गेल्या आठवड्यात व्हिएतनामने देशभरात एकाच वेळी २३४ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करून सार्या जगाचे लक्ष वेधून घेतले. सुमारे ३.४ क्वाड्रिलियन व्हिएतनामी डोंग म्हणजेच अंदाजे १४२ अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या प्रचंड गुंतवणुकीचा हा निर्णय केवळ राष्ट्रीय विकासापुरता मर्यादित नसून, जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर घेतलेला एक ठोस आणि आत्मविश्वासपूर्ण पाऊल ठरतो.
विमानतळ धावपट्ट्या, द्रुतगती महामार्ग, आंतरराष्ट्रीय दर्जाची स्टेडियम्स आणि अत्याधुनिक रुग्णालये अशा विविध क्षेत्रांत पसरलेले हे प्रकल्प व्हिएतनामच्या विकासदृष्टीचे प्रतिबिंब आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रकल्प सुरू केल्याने अंमलबजावणीतील अडथळे, विलंब आणि समन्वयातील अडचणी निर्माण होतील, अशी भीती काहींच्या मनात असली; तरी अर्थतज्ज्ञांच्या मते, या निर्णयाचा संदेश अधिक प्रभावी आहे. हा उपक्रम सरकारच्या ठाम राजकीय इच्छाशक्तीचा आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या निर्धाराचा पुरावा आहे. विशेष म्हणजे, ही एकूण गुंतवणूक २०२५मध्ये अपेक्षित व्हिएतनामच्या ‘जीडीपी’च्या सुमारे २६.५ टक्के इतकी असून, सार्वजनिक गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा या विकासाच्या प्रमुख आधारस्तंभांप्रमाणे वापरल्या जात असल्याचे स्पष्ट होते.
पायाभूत सुविधांवरील सार्वजनिक गुंतवणूक ही केवळ खर्च नसून, ती आर्थिक गती निर्माण करणारी शक्ती आहे. अल्पकालीन काळात या प्रकल्पांमुळे रोजगारनिर्मिती होते, मागणी वाढते आणि बांधकाम, वाहतूक, अभियांत्रिकी सेवा, तसेच पुरवठासाखळीतील विविध घटक सक्रिय होतात. आंतरराष्ट्रीय अभ्यास दर्शवतात की, अशाप्रकारच्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा नियमित खर्चांच्या तुलनेत अधिक असतो आणि योग्य अंमलबजावणी झाल्यास खासगी गुंतवणूकही त्याकडे आकर्षित होते.
मात्र, या गुंतवणुकीचा खरा प्रभाव मध्यम व दीर्घकालीन काळात दिसून येतो. सुधारित रस्ते, बंदरे, विमानतळ, ऊर्जा व्यवस्था, शहरी आणि डिजिटल पायाभूत सुविधा यांमुळे वाहतूक खर्च कमी होतो, वितरणासाठी लागणारा वेळ घटतो आणि पुरवठासाखळीतील व्यत्ययाचा धोका कमी होतो. परिणामी, उद्योगांची उत्पादकता वाढते, बाजारपेठांपर्यंत पोहोच सुलभ होते आणि देशाची जागतिक स्पर्धात्मकता बळकट होते. थोडयात, उत्तम पायाभूत सुविधा उद्योगांना समान प्रयत्नांतून अधिक मूल्यनिर्मिती करण्यास सक्षम करतात.
या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, निधीची रचना आहे. एकूण गुंतवणुकीपैकी मोठा हिस्सा केवळ सरकारी तिजोरीतून न येता, बिगर-राज्य आणि खासगी स्रोतांतून उभारला जात आहे. यामुळे सरकार बाजाराची जागा घेण्याऐवजी सार्वजनिक गुंतवणुकीद्वारे दिशा दाखवत असून, खासगी क्षेत्राला विश्वास देत असल्याचे स्पष्ट होते. सरकार आता थेट अंमलबजावणी करणार्या भूमिकेतून सक्षम करणार्या आणि मार्गदर्शक भूमिकेकडे वाटचाल करत आहे. या व्यापक पायाभूत उपक्रमातून व्हिएतनाम सरकार उद्योगजगताला एक स्पष्ट संदेश देत आहे की, पायाभूत सुविधा हा आता केवळ सार्वजनिक क्षेत्राचा विषय राहिलेला नाही, तर दीर्घकालीन सार्वजनिक-खासगी सहकार्याचे व्यासपीठ बनत आहे. वेग, कार्यक्षमता आणि परिणामकारकता यांना सर्वोच्च प्राधान्य देत, सरकारने हेही अधोरेखित केले आहे की, वेळ हीच आजची सर्वात मौल्यवान आर्थिक संपत्ती आहे.
जागतिक स्तरावर पाहता, व्हिएतनामचा हा विकासमार्ग उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक अभ्यासपूर्ण मॉडेल ठरत आहे. अनिश्चिततेच्या काळात आत्मविश्वासाने पायाभूत सुविधांवर गुंतवणूक करून व्हिएतनामने केवळ स्वतःच्या विकासाची दिशा निश्चित केली नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेलाही एक ठाम संदेश दिला आहे की, विकासासाठी धाडस, दृष्टी आणि अंमलबजावणीची ताकद आवश्यक असते.