मुंबई : सिनेविश्वातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मराठी अभिनेत्रीने खंडणी घेतली असून तिला रंगेहात अटकही करण्यात आली आहे. गोरेगाव येथील एका बिल्डरकडून तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी घेतल्याच्या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक महिला मराठी अभिनेत्री तसेच एका प्रसिद्ध अभिनेत्रीची सून असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे सिनेविश्वात एकच खळबळ उडाली. हेमलता पाटकर असं या अभिनेत्रीचं नाव असून ती छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय अभिनेत्रीची सून असल्याचे समोर आले आहे.
कांदिवलीतील हेमलता पाटकर आणि सांताक्रूझमधील अमरिना झवेरी यांनी मिळून एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली होती. या धमकीच्या आधारे त्यांनी १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या खंडणीतील पहिला हप्ता म्हणून दीड कोटी रुपये स्वीकारत असतानाच मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने दोघींनाही रंगेहाथ अटक केली.
दरम्यान, हेमलता पाटकर ही अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून आहे. अर्चना या मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी काम केले आहे. तसेच स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ मध्ये कांचन देशमुख ही भूमिका त्यांची प्रंचड गाजली होती. या प्रकरणामुळे तिचं नाव चर्चेत आल्यानंतर मनोरंजन विश्वातही मोठी चर्चा सुरू झाली आहे. खंडणी प्रकरणात आरोपी ठरलेल्या हेमलता पाटकर आणि अमरिना झवेरी यांना २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेनंतर सुरुवातीला दोघींनाही पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. या कोठडीची मुदत संपल्यानंतर शनिवारी त्यांना एस्प्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयाने पुढील तपासासाठी त्यांची पोलीस कोठडी सोमवारपर्यंत वाढवण्याचे आदेश दिले.
नेमकं काय घडलं?
नोव्हेंबर महिन्यात अंधेरी पश्चिमेतील एका हॉटेलमध्ये एका नामांकित बिल्डरच्या मुलाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी लेझर लाइट्सच्या वापरावरून हेमलता पाटकर आणि अमरिना झवेरी यांचा बिल्डरच्या मुलाशी वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक स्वरूपात असलेला हा वाद पुढे इतका चिघळला की त्याचे रूप हाणामारीत झाले.
या घटनेनंतर २३ नोव्हेंबर रोजी दोन्ही महिलांनी संबंधित तरुणाविरोधात पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. ही तक्रार मागे घेण्यासाठी त्यांनी बिल्डरकडे सुरुवातीला १० कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. नंतर दोन्ही बाजूंमध्ये चर्चा होऊन ही रक्कम ५.५ कोटी रुपयांवर ठरवण्यात आली. मात्र सततच्या दबावामुळे त्रस्त झालेल्या बिल्डरने अखेर मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत खंडणीचा पहिला हप्ता स्वीकारत असताना हेमलता आणि अमरिना यांना रंगेहाथ अटक केली.
दरम्यान, पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली की हेमलता पाटकर हिच्याविरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात यापूर्वीच भारतीय दंड संहितेच्या कलम ४५२, ३२३ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींनी याआधीही अशा स्वरूपाचे गुन्हे केले आहेत का, याची सखोल चौकशी आवश्यक असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितलं. या कारणास्तव न्यायालयाने आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याचा निर्णय घेतला.