रंगखुणांचा निसर्गयात्री

    27-Dec-2025   
Total Views |
Shivaji Tupe
 
निसर्गचित्रकार शिवाजी तुपे यांनी आपल्या कुंचल्यातून केवळ निसर्गाचे वैभवं चितारले नाही, तर त्यांनी निसर्गसृष्टीकडे कसं पाहावं, हा विचारही चित्रकारांना दिला. ज्याकाळात त्यांनी निसर्गचित्रं रेखाटली, त्याकाळात म्हणावा तितकासा आधुनिकतेचा स्पर्श भारतीय शहरांना, खेड्यांना झाला नव्हता. म्हणूनच कदाचित त्यांच्या चित्रांमध्ये अवतरणारा निसर्ग आपल्याला अस्सल वाटतो. मुंबईतील नेहरु सेंटर आर्ट गॅलरीच्या माध्यमातून दि. १७ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीमध्ये नेहरु सेंटर कलादालनात शिवाजी तुपे यांच्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ७ या कालावधीमध्ये कलारसिकांना त्यांच्या चित्रांचा आस्वाद घेता येणार आहे. यानिमित्ताने त्यांच्या चित्रसृष्टीचा आढावा घेणारा लेख...
 
कला हे माणसाच्या जीवनाला आकार आणि अर्थ देणारे एक महत्त्वाचं साधन. जीवनाच्या प्रवाहामध्ये माणसाला स्थिरतेचा किनारा कलेच्या प्रांतातच सापडतो. आजच्या अत्याधुनिक युगात भोवतालच्या परिवर्तनाचा वेग इतका वाढला आहे की, त्याला स्थिर राहण्यासाठीचा अवकाश मिळत नाहीये. अशावेळी ही स्थिरता माणसाला, कधीतरी एखाद्या गाण्यातून अनुभवायला मिळते, तर कधी एखादं चित्र डोळ्यासमोर दिसलं की काही क्षणांसाठी का होईना, त्याच्या भोवतालापलीकडे डोकावता येते. प्रख्यात चित्रकार शिवाजी तुपे यांच्या चित्रांसमोर जर आपण उभे राहिलो तर कदाचित हीच अनुभूती आपल्या मनाला स्पर्शून जाते. निसर्गचित्रं जितकी आपल्या डोळ्यांना सुखावणारी असतात, आपल्याला आपल्या मूलतत्त्वाशी जोडणारी असतात, तितकीच ती लोभसवाणी असतात. परंतु, हे निसर्गचित्र ज्या वेळेला कॅन्व्हासवर उतरवायची वेळ येते, त्या क्षणाला मात्र प्रत्येक चित्रकारासमोर वेगवेगळी आव्हाने उभी राहतात. निसर्गामध्ये सातत्याने परिवर्तन घडत असते. अशा वेळेला एका विशिष्ट प्रकारचं वातावरण कुंचल्यातून साकारताना मनाची एकाग्रता आणि रचनेतील स्थिरता या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाजी तुपे यांच्या चित्रांमध्ये आपल्याला हाच एक सुंदर संगम अनुभवायला मिळतो.
 
दि. २५ जुलै १९३५ रोजी नाशिकच्या सिन्नर येथे तुपे यांचा जन्म झाला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट्स’च्या माध्यमातून त्यांनी चित्रविश्वाचे धडे गिरवले. हे धडे गिरवत असताना, त्यांनी आपला अस्सलपणा कायम ठेवला. तत्कालीन कलाविश्वामध्ये वेगवेगळ्या प्रवाहांचे धुमारे फुटत असताना, निसर्गचित्रांच्या विश्वामध्ये हा माणूस तल्लीन झाला. हे निसर्गचित्र काढताना त्यांनी तंत्रावर हुकूमत मिळवली आणि त्याचबरोबर सातत्याने नवा विचार आपल्या चित्रांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, पोस्टर कलरचे काम करताना पारदर्शक, सेमी ओपेक, आणि ओपेक अशा तिन्ही प्रकारात त्यांनी चित्र काढली. यातील वैशिष्ट्य असे की, ही चित्रं साकारताना त्यांनी तपशिलांची बाजूसुद्धा तितयाच सक्षमपणे सांभाळली आहे.
 
ज्या काळामध्ये शिवाजी तुपे चित्र साकारायचे, त्या काळात भारतामधील खेड्यांना, शहरांना म्हणावा तसा आधुनिकतेचा स्पर्श झाला नव्हता. त्यामुळे जगण्यातली एक विशिष्ट लय सांभाळत, माणसं पुढे जात होती. एक प्रकारचा संथपणा त्यांच्या जीवनामध्ये होता आणि हाच संथपणा आपल्याला शिवाजी तुपे यांच्या चित्रांमध्ये सुद्धा अनुभवायला मिळतो. जवाहर इथल्या आंबोळी घाटाचे चित्र ज्या वेळेला ते साकारतात, त्यावेळेला या सभोवतालाकडे एका तपस्वीच्या दृष्टीने ते बघत असतात असे जाणवते. औंधचे भवानी मातेचे मंदिर असो किंवा त्र्यंबकेश्वर येथील टेकडी त्यांच्या निसर्गचित्रणामध्ये कळत नकळत पहाट अवतरते. ही निसर्ग संपन्नता अनुभूतीच्या पातळीवर माणसाला परिपक्व करणारी आहे.
 
नाशिक ही शिवाजी तुपे यांची जन्मभूमी. त्यांच्या चित्रांमध्ये आपल्याला तत्कालीन नाशिकचे वैभवही लख्ख दिसते. गोदावरीचा घाट असो किंवा तिथले मंदिर, एखाद्या लहान मुलाने पहिल्यांदा आपल्या डोळ्यांमध्ये हा सगळा भवताल सामावून घ्यावा अगदी त्याच निरागसतेने कॅनव्हासवर हे चित्र उतरली आहेत, असे आपल्याला दिसून येते. त्यांच्या दृष्टीमुळे, त्यांची चित्रकल्पनासुद्धा वेगळी आहे, याची आपल्याला प्रचिती येते. गोंडेश्वर मंदिराची भव्यता, त्याचे देखणेपण या सार्‍याशी आपण परिचित आहोतच. मात्र, केवळ मंदिराचे खांब आणि पायर्‍या यांच्या संगमातून त्यांनी जो निसर्गाचा भोवताल उभा केला, तो अवर्णनीय आहे.
 
निसर्गचित्रांच्या पलीकडे काळ्या आणि पांढर्‍या रंगछटांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी अनोखे विश्व उभे केले आहे. त्याचबरोबर पोर्ट्रेट्सच्या विश्वात सुद्धा त्यांनी वेगळा विचार मांडल्याचे आपल्याला दिसून येते. आयुष्यभर व्रतस्थपणे निसर्गचित्रणाचा वसा घेतलेल्या शिवाजी तुपे यांनी चित्रविषयांच्या शोधात भारतभर भटकंती केली. काश्मीर, राजस्थान, गोवा, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश अशा अनेक प्रदेशांमध्ये जाऊन येथील निसर्ग, वास्तूहरचना, माणसे, बाजार, मंदिरे यांना आपले चित्रविषय केले. तिथले वातावरण, रंग, प्रादेशिक विविधता यांचा त्यांनी आपल्या चित्रांतून वेध घेतला. छायाप्रकाशाचे परिणाम रंगवताना समोरील दृश्यातून वेगळ्या चित्ररचना शोधल्या; ज्यामुळे केवळ दिसते तसे काढण्यापेक्षा, आपल्याला आलेली सौंदर्यअनुभूती त्यांनी चित्रातून मांडली. सुरुवातीपासूनच प्रत्यक्ष चित्रणावर त्यांनी भर दिलेला जाणवतो. चित्ररचनांचा शोध, रंगांतील प्रयोग यामुळे त्यांची चित्रे वेगळ्या कलात्मक उंचीवर गेली आहेत. आपल्या अभिनव प्रयोगातून चित्रविश्वाची सौंदर्यसृष्टी साकारणार्‍या या महान कलावंताचा हा वारसा येणार्‍या पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही.
 
तुपेंची चित्रं म्हणजे वातावरणनिर्मितीचा चपखल नमुना
 
शिवाजी तुपे सरांनी जलरंग आणि पोस्टर कलरच्या माध्यमातून तयार केलेली चित्रं खरोखर प्रेक्षणीय आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रातून ’perspective’ म्हणजे नेमकं काय, याची आपल्याला माहिती होते. ते आपल्या चित्रांमध्ये पारदर्शकतेच्या विविध छटा मांडायचे. चित्रांमधल्या बारीक बारीक गोष्टींचा ते अतिशय काटेकोरपणे विचार करायचे. धुक्यातली वाट असो किंवा एखादी टेकडी, त्यांची चित्रं म्हणजे वातावरणनिर्मितीचा अत्यंत चपखल नमुना आहे. आपल्या चित्रांमध्ये त्यांनी सावल्यांचा सुद्धा अत्यंत प्रभावी वापर केला होता, असे आपल्याला दिसून येते. आज हा अमूल्य ठेवा आम्हाला बघता आला, हे आमचे भाग्य आहे.
 
- श्रीधर बादेकर, माजी प्राचार्य, रहेजा स्कुल ऑफ आर्ट्स
 
 
 
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.