_202512281918387010_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
नवी दिल्ली : (Ram Sutar)जागतिक ख्यातीचे शिल्पकार आणि महाराष्ट्र भूषण डॉ. राम वंजी सुतार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमधील भीम प्रेक्षागृहात सभा आयोजित करण्यात आली. सुतार यांचे गेल्या १८ डिसेंबरला नोएडा येथे निधन झाले होते. या सभेत विविध मान्यवरांनी त्यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे शोकसंदेश वाचून दाखवण्यात आले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. सुतार यांच्या बालपणापासून शिल्पकलेतील प्रवास, स्टॅच्यू ऑफ युनिटी तसेच मुंबईतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीपर्यंतचा उल्लेख केला. डॉ. सुतार यांच्या कलाकृती समाजाला प्रेरणा देणाऱ्या असून इतिहासाची जाणीव जागृत करतात. त्यांच्या कलावारशाचा वारसा पुढेही कायम राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी यावेळी श्रद्धांजलीपर भाषण केले. त्यांनी सांगितले, राम सुतार यांनी महाराष्ट्राच्या एका छोट्या गावातून आपला जीवनप्रवास सुरू करत आपल्या श्रेष्ठ कलाविष्काराने जागतिक स्तरावर ठसा उमटवला. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सारख्या महान कलाकृती त्यांच्या सार्थ कर्तृत्वाची साक्ष देतात. विविध महान विभूतींची अचूक शिल्पे साकारणाऱ्या सुतार यांच्या दीर्घ कलासाधनेचा आणि बहुआयामी प्रतिभेचा गेल्याच महिन्यात महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव केल्याची स्मृती त्यांनी यावेळी जागवली.