क्रोशियाची जाहिरात आणि ‘धर्मा प्रोडक्शन्स’ची बडबडगीते ( Tu Meri Main Tera Film Review )

    27-Dec-2025
Total Views |
Tu Meri Main Tera
 
२०२५ या कॅलेंडर वर्षाचा तसा हा शेवटचा आठवडा. नूतन इंग्रजी वर्षाच्या स्वागताची तयारी आणि जगभरच सुट्टीचा आनंद लुटण्याची मौजमजा. अशावेळी सिनेप्रेमींना एखादा सुंदर चित्रपट पाहायला मिळाला, तर ती पर्वणीच. अशातच गेले काही दिवस चर्चेत असलेला ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ हा प्रचंड लांबलचक नाव असलेला चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अभिनेता कार्तिक आर्यन, अनन्या पांडे अशी नवीकोरी जोडी या चित्रपटात आहे; तर मराठमोळे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ट्रेलरवरून करण जोहरच्या ‘धर्मा प्रोडशन’चा सर्वसाधारण ‘रॉमकॉम’ चित्रपट असल्याचे दिसते. पण, चित्रपट नेमका कसा आहे? आणि तो खरंच चित्रपटगृहात जाऊन पाहावा का, ते जाणून घेऊया...
 
ही गोष्ट आहे, रे म्हणजेच रेहान मेहरा आणि रुमी वर्धन यांची. रे (कार्तिक आर्यन) जो भारतीय वंशाचा अमेरिकन ‘ग्रीन कार्ड’धारक. पण, अजूनही त्याची नाळ भारतीय संस्कृती-परंपरेशी जोडलेली. ज्याची स्वतःची एक मोठी इव्हेंट कंपनी आहे आणि जगभरात त्याची कामे चालतात. भारतातील काम संपवून तो क्रोएशियाच्या ‘सोलो ट्रीप’वर निघालेला असतो. दुसरीकडे रुमीसुद्धा (अनन्या पांडे) याच ट्रीपवर निघालेली असते. योगायोगाने एकाच विमानात ते बसतात. पुढे एकाच क्रुझवरसुद्धा भेटतात. अशा काहीशा रटाळ आणि अनेकदा पाहिलेल्या कथानकानेच हा चित्रपट सुरु होतो.
 
चित्रपटाच्या प्रारंभीच अतिशयोक्ती असलेले संवाद कानावर पडतात आणि आता सर्वसाधारण ‘धर्मा प्रोडक्शन’चा चित्रपट सुरू झाल्याचा भास होतो. पुढे दोघेही क्रोएशियाच्या सफारीवर एकमेकांशी मैत्री करतात आणि नंतर फिल्मी स्टोरीप्रमाणे अगदी प्रेमात पडतात. तसा या प्रेमप्रकरणात कोणताच अडथळा नसतो. पण, पुढे कौटुंबिक नाती आणि त्यांच्या भावना यात या प्रेमप्रकरणाचे काय होते, हे चित्रपटातच पाहावं लागेल.
 
चित्रपटाचा पहिला भाग पूर्णपणे रोमँटिक वातावरण, उत्कंठावर्धक प्रवास, नयनरम्य लोकेशन्स आणि गाण्यांभोवती फिरतो. एकंदरीतच क्रोशिया या देशाच्या पर्यटनाची जाहिरात असल्याचे जाणवते. याचबरोबर अधूनमधून अगदी काही सनस्क्रीनच्या जाहिरातीसुद्धा झळकतात. पण, आई-वडिलांची जबाबदारी आणि वैयक्तिक प्रेमसंबंध यांच्यात अडकलेला हा संघर्ष याही कथानकाचा केंद्रबिंदू. मात्र, तोही अत्यंत सरळमार्गाने, अपेक्षित अशा पद्धतीने मांडला जातो. परिणामी, चित्रपट पुन्हा एकदा जुन्याच साच्यात अडकतो. आधी भेट, मग दुरावा, पुन्हा प्रेम, मग विरह, रंगीबेरंगी कपडे, मेकअप, त्यानंतर सुंदर लोकेशन्सवर शूटिंग, इंग्रजाळलेले संवाद आणि अखेरीस पुनर्मिलन यापलीकडे काही वेगळं या चित्रपटातून पाहायला न मिळाल्यामुळे हिरमोड होतो. त्यामुळे चित्रपटाच्या लांबलंचक नावाप्रमाणेच, कथानकही तितकेच खेचलेले वाटते.सुमारे २ तास २५ मिनिटांच्या कालावधीत हीच भावनिक ओढाताण कथानकामध्ये वारंवार पाहायला मिळते. त्यामुळे कथा पुढे सरकण्याऐवजी अनेक ठिकाणी थांबलेली, ताणलेली आणि लांबलेली वाटते.
 
हलक्याफुलक्या, करमणुकीसाठी बनवलेला हा चित्रपट असेल तर त्यात काहीच गैर नाही; पण हा चित्रपटच संपूर्ण तर्क-वितर्क बाजूला ठेवून पाहण्याचा आहे, हे वारंवार जाणवते आणि त्यामुळे मूळ चित्रपटाचा गाभाच कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो. चित्रपटाचे लेखक करण शर्मा यांनी केले असून, बरेचसे संवाद हे मनाला न पटणारेच वाटतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, ट्रीपवर असताना अनन्या पांडे म्हणजे रुमी आणि रे हे २०२५चं ‘जेन-झी’चं ‘हुकअप कल्चर’ आणि पार्टी करताना दिसतात. त्याच्या पुढच्याच क्षणाला रुमी म्हणते, "२०२५मध्ये मला ९०च्या दशकातील प्रेम हवं आहे.” साहजिकच या दोन्ही गोष्टींमध्ये कोणतंच साधर्म्य आढळत नाही आणि ते निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक यांनीही ते फारसं विचारात घेतलेले नाही. अशी बरीच दृश्ये आहेत, जी अनेक प्रेक्षकांना अजिबातच पटणारी नाही.
 
कथेनंतर अभिनयाविषयी बोलायचं तर तिकडेही पूर्णपणे सावळागोंधळच. ‘प्यार का पंचनामा’, ‘लुक्का छुप्पी’ यांसारखे बरेच ‘हीट’ सिनेमे देणारा कार्तिक यावेळी मात्र अजिबातच तयारीचा वाटत नाही. अनन्याने तिचे अभिनयातले प्रयोग सुरू ठेवले आहेत आणि चांगला प्रयत्नसुद्धा केला आहे. याशिवाय, प्रभावी आईच्या भूमिकेतील पात्र नीना गुप्ता यांनी उत्तम रंगवलं आहे. त्याचबरोबर वडिलांच्या भूमिकेत जॅकी श्रॉफसुद्धा शोभून दिसतात, जी या सिनेमाची जमेची बाजू म्हणता येईल. चित्रपटातील गाणीसुद्धा सर्वसाधारणच आहेत. याशिवाय, मधेमधे काही जुन्या गाण्यांचे ‘रिमेक’ ऐकायला मिळतात, तेच काही मनोरंजक क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळतात. त्यामुळे काही हलकंफुलकं पाहायचं असेल, तर या सुट्ट्यांमध्ये हा चित्रपट पाहता येईल
 
दिग्दर्शक : समीर विद्वांस
 
कलाकार : कार्तिक आर्यन, अनन्या पांडे, नीना गुप्ता, जॅकी श्रॉफ, टिकू तलसानिया, चांदनी भाबडा
 
निर्मिती : धर्मा प्रोडशन्स
 
रेटिंग : 2.0
 
 - अपर्णा कड