८० वर्षांचा तरीही 'जेन- झी'पेक्षा जास्त 'जेन- झी' असलेला माणूस माझा मित्र शेखर कपूर
28-Dec-2025
Total Views |
दि. 6 डिसेंबर रोजी शेखर कपूर 80 वर्षांचे झाले. वय सांगितलं, तर काहीसं विचित्र वाटतं. कारण, त्याच्या डोक्यातलं वय अजूनही 18 ते 25 दरम्यान आहे. काही दिग्दर्शक त्यांच्या ‘फिल्मोग्राफी’मध्ये अडकतात. शेखर पुढच्या अज्ञातात उडी मारतो...
1999 मधल्या थंडीत लंडनच्या भारतीय वाणिज्य दूतावासात मी त्याला पहिल्यांदा पाहिलं. मोठं झुंबर वरून खाली उतरत होतं, महोगनीच्या लाकडाचा आवाजसुद्धा साधा खासदारासारखा वाटत होता आणि सभागृहात, त्या संध्याकाळचं एक वेगळंच वजन होतं. दूतावासातील फक्त दोन माणसे माझ्या स्मरणात राहिली, एक मी आणि दुसरा शांतपणे उभा राहिलेला एक सिनेमा जगण्यासारखा घेऊन फिरणारा माणूस. त्या क्षणाचं नाव होतं शेखर कपूर. तो शब्द नव्हे, नजर वापरतो आणि नजरेतली एकाग्रता इतकी प्रभावी असते की, समोरच्याचं आयुष्यही प्रभावीत होऊ लागतं.
तो दिवस गेला, पण त्याची नजर गेली नाही. माझ्यासारखा सतत गडबडीत बोलणारा माणूस, त्याच्यासारख्या शांत श्रोत्याला भेटला की आयुष्य बदलल्यासारखे वाटे. त्यावेळी माझ्या गांभीर्याने एक गोष्ट लक्षात आली की, जगात बोलणारे लाखो असतील, पण उत्तम श्रोते काहीच आहेत आणि त्यात पहिला क्रमांक निर्विवाद शेखरचा.
लंडनपासून न्यूयॉर्कपर्यंत, नंतर दुबईपासून मुंबईपर्यंत अशा अनेक ठिकाणी मी त्याच्यासोबत फिरलो आहे. सेंट्रल पार्कमध्ये त्याच्यासोबत चालताना मला नेहमी असं वाटे की, आज काहीतरी जबरदस्त होणार आहे. पण, भलतीच गोष्ट घडायची. मी एक तास बोलायचो, तो एक तास ऐकायचा. शेवटी थांबून दोन शब्द बोलायचा आणि त्या दोन शब्दांनीच, पुढची माझी दोन वर्षे बदलत. ऐकणारा आणि ऐकतानाच डोळ्यांनी सगळी संपादने करणारी माणसे, जगात फारच कमी आहेत.
शेखरला मी दिग्दर्शक म्हणून कधीच बघितलं नाही. कारण आम्ही भेटलो, तेव्हा मी अर्थार्जन करत नव्हतो आणि त्याला माझ्यात चित्रपटाला आवश्यक कौशल्य दिसत नव्हतं. पण, त्याने माझ्यात दडलेला कथावाचक ओळखला होता. गंमत म्हणजे, मी माझ्या आयुष्याच्या कथा त्याला सांगत होतो, तरी त्याला माझ्यापेक्षा माझ्या वडिलांच्या कथा जास्त आवडत असतं. माझे वडील शाळेत गेले नव्हते, पण त्यांच्या आयुष्याची नाट्यमय जडणघडण त्याला मनापासून आवडायची. दुबईत त्याच्याकडे राहायला गेलो की तो मित्र बोलावून मला म्हणायचा, “राज, त्या तुझ्या बाबांच्या गोष्टी सांग.” त्यावेळी मला असे वाटे की, जणू तो माझ्या कथा सांगण्यात एखादा छोटा सिनेमा बघतोय!
त्याच्यातील गोंधळ हेच त्याचे सौंदर्य आहे. त्याचा ईमेल आयडीही ’existinchaos!' कुणीही हा आयडी ठेवत नाही; पण हा माणूस स्वतःमध्ये असलेल्या गोंधळातच स्थिर राहतो. इतरांना त्यात गोंधळ दिसतो; त्याला मात्र त्यात एक पॅटर्न दिसतो! इतरांना समस्या दिसतात, त्याला कथा दिसतात! त्याच्याकडे बसल्यानंतर समजतं की हा साधारण माणूस नाही, तर कुतूहलाचा अखंड झरा आहे. वयाच्या 80व्या वर्षी ‘क्रिप्टोकरन्सी स्टोरीटेलिंग एआय’ अशा शब्दांविषयी जास्त उत्सुकता असलेला माणूस मी पाहिलेलाच नाही. मात्र शेखर म्हणतो की, “राज ‘एआय’ वापरण सुरू कर, आपण बिलियन्स करू.” त्याचं हे वाक्य ऐकताना मला ते विनोद वाटत नसे. कारण जगातील सर्वोत्कृष्ट श्रोता संगतो, तेव्हा काहीतरी चांगलंच होणार असतं.
त्याच्या आयुष्यातील घटना बघितल्या की, अर्ध सत्य आणि अर्ध मिथक वाटतं. त्याचा जन्म दि. 6 डिसेंबर 1945 रोजी लाहोरमध्ये झाला. आई विमला कपूर आणि वडील मदन कपूर हे डॉक्टर होते. तो सीए झाला लंडनमध्ये. ’प्राईज वॉटरहाऊस’मध्ये कामही केलं. मग अचानक अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दिग्दर्शनही केलं आणि दिग्दर्शनामध्ये अशी उडी मारली की ‘मासूम’मध्ये संवेदनशीलतेची, ‘इंडिया’मध्ये जादू, ‘बँडित क्वीन’ आणि ‘रॉ’मध्ये कटू सत्य, ‘एलिझाबेथ’मध्ये भव्य इतिहास, ‘द फोर फीदर्स’मध्ये जगातल्या भीतीच्या कथा त्याने भव्यपणे साकारल्या. असा कोण दिग्दर्शक असतो, जो त्याच्या सगळ्या चित्रपटात पुनरावृत्ती टाळतो .
‘बँडित क्वीन’ हा एक मैलाचा दगड. फुलन देवीवरचा हा सिनम्मा ज्या पद्धतीने त्याने साकारला, त्याने भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अनेक गृहीतकांना धक्का बसला. ‘एलिझाबेथ’ने त्याला जगात वलय मिळवून दिले. केट ब्लँचेटने एका मुलाखतीतमध्ये सांगितलं होत की, “शेखर चित्रपट नाही, तर तुमच्या आत्म्याचे दिग्दर्शन करत असतो,” हे एकच वाक्य शेखर काय आहे, ते सांगण्यासाठी पुरेसे आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितलं की, “मी चित्रपटनिर्मिती करत नाही, तर मानवी आयुष्यातील विरोधाभास दाखवतो.” ही ओळ फक्त तल्लख बुद्धी असलेल्यांच्याच डोक्यातून येऊ शकते.
हा कलाकार म्हणजे विरोधाभासाचं संग्राहालय ठरावं, जुन्या काळातला ‘जेन-झी.’ 80 वर्षांचा मुलगा आणि 18 वर्षांचा तत्त्ववेत्ता. मी ‘छोटा भीम’ची कल्पना सांगितली, तेव्हा त्याने “लगेच फ्रँचायझी घे,” असं सांगितलं. दोन कोटी किंमत ऐकून मी धाडस नाही केले, आज त्याची किंमत 500 कोटी आहे. त्याने ‘ब्लॅकबेरी’च्या काळात सांगितलं की, मोबाईल कॅमेर्यामुळे प्रत्येकजण फिल्ममेकर होणार आणि आज रिल्स मला त्याच्या द़ृष्टिकोनाची आठवण करुन देतात. त्याने सांगितलं होत की, भारत हीच तुझी जागा आहे, अमेरिका नाही. आणि मी आज जिथे आहे, ते त्याचं ऐकून केलेल्या एक चुकीच्या आणि एका बरोबर निर्णयामुळे! त्याच्याकडे पैसा आणि तत्त्वज्ञान दोन्ही एकाच डब्यात ठेवता येतात. तो स्टोरीटेलिंगमध्येही नावीन्य शोधतो. त्याला सत्यावर आधारित कथा अधिक भावते. मी माझ्या बाबांच्या कथा सांगतो, तेव्हा तो त्याला एखाद्या निर्मात्याच्या नजरेतून बघतो. हे सगळं बघता, मला एकच जाणवतं की श्रोता होणे ही जगातील दुर्मीळ गोष्ट आहे. जगातले मोठे मोठे दिग्दर्शक बोलतात; हा एकमेव दिग्दर्शक आहे जो ऐकतो.
दि. 6 डिसेंबरला शेखर कपूर 80 वर्षांचे झालेत. वय सांगितलं, तर विचित्र वाटतं, कारण त्यांचे मानसिक वय अजूनही 18 ते 25 दरम्यानच आहे. त्याची उत्सुकता काहीतरी नावीन्यनिर्मिती करत राहते. काही दिग्दर्शक त्यांच्या ‘फिल्मोग्राफी’मध्ये अडकतात, शेखर पुढच्या शोधासाठी उडी मारतात. मला विचाराल तर मी सरळ म्हणेन की, माझे दिग्दर्शक फक्त दिग्दर्शक नसून, माझे दिग्दर्शक आणि श्रोतेही आहेत. त्यातील पहिले आणि शेवटचे नाव म्हणजे शेखर कपूर! शेखर, तुझे डोळे, तुझी शांतता आणि तुझं संभ्रमातलं अस्तित्व म्हणजे जगण्याचं एक महाकाव्य आहे. तू आहेस, म्हणूनच जगाला रहस्य समजतंय. तू आहेस, म्हणून मला मी आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या प्रिय मित्रा, मार्गदर्शक आणि जगातील सर्वांत उत्तम श्रोता शेखर कपूर. तू वय वर्षे 80च्या देहामध्ये अडकलेला, 18 वर्षांचा मुलगा आहेस आणि मला जगणे शिकवल्याबद्दल धन्यवाद!