'तुमचे मत.. तुमची ताकद’, ‘लोकशाही बळकट करुया.. सुशासन आणूया, महापालिकेच्या माध्यमातून शहरात बॅनर्स, सोशल मिडीयाद्वारे नागरिकांमध्ये मतदान जनजागृती
27-Dec-2025
Total Views |
ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मतदार जनजागृतीसाठी व्यापक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शहरातील प्रमुख चौक, रस्ते, बसस्थानके, तसेच डिजिटल फलकांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी होत असून यामध्ये ठाणेकर मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून आपला मतदानाचा हक्क बजावावा या दृष्टीने महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध माध्यमांचा वापर करुन जनजागृती करण्यात येत आहे.
डिजीटल माध्यमे प्रभावी ठरत असल्याने महापालिकेच्या फेसबुक, इन्स्टा, ट्वीटर, व्हॉटसॲप चॅनल अशा सोशल मिडीया तसेच सोबतच शहरातील डिजीटल बॅनर्सवरुन नागरिकांना 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 या वेळेत आपला मतदानाचा हक्क बजावून संविधानाने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार अभिमानाने मिरवावा असे आवाहन करण्यात येत आहे.
तसेच ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बस थांब्यावर ‘विकेंद्रित शासन म्हणजे लोकाभिमुख प्रशासन’, ‘जागरुक नागरिक मी ठाण्याचा’, ‘हक्क बजावीन मतदानाचा..’, ‘निरोगी स्वास्थ्यासाठी शरीराला व्यायामाची गरज असते.. प्रगल्भ लोकशाहीसाठी मतदानाची गरज असते’. ‘माझे ठाणे माझी लोकशाही, टिकवीन मी बोटाला शाई लावून,’ ‘आपल्याला योग्य उमेदवार निवडायचे आहेत, आपल्या शहराच्या विकासासाठी’, ‘तुमचे मत.. तुमची ताकद’, ‘लोकशाही बळकट करुया.. सुशासन आणूया...’ अशी आकर्षक घोषवाक्ये नागरिकांचे लक्ष वेधत असून या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करणारे बॅनर्स शहरातील विविध भागात असलेल्या बसथांब्यावर लावण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेच्या बसेस या शहरातील कानाकोपऱ्यात दररोज हजारो प्रवाशांना घेवून जात असतात, या बसेसवर देखील बॅनरच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
स्वीपच्या माध्यमातूनही जनजागृती :
ठाणे महानगरपालिकेच्या विविध नऊ प्रभागसमित्यांमधील परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात येत आहे. मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो.. या मथळ्याखाली शहरात पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे.
महाविद्यालये/ शाळा यांचाही सहभाग :
मतदानाचा टक्का वाढावा किंबहुना मोठ्या संख्येने नागरिकांनी लोकशाहीचा अधिकार बजावावा यासाठी महाविद्यालयातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांमार्फत शहरात प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. या प्रभात फेरीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांनाही मतदानाचे महत्व आतापासूनच समजावे किंबहुना पालकांना त्यांनी मतदानासाठी प्रवृत्त करावे यासाठी निबंध, चित्रकला तसेच रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे.