रुईया महाविद्यालय आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठात त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. ‘रशियाची भारताला आर्थिक मदत’ या विषयावरील संशोधनपर अध्ययनातून त्यांनी, ‘विद्यावाचस्पती’ ही पदवी संपादन केली. त्यामुळे राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, परराष्ट्रनीती इत्यादी बद्दलचे ज्ञानभांडारच त्यांच्यापाशी आहे. अत्यंत महत्त्वाची बाब अशी की, ते ज्ञान आणि याविषयीची जाण अद्ययावत ठेवण्याची अतिशय उत्कट जिगीषा त्यांच्या वृत्ती-प्रवृत्तीमध्ये पुरेपूर भरलेली आहे. तितकीच महत्त्वाची बाब म्हणजे, आपल्याकडील ज्ञान अतिशय सुगम भाषेत मुक्तहस्ते उपलब्ध करून देण्याच्या कामीही ते सदैव तत्पर असतात. अलीकडच्या काळात अलिप्तता, कोरडेपणा, आत्मकेंद्रितता ही विचारवंताची लक्षणे समजली जाऊ लागली आहेत. अशोकरावांच्या व्यक्तिमत्त्वात या आणि अशा अहंमान्यतेकडे जाणार्या वृत्तींना तिळमात्रही थारा नाही. हा अत्यंत दुर्मीळ गुणच समजला पाहिजे. शैक्षणिकविश्वात तर त्यांनी अत्यंत समृद्ध कारकीर्द बजावलीच; अजूनही बजावत आहेत. बिलासपूर, छत्तीसगढ येथील गुरू घासीदास विश्वविद्यालय या केंद्रीय विद्यापीठाचे कुलपती, ’महाविद्यालय मानांकन समिती’ अर्थात ‘एनएसीसी’चे सदस्य, ’भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद’ अर्थात ‘आयसीसीआर’चे सदस्य अशा सन्मानाच्या पदांवर त्यांनी समर्थपणे काम केले आहे. त्याशिवाय, समाजजीवनाच्या अन्य महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्येही त्यांनी, कर्तबगारी गाजविली आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य या नात्याने, सलग दहा वर्षे कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले.
याकाळात त्यांना ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले. सामाजिक संस्था-संघटनांमध्येही ते निरलसपणे प्रदीर्घकाळ काम करत राहिले आहेत. देवबांध, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर येथील ‘सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघ’ या संस्थेचे त्यांनी अध्यक्ष या नात्याने दीर्घकाळ नेतृत्व केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही मुंबई शाखा अध्यक्ष, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ कार्य केले. त्याकाळात डॉ. मोडक डोंबिवली येथे निवास करीत. दिवसभर मुंबई विद्यापीठ, त्यानंतर माहीम येथील एका खासगी संस्थेत पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अध्यापन, संध्याकाळी विद्यार्थी परिषदेच्या माटुंगारोड येथील कार्यालयात; कधीकधी तर बैठक संपायला नऊ-साडेनऊ वाजत. त्यानंतर रेल्वेने डोंबिवली असा त्यांचा भरगच्च दिनक्रम असे. तरीही, ते सदैव ताजेतवाने-प्रसन्न असत. विद्यार्थी परिषदेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली वावरताना सर्वात ठळकपणे जाणवणारी बाब म्हणजे, त्यांच्या वृत्ती आणि वर्तनातील सहजता, सामाजिकता, विशेषतः समाजातील दुर्बल वर्गाविषयीची तळमळ हा त्यांच्या वृत्तीचा स्थायीभाव असल्याचे ठळकपणे जाणवत असे. आम्हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, कार्यक्रमांची आखणी करताना सामाजिक समतेच्या प्रस्थापनेची आकांक्षा सर्वांच्या मनात रुजविण्याची धडपड ते मनापासून करीत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने जी कार्यक्रमांची रचना परिषदेतर्फे आखली गेली, त्यात सावरकरांच्या चरित्रातील ‘रत्नागिरी पर्व’ आणि अस्पृश्यता निवारणासाठी स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या प्रयत्नांचा प्रचार आणि समता भाव जागरण यावरच मुख्य भर दिला जावा, असा आग्रह त्यांनी धरला. विद्यार्थी परिषदेतर्फे त्याच दृष्टीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर समता ज्योत यात्रा’ आयोजित करण्यात आली होती. सामाजिक समतेची सतत प्रज्वलित राहणारी मशाल घेऊन, परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सुमारे 45 दिवस चाललेल्या या यात्रेद्वारे महाराष्ट्राच्या सर्व भागांत प्रवास करून, सामाजिक समतेचा जागर केला. जिल्ह्या-जिल्ह्यांत या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक ‘तराळ-अंतराळ’ या आत्मकथेचे लेखक आणि बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव खरात, ‘बलुतं’कार दया पवार, प्रा. केशव मेश्राम, प्रख्यात तत्त्वचिंतक दाजी पणशीकर आदी अनेक मान्यवरांनी या ज्योतीचे स्वागत केले.
एकूणच, सामाजिक समता-समरसतेच्या प्रस्थापनेच्या कामी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे योगदान भरीव आणि महत्त्वपूर्ण राहिले. त्यातील अग्रक्रमाचा वाटा डॉ. अशोकराव मोडक यांच्या मार्गदर्शनाचा होता. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्षपद समर्थपणे सांभाळण्याच्या काळातही त्यांनी, देशभरच्या प्रवासात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अतिशय अभ्यासपूर्ण भाषणे केली. डॉ. मोडक यांनी केलेली शेकडो भाषणे, हजारो पानांचे लेखन, प्रकाशित झालेली त्यांची 30हून अधिक पुस्तके इत्यादींमधून वाहणार्या चिंतनाचा स्थायीभाव केवळ आणि केवळ राष्ट्रीयता आणि सामाजिकता हाच राहिल्याचे दिसून येते. ‘स्वामीजी लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीर’, ‘अयोध्या आंदोलनाचा ताळेबंद’, ‘एकात्म मानव दर्शन (इंग्रजी)’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ही आणि अशी अनेक पुस्तके त्यांच्या तर्कशुद्ध, अध्ययनशील विमर्शाची ठळक साक्ष देतात. विरोधी, विघटनवादी व परपोषित वाङ्मयाचा ठाम प्रतिवाद करतानाही त्यांनी वस्तुनिष्ठता, तर्कशुद्धता आणि राष्ट्रीयता यांची कास कधीच सोडली नाही, हे विशेष.
डॉ. मोडक यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वृत्ती-प्रवृत्तींचा परामर्श घेताना, त्यांच्या कुटुंबीयांच्याही तितक्याच समर्थक आणि समंजस भूमिकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अंजली वहिनी याही उच्चविद्याविभूषित आणि कर्तबगार आहेत. पर्यावरणशास्त्रातील संशोधनाद्वारे त्यांनी ‘पीएच.डी.’ ही पदवी संपादित केली आहे. उल्हासनगर येथील शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केले. दोघांनीही व्यावसायिक स्तरावरील अतिशय व्यस्त दिनक्रम अंगीकारतानाही, प्रापंचिक कर्तव्याचे कसोशीने पालन केले. आज त्यांची दोन्ही मुले (अर्चना आणि आशिष) आपापल्या क्षेत्रात कर्तृत्ववान आणि समर्थ कारकीर्द पार पाडत आहेत. अर्चनाने आपले उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतर, काहीकाळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम केले. या सर्वांची अत्यंत समर्थ आणि भक्कम साथ अशोकरावांना लाभली. एवढेच नव्हे, तर त्या सर्वांनीही आपापल्या क्षेत्रात नैपुण्यही कमाविले. अर्चनाने ‘एमएससी’पर्यंतचे शिक्षण विशेष गुणवत्तेसह पूर्ण केले. सध्या ती आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे गणित प्रशिक्षणवर्ग चालविते. आशिष एका बहुराष्ट्रीय आणि मानांकित हॉटेलच्या साखळीत व्यवस्थापनाचे, विशेषतः व्यवसाय विकासाच्या व्यवस्थापनाचे दायित्व सांभाळीत जगभर प्रवास करीत आहे. आज ‘जीवनगौरव’ पुरस्कार डॉ. अशोक मोडक यांच्या नावे जाहीर झाला असला, तरी त्यांचा सारा परिवारच या पुरस्काराचा धनी आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
डॉ. अशोकराव यांनी नुकतीच आपल्या वयाची 85 वर्षे पूर्ण केली. निसर्गक्रमामुळे या वयात स्वाभाविक असलेली काहीशी शारीरिक दुर्बलता आली असली, तरीही त्यांच्या चित्तवृत्तीतील टवटवी आणि प्रसन्नता तसूभरही कमी झालेली नाही. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर शारीरिक व्याधींशी ते समर्थ सामना करीत असून, कृतार्थतेने आपले जीवन संपन्न करीत आहे. आयुष्यभर आपल्या सार्या कर्तृत्व, शक्ती, बुद्धिमत्ता आणि वैचारिक अस्त्रे-शस्त्रे परजून, या विचाराचा आणि ध्येयवादाचा पुरस्कार त्यांनी अत्यंत निष्ठेने केला. तो विचार आज राजकीय, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय वैश्विक क्षितिजांवर सुप्रसिद्ध झाला आहे, याबद्दलची धन्यता त्यांच्या प्रसन्नतेला आणि स्वप्नपूर्तीच्या आकांक्षांना बळ देत आहे. ‘चतुरंग प्रतिष्ठान’ या अत्यंत वैभवशाली, सांस्कृतिक संस्थेचा उत्तुंग लौकिक प्राप्त असलेला ‘जीवनगौरव’ पुरस्कार, या धन्यतेच्या भावनेला आणि कृतार्थतेला अधिकच झळाळी प्राप्त करून देणारा आहे. हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचा समारंभ म्हणजे, त्यांनी समृद्ध करून ठेवलेल्या वैचारिक शिदोरीविषयीची, त्यांनी जागविलेल्या उत्कट ध्येयवादाविषयीची कृतज्ञता सामाजिक स्तरावर व्यक्त करणारा एक सोहळाच आहे. डॉ. अशोक मोडक यांच्यातील विद्यमान आणि प्रगल्भ वैचारिक योध्याला यानिमित्ताने विनम्र प्रणाम. त्यांच्या स्नेहस्पर्शाचा लाभ प्रदीर्घ काळपर्यंत आपणा सर्वांना लाभत राहो, हीच नियतीचरणी प्रार्थना.
शुभं भवतु!