श्रद्धेच्या वाटेवरील ‌‘वंदना‌’

    29-Dec-2025   
Total Views |

अस्खलित संस्कृत उच्चारांवर भर देत, पौरोहित्य करणाऱ्या महिला पुरोहित वंदना अरूण तेंडुलकर यांच्याविषयी...

वंदना यांचे बालपण मुंबईतील गोरेगाव इथले. त्यांचे वडील आत्माराम उपेंद्र थळी, गोव्याहून नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झाले. आई इंदिरा या गृहिणी असल्या, तरी त्यांना शिवणकामाचा छंद होता. त्यातूनच त्या संसारालाही थोडाफार हातभार लावत. आई, वडील आणि वंदना यांची तीन भावंडे, असे त्यांचे कुटुंब होते. वंदना यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच, एका खासगी कंपनीत क्लेरिकल विभागात नोकरी करण्यास सुरुवात केली. एकीकडे शिक्षण आणि दुसरीकडे नोकरी असा त्यांचा प्रवास, दहा वर्षे सुरू होता. त्यातच त्यांना डोंबिवलीतील अरूण आनंदराव तेंडुलकर यांचे स्थळ चालून आले आणि त्यांचा विवाह झाला. अरूण पेशाने विद्युत अभियंता होते.

तेंडुलकर यांच्या एकत्र कुटुंबात आता वंदनाही दाखल झाल्या होत्या. पुढे त्यांच्या या संसाररूपी वेलीवर नेहा नावाचे एक फूलदेखील उमलले. नेहा या आयटी इंजिनिअर असून, सध्या त्या अर्थाजन करत आहेत.

वंदना या मालाडमधील सद्गुरू दिवगंत वासुदेव नृसिंह पै यांच्या गेली 44 ते 45 वर्षे अनुग्रहित शिष्या आहेत. या प्रवासातच त्यांची डोंबिवलीतील साधिका संध्या यांच्याशी भेट झाली आणि त्यांचा पुढील जीवनप्रवास, एका वेगळ्याच मार्गाने सुरू झाला. संध्या यांच्या घरी योगाभ्यास शिकण्याच्या निमित्ताने महिलांचा एक समूह भेटू लागला. त्याचबरोबरीने संस्कृत स्तोत्र शिकण्यासदेखील प्रारंभ झाला. त्यानंतर ‌‘ज्योतिष संशोधन मंडळा‌’त ज्योतिष अभ्यासाचे धडेदेखील त्यांनी गिरवले. पुढे ज्योतिषशास्त्री ते होरा मार्तंड (पंडित), हस्तसामुद्रिक शास्त्र, वास्तुशास्त्र (बेसिक)अशा विविध परीक्षा प्रथम श्रेणीत त्या उत्तीर्ण झाल्या. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास पूर्ण झाल्यावर वर्तमानपत्रात साप्ताहिक ज्योतिष भविष्य, दिनदर्शिकेमध्ये मासिक भविष्य आणि ‌‘धनुर्धारी‌’ या दिवाळी अंकातही गेली कित्येक वर्षे राशीभविष्याचे लेखन केले आहे. लॉकडाऊनमुळे ‌’धनुर्धारी‌’ मासिक बंद झाले व दिवाळी अंकाचे भविष्य लेखन 2023 पासून त्यांनी थांबविले. ‌‘मैत्रीण‌’, ‌‘गृहवेध‌’ व ‌‘ब्रह्मज्ञान‌’ अशा दिवाळी अंकांतदेखील त्यांनी ज्योतिषविषयक लेख लिहिलेले आहेत. गेल्या 20 वर्षांपासून त्यांचा ज्योतिषसराव अविरतपणे चालू आहे.

त्यांच्या या कामाची दखल घेत ‌‘काव्यधारा मंडळा‌‘तर्फे 2017च्या महिला दिनी त्यांना ‌‘महिला गौरव पुरस्कारा‌’ने सन्मानितही करण्यात आले. तसेच त्या मागील 24 वर्षे शास्त्रोक्त षोडशोपचार पद्धतीने पौरोहित्यदेखील्ा करत आहेत. त्यात प्रामुख्याने महिलांचा समूह घेऊन, श्रावणमासी किंवा अन्य कधीही यजमानांच्या आमंत्रणावरून लघुरुद्राभिषेक, नवरात्र अथवा एरव्ही संस्कृत सप्तशतीपठण, श्रीसूक्त पारायणे, आवर्तने, विष्णुसहस्त्रनाम असे विविध उपक्रम त्या करत असतात. तसेच त्या वैयक्तिक पातळीवर सत्यनारायण पूजा, गणपती प्रतिष्ठापना, हरतालिका व्रतपूजन, महालक्ष्मी पूजन, गृहप्रवेश, गणेशपूजन इत्यादी धार्मिक कार्येदेखील त्या करतात.

यजमानांकडून कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता, मनोभावे सेवा करण्याचे काम त्या आजवर करत आल्या आहेत. याशिवाय, त्यांनी गेल्या 15 वर्षांपासून लहान मुलांना अथर्वशीर्ष, महिलांना श्रीसूक्त अशी संथा देण्याची कामदेखील केली आहेत. लॉकडाऊनच्या काळात संथा देण्याच्या सेवेत खंड न पडू देता, ऑनलाईन संथेची सेवा अखंडपणे चालू ठेवली. या वर्गात मुंबई-पुणेसह महाराष्ट्रातून व परदेशस्थ भारतीय बालके, महिला, पुरुष यांचा मोठा सहभाग असतो. वंदना यांच्या पौरोहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन, ‌‘पै फ्रेंड्स लायब्ररी‌’तर्फे 2024च्या महिला दिनानिमित्त त्यांचा सन्मानही करण्यात आला. पौरिहित्य करत असतानाच, संस्कृतचे उच्चार अस्खलित करण्यावरच त्यांचा विशेष भर असतो.

वंदना यांना लेखनकला आणि कविता करण्याचाही छंद आहे. 2016च्या डिसेंबर महिन्यामध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, कल्याण-डोंबिवली भाजपतर्फे ‌‘नोटाबंदी‌’ या विषयावर काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेत वंदना यांनी आपली कविता सादर केली. त्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले. ऑगस्ट 2020 मध्ये लॉकडाऊनच्या काळात ‌‘ऑल इंडिया काऊन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग ॲण्ड रिसर्च प्रा. लि.‌’ या संस्थेतर्फे आयोजित ‌‘श्रावणधारा-काव्यधारा‌’ या काव्यस्पर्धेत त्यांची ‌‘श्रावणानंद‌’ ही कविता उत्तेजनार्थ बक्षिसाची मानकरी ठरली. मार्च 2022 मध्ये ऑनलाईन पूर्ण महाराष्ट्रातून ‌‘सप्तरंग अकादमी‌’च्यावतीने ‌‘होळी‌’ या विषयावर ‌’रंगारंग‌’ या काव्यमैफील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यालादेखील चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये वंदना यांच्या ‌‘होळी धूळवड‌’ कवितेला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक व सन्मानचिन्ह मिळाले.

2021 साली ठाण्यातील ‌‘समस्त कोष्टी हितकारिणी मंडळा‌’ने आयोजन केलेल्या ऑनलाईन अध्यात्मिक सत्राला, ज्योतिष मार्गदर्शक म्हणून वंदना यांना आमंत्रण होते. त्या सत्रात ज्योतिषविषयक 12 राशींच्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव व इतर अशा सगळ्या बाजूने वंदना यांनी त्यांचे विचार मांडले. वंदना यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’च्या हार्दिक शुभेच्छा.