाला अधिकृत उमेदवारी दिल्याने मनोरंजन आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
२०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘रमाबाई भीमराव आंबेडकर’ या चित्रपटात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांची प्रभावी भूमिका साकारून विशेष ओळख निर्माण केली. निशा परुळेकरने रंगभूमीवरही आपली छाप उमटवली असून भरत जाधव यांच्यासोबत ‘सही रे सही’ या लोकप्रिय नाटकातही काम केलं आहे. कोठारे व्हिजन्सच्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेत त्यांनी महालक्ष्मी अंबाबाईची भूमिका साकारत प्रेक्षकांची दाद मिळवली. अभिनय क्षेत्रात अनेक वर्षे सक्रिय राहिल्यानंतर आता राजकारणात प्रवेश करत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
निशा परुळेकरने ‘रमाबाई भीमराव आंबेडकर’, ‘बाबो’, ‘पारख नात्यांची’ आणि ‘प्रेमाचे नाते’ अशा विविध चित्रपटांतून महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा जन्म १९ सप्टेंबर १९७४ रोजी मुंबईत झाला. शिक्षणासाठी त्यांनी चेंबूर येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे.