थरार आणि कॉमेडीने भरलेला ‘अ‍ॅनाकोंडा’ ( Anaconda Film Review )

    27-Dec-2025
Total Views |
Anaconda 2025
 
‘अ‍ॅनाकोंडा’ हा पहिलावहिला चित्रपट जवळपास तीन दशकांपूर्वी म्हणजेच १९९७ साली पहिल्यांदा जगभरातील प्रेक्षकांसमोर आला आणि त्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. त्यानंतर २००४ साली ‘अ‍ॅनाकोंडा : द हंट फॉर द ब्लड ऑर्किड’ हा या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा तितकाच गाजला. पण, आता २०२५ मध्ये पुन्हा एकदा ‘अ‍ॅनाकोंडा’ प्रेक्षकांना थरारक अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. दि. २५ डिसेंबरला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. जवळपास तीन दशकांनंतर आलेली या चित्रपटाची ही नवीकोरी आवृत्ती काहीशी वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांच्या समोर येते. टॉम गोर्मिकन दिग्दर्शित हा नवा भाग नेमका कसा आहे, ते पाहूया...
 
या चित्रपटाची कथा सुरु होते ती चार घनिष्ट मित्रांपासून. ही चौकडी अगदी शाळेत असल्यापासून चित्रपट निर्मितीचे स्वप्न डोळ्यात घेऊन जगणारी. पण, शाळा मागे राहिली आणि कालचक्रानुसार हे मित्रही आपापल्या संसारात आणि वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांत रममाण झाले. पण, डग (जॅक ब्लॅक) ज्याला एकेकाळी सिने-दिग्दर्शक म्हणून नाव कमवायचे होते, आता तो लग्नसोहळ्यांच्या व्हिडिओ चित्रीकरणातच पुरता गुरफटून गेला आहे, तर त्याचा बालपणीचा मित्र ग्रिफ (पॉल रड) सध्या ‘स्ट्रगलर’ अभिनेता आहे. याशिवाय बाकी दोन मित्रही आपापल्या आयुष्यात व्यग्र आहेत. पण, डगच्या वाढदिवसाला या सगळ्यांची अचानक भेट होते आणि या मित्रांचं भन्नाट ‘रियुनियन’ रंगलेलं पाहायला मिळतं. ग्रिफ जो आधीच अभिनेता आहे आणि ज्याला अजून हवी तशी चांगली संधी चित्रपटात मिळालेली नाही, त्याला डगसह ‘अ‍ॅनाकोंडा’चा ‘रीबूट’ चित्रपट करायचा आहे. मग काय, या मोहिमेत त्यांच्यासोबत जुने मित्र लेअर (थँडिवे न्यूटन) आणि केनी (स्टीव्ह झान)ही सामील होतात. पण, इतका मोठा चित्रपट करायचा, तर त्यासाठी खिशात पैसेही हवेतच. अशावेळी डग कमी खर्चात चित्रपट कसा बनवता येईल, याची एक नामी शक्कल लढवतो आणि ही सगळी मंडळी निघतात ती थेट अ‍ॅमेझॉनच्या घनदाट जंगलात, खर्‍याखुर्‍या अ‍ॅनाकोंडाच्या शोधात...
 
ब्राझीलचे अ‍ॅमेझॉनमधील वर्षावन जैवविविधतेने नटलेले असले, तरी धोकादायक वन्यप्राण्यांचं माहेरघर म्हणूनही कुप्रसिद्ध. तर जगातील अशा निबिड अरण्यात चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निघालेले हे मित्र भलत्याच संकटांमध्ये सापडतात. मात्र, तिथे पोहोचताच त्यांचा हा हौशी चित्रपटनिर्मितीचा प्रयत्न बेकायदेशीर खाणकाम, संशयास्पद स्थानिक लोक आणि एका खर्‍याखुर्‍या, महाकाय अ‍ॅनाकोंडाशी सामना असा अंगावर शहारे आणणारा प्रवास करतो. परिणामी, जुन्या आठवणी आणि हौशी कलेतून जन्मलेला हा ‘पॅशन प्रोजेक्ट’ क्षणार्धातच जीव वाचवण्याच्या थरारक संघर्षात बदलतो आणि पुढे एक सुंदर वाय डग म्हणतो, ते म्हणजे, "आता आपण हा चित्रपट बनवू शकत नाही. कारण, आपणच या चित्रपटाचा भाग आहोत.”
 
यादरम्यान बर्‍याच चित्रविचित्र गोष्टी या चौघा मित्रांसोबत घडतात, ज्यामुळे या थरारपटातही अधूनमधून प्रेक्षकांच्या चेहर्‍यावर अलगद हसू उमटते. पण, असे असले तरीही पहिल्या ‘अ‍ॅनाकोंडा’ला हा चित्रपट कुठेच मात देत नाही. साहजिकच, आताचे सिनेतंत्रज्ञान लक्षात घेता, २०२५ मधला ‘अनाकोंडा’ अगदी खराखुरा वाटतो. खरं तर हा सिनेमा मूळ चित्रपटाची जागा घेण्याचा प्रयत्न करत नाही, तर त्याला आदरांजलीच वाहतो. मूळ ‘अ‍ॅनाकोंडा’ चित्रपटातील गूढ, थरारक आणि किंचित भीतीपेक्षा अधिक मजेशीर स्वभाव हा चित्रपट इथेही जपून ठेवतो. हा भाव टिकवून ठेवण्याचं श्रेय नि:संशय मुख्य कलाकारांनाच द्यावं लागेल. कारण, संहितेला उंची देण्यासाठी ते पुरेपूर प्रयत्न करतात. जॅक ब्लॅक आणि पॉल रड पटकथेला चांगली ऊर्जा देतात. काही ठिकाणी हसूही येतं. मात्र, ते हसू कधीच पूर्णपणे खळखळून येत नाही. इथे कलाकारांची यादी जरी लक्षवेधी असली, तरी हा चित्रपट निर्विवादपणे जॅक ब्लॅक आणि पॉल रड यांच्याभोवतीच फिरतो. प्रत्यक्षात ते दोघेही आपल्या खर्‍या प्रतिमाच पडद्यावर आणतात. त्यामुळे इथे मोठ्या आणि संस्मरणीय अभिनयाबद्दल बोलणं काहीसं कठीण ठरतं. तरी त्या प्रत्येक अभिनेत्याच्या करिष्म्याची ताकद नाकारता येत नाही. शेवटपर्यंत हा चित्रपट पाहण्याचं तेही एक प्रमुख कारण.
 
दुसरीकडे, डॅनिएला मेल्चिओर आणि थँडिवे न्यूटन या दोन्ही अभिनेत्री प्रामुख्याने पडद्यावर ‘सुंदर चेहर्‍यां’पुरत्याच मर्यादित राहतात. कथेत त्यांच्या पात्रांची उपस्थिती असली, तरी त्यांना प्रत्यक्षात फार स्थान दिलेले नाही. चित्रपटात अ‍ॅनाकोंडाचा थरार, अ‍ॅमेझॉनच्या अद्भुत जंगलाची चित्तथरारक सफर, हलकीफुलकी कॉमेडी आणि मनोरंजन असं सगळं अनुभवता येईल. पण, आधीच्या चित्रपटांइतका हा ‘अ‍ॅनाकोंडा’ तितकाच थरारक, अंगावर येणारा नाही. म्हणजे ज्यांनी जुने ‘अ‍ॅनाकोंडा’चे भाग पाहिलेले नसतील, ते साहजिकच याकडे तुलनात्मक चष्म्यातून न पाहता मनोरंजनाचा पुरता आस्वाद घेऊ शकतात, हे नक्की. चित्रपटाची लांबीही फार नाही. त्यामुळे विनाकारण कथानक न ताणता थेट चित्रपट पुढे जातो. तेव्हा या सुट्ट्यांमध्ये काही वेगळं पाहायचं असेल, तर विशेषतः लहान मुलांसह हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहायला हवा.
 
दिग्दर्शन, लेखन : टॉम गोर्मिकन
 
कलाकार : पॉल रड, जॅक ब्लॅक, थँडिवे न्यूटन, स्टीव्ह झान, डॅनिएला मेल्चिओर, सेल्टन मेलो
 
निर्मिती : सोनी पिचर्स
 
रेटिंग : ३.०
 
 - अपर्णा कड