गोव्याची ऊर्जा : दुर्गानंद नाडकर्णी!

    27-Dec-2025
Total Views |

Rashtriya Swayamsevak Sangh Durganand Vasudev Nadkarni

ग्रंथ वाचून आणि बौद्धिके ऐकून संघाची केवळ माहिती मिळते; अनुभूती मिळत नाही! अनुभूती एखाद्या जीवनातूनच मिळत असते, जीवनातूनच ती संक्रमितही होऊ शकते, याचा साक्षात प्रत्यय आणून देणारे एका उदात्त अवलियाचे जीवन सुदैवाने गोव्याच्याही वाट्याला आले. गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन पिढ्यांतील स्वयंसेवकांना, संघाच्या संघ-सिद्धांतांचा साक्षात्कार घडवणारे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे नुकतेच, दि. २० डिसेंबर रोजी निर्वाण पावलेले श्रद्धेय श्री दुर्गानंद गिरी स्वामीजी तथा पूर्वाश्रमीचे संघप्रचारक दुर्गानंद वासुदेव नाडकर्णी. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख...
 
कौटुंबिक पार्श्वभूमी

१९६० साली घरादाराचा त्याग करून, अविवाहित राहून आजन्म संघप्रचारक म्हणून काम करण्यासाठी बाहेर पडलेल्या नाडकर्णींनी, प्रारंभी आठ वर्षे महाराष्ट्र प्रांताच्या विविध जिल्ह्यांत तालुका प्रचारक म्हणून काम केले. दुर्गानंद नाडकर्णी मूळचे कर्नाटकातील अंकोल्याचे. त्यांचे घर हे कट्टर काँग्रेसी विचारांचे म्हणजेचच संघाचा द्वेष करणार्‍यांचे. त्यामुळे संघाच्या शाखेवर जाऊ लागलेल्या दुर्गानंदजींना, वडिलांचा विरोध होता. त्यामुळे संघाचा प्रचारक म्हणून जाण्याचे निश्चित झाल्यावर आशीर्वाद घ्यायला आलेल्या दुर्गानंदजींवर, वडील संतापाने कडाडले. त्यावेळी अवघे घर एकत्र आले होते. पाच बहिणी व सात भाऊ असे दुर्गानंदजींचे मोठेच कुटुंब. संतापाने लाल झालेल्या वडिलांनी दुर्गानंदजींना तंबी दिली की, "तू हा दरवाजा ओलांडून गेलास, तर मी मरेपर्यंत तुझे तोंड पाहणार नाही.” वडील वासुदेवरावांनी ही प्रतिज्ञा आयुष्यभर पाळली. वडील निवर्तल्यावरच, अंत्यदर्शनासाठी दुर्गानंदजींचा प्रवेश त्या घरात होऊ शकला. मात्र, नंतरही प्रचारक दुर्गानंदजी यांनी अंकोल्याच्या घरी क्वचित भेट दिली असेल. अंकोल्याला या प्रतिष्ठित घराण्याचा मोठा वाडा आहे. या वस्तीमध्ये नाडकर्णी आडनावाचीच कुटुंबे वस्तीस असून, ही सारीच कुटुंबे सधन आहेत. त्यापैकी तरुण पिढीतील काहीजण आज परदेशातही आहेत. एकदा संघप्रचारक म्हणून घराबाहेर पडलेले अविवाहित, विरक्त, समाजसमर्पित दुर्गानंदजी, संघाचे प्रचारक कार्य थांबल्यावरही आपल्या वाड्यात आणि कुटुंबीयांत रमू शकले नाहीत. समविचारी कार्यकर्त्यांमध्येच ते अधिक रमले.
 
गोव्याशी नाते जुळले
 
१९६८ साली रत्नागिरी विभागात संघदृष्ट्या नव्याने निर्माण झालेल्या, सावंतवाडी जिल्ह्याचे जिल्हा प्रचारक म्हणून दुर्गानंदजी यांची नियुक्ती झाली. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वेंगुर्ला व मालवण असे दक्षिण रत्नागिरीचे पाच तालुके आणि संपूर्ण गोवा प्रदेश मिळून सावंतवाडी जिल्हा होता. जिल्ह्याचे केंद्र सावंतवाडी होते. सावंतवाडी जिल्ह्याचे जिल्हा संघचालक मा. डॉ. गणेश तथा बाबा सदाशिव लेले यांच्या प्राचीन वाड्याच्या वरच्या माळ्यावर, संघाचे कार्यालय होते. प्रचारक नाडकर्णींचे वसतिस्थान म्हणजे मा. बाबा लेलेंचे घर!
 
नाडकर्णी जिल्हा प्रचारक म्हणून आले तेव्हा, गोव्यातील संघकार्य नावीन्य ओसरल्यामुळे जरा ढेपाळलेलेच होते. उर्वरित सावंतवाडी जिल्ह्यातील कामही तसे जेमतेमच. स्वयंसेवक होते, कार्यकर्तेही होते मात्र, त्यांना स्वयंप्रेरित, स्वयंभू आणि स्वयंसिद्ध करण्याची गरज होती. ही उणीव नाडकर्णी यांनी दूर केली. गोव्याच्या कार्यसुपीक भूमीला त्याचा मोठाच लाभ झाला.
 
धडाकेबाज निर्णय व कडक शिस्त
 
नाडकर्णी गोव्यात आले, तेव्हा पणजी शहरात संघाने भाड्याने घेतलेले एक कार्यालय होते. पणजीत एकही शाखा चालू नाही, अशी ती परिस्थिती. कार्यालयाचा काही उपयोग नाही; संघाला फक्त भाडे भरण्याचा भुर्दंड येतो, त्यामुळे स्थानिक पदाधिकार्‍यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून, त्यांनी कार्यालय बंद केले. दुर्गानंदजी शिस्तीच्या बाबतीत अत्यंत कडक. बैठका ठरलेल्या वेळीच सुरू व्हायला हव्यात, हा त्यांचा कटाक्ष असे. बैठकीला येताना आपली दैनंदिनी आणलीच पाहिजे, हादेखील त्यांचा टोकाचा आग्रह. तालुका कार्यवाहांसह सर्व जिल्हा बैठका मुक्कामीच असल्या पाहिजेत, हे त्यांनी रूढ केले. बैठकीतील असाच एक प्रसंग आठवतो...
 
कार्यकारिणीच्या एका बैठकीला म्हापशाहून रात्री मुक्कामाला आलेला बार्देश तालुका कार्यवाह, वडिलोपार्जित भाटकार (जमीन/बागायतदार) असलेल्या स्व. बाळकृष्ण तथा बाबा सदाशिव आजरेकर याने, दैनंदिनी विसरल्याचे बैठकीत सांगताच दुर्गानंदजी संतापले होते. बाबा आजरेकरांना त्यांनी बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले. इतके शिस्तप्रिय असूनही, जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवक, कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ चुलीपर्यंतच्या घरगुतीसंबंधांमुळे घट्ट जुळली होती. त्यामुळे नाडकर्णींच्या संतापाचा कोणासही राग येत नसे.
 
सावंतवाडी हे जिल्ह्याचे केंद्र. एकदा तिथल्या कार्यकर्त्यांनी उत्साहात येऊन विजयादशमीला शहरात गणवेशात संचलन काढायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे दुर्गानंदजी आदल्या रात्रीच सावंतवाडीला हजर. दुसर्‍या दिवशी ठरलेल्या वेळी ते, पूर्ण गणवेशात मैदानात आले. त्यावेळी जेमतेम पाच स्वयंसेवक गणवेशात जमलेे होते. अधिक माणसे जमावण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. दुर्गानंदजी शांत होते. संचलनाची वेळ झाल्याबरोबर दुर्गानंदजींनी असलेल्या पाच जणांचे ‘संपत’ घेऊन, त्यांच्याच पद्याच्या तालावर पथसंचलन काढून, या पाच जणांना सावंतवाडी शहराच्या संपूर्ण बाजारात फिरवून आणले. एवढी कमी उपस्थिती असल्याची तक्रार व त्रागा करता, त्यांनी अनपेक्षित अशी कृती करून निर्णयाला न जागलेल्या स्वयंसेवकांना परस्पर वस्तुनिष्ठ पाठ शिकवला. सावंतवाडी शहराचे पुढच्या वर्षाचे संचलन प्रचारकांनी न सांगता आपसूकच साजेशा संख्येनिशी केले, हे वेगळे सांगण्याची गरज नाहीच.

मूलभूत सिद्धांतांशी कदापि तडजोड नाही!

मूल सिद्धांतांशी कुणी तडजोड केलेली दुर्गानंदजी यांना खपत नसे. स्वतःच्या जीवनातही त्यांनी तत्त्वांशी कधीच तडजोड केली नाही. ते सदैव सिद्धांतपालनाच्या बाजूनेच उभे राहिले. साधारण वर्ष १९७२-१९७३च्या दरम्यान, संघस्वयंसेवकांचे गुरुदक्षिणा समर्पण फारच कमी असे. दुर्गानंदजींचा समाजातील नवीन माणसे संघाशी जोडण्याकडे कल होता. त्यांचा संपर्क आणि प्रभाव दांडगा होता. म्हापशातील एका प्रतिष्ठित सधन नागरिकाकडे ते गेले असता, संघाचा खर्च कसा चालतो अशी त्यांनी विचारणा केली. व्यास पौर्णिमेला संघाने गुरुस्थानी मानलेल्या भगव्या ध्वजाचे पूजन करून, सगळे स्वयंसेवक ‘स्वेच्छा समर्पण’ समोर ठेवलेल्या कलशामध्ये करतात. त्याच्यावरच संघाचे काम चालते. ते सद्गृहस्थ कट्टर काँग्रेसवाले होते. ते म्हणाले की, "आपण संघशाखेत संघाच्या गुरुपूजन उत्सवाला येऊ शकत नाही. परंतु, या देशसेवेच्या कामासाठी आर्थिक मदत देण्याची आपली इच्छा आहे, ती आपण तुमच्याकडे आता देतो.”
 
"क्षमा करा, असे पैसे कितीही असले; तरी भगव्या ध्वजाचे पूजन करून तिथेच हे समर्पण केले, तरच ते घेऊ शकतो,” हे दुर्गानंदजींनी त्यांना विनम्रतापूर्वक; पण ठासून सांगितले. आश्चर्य म्हणजे त्या सद्गृहस्थांनी देणगी देण्यासाठी आग्रहच धरला. शेवटी दुर्गानंदजींनी त्यांना सुचवले की, त्यांच्यासाठी व पूजन न झालेल्या अन्य काही स्वयंसेवकांसाठी एक पुरवणी गुरुपूजन कार्यक्रम, त्यांच्याच घरी ध्वज लावून घेता येईल. याला त्या गृहस्थांनी मान्यता दिली. ध्वजाचे पूजन करून आपली रक्कम त्यांनी कलशामध्ये समर्पित केली. ही रक्कम १० हजार रुपये असल्याचे नंतर कळले. त्यावेळेस पूर्ण गोव्यात जमणार्‍या एकूण समर्पणाच्या तिप्पट ही रक्कम होती. संघपरंपरेला तडा न जाऊ देता हे सगळं झालं. पूजन करूनच ध्वजासमोर गुरुदक्षिणा समर्पण करायचे असते, हा संस्काराचा भाग या घटनेमुळे गोव्यात दृढमूल झाला. दुर्गानंदजींच्या अशा आग्रहाच्या वर्तनातूनच, सिद्धांतपालनाचे धडे आम्हा सर्वांनाच मिळाले.
 
जिल्हा प्रचारक नव्हे; कुटुंबातला घटक!
 
दुर्गानंद यांच्याविषयीचा एक किस्सा आठवतो. एका हातात गॅसची शेगडी व दुसर्‍या हाताने खांद्यावर सावरलेला सिलिंडर अशा स्थितीत, पणजीहून सावंतवाडीची बस पकडताना एकदा मी त्यांना पाहिले. नंतर कळलेली गोष्ट अशी की, त्याकाळी गॅस सिलिंडरची नोंदणी केल्यावर प्रत्यक्षात तो मिळायला १०-१२ वर्षे लागत. सावंतवाडीला दुर्गानंदजींचा मुक्काम संघचालक मा. बाबा लेलेंकडे असे. त्याच घरात संघ कार्यालयही. त्यामुळे या घरात वर्दळ असायचीच. आगंतुकांसाठी चहा करून देणे, जेवण बनवणे हे सगळे चुलीवर करताना, त्या घरात लग्न करून नव्यानेच आलेल्या मुंबईच्या सुनीती वहिनींची त्रेधातिरपीट उडायची. त्यांच्यासाठी कुणाकडे गॅस सिलिंडर मिळेल का? याचा शोध सावंतवाडी जिल्हाभर घेतल्यानंतर , त्यांच्या प्रयत्नांना गोव्यात यश आले.
 
पणजीत मोयाच्या ठिकाणी संघासाठी संपर्काचे ठिकाण म्हणजे, घड्याळजी बाबी भाटे यांचे घर. सिलिंडर मिळवण्यासाठी चाललेल्या दुर्गानंदजींच्या आट्यापिट्याची त्यांना दया आली. पोटच्या मुलीला लग्नाच्या वेळी देण्यासाठी त्याकाळी दुर्लभ असलेली सिलिंडर जोडणी, भाटे कुटुंबाने काही वर्षांपूर्वी नोंदणी करून मिळवली होती. ते त्यांनी दुर्गानंदजींना देऊन टाकले. सावंतवाडीची बस या सिलिंडरसह पकडताना, दुर्गानंदजींच्या विजयी मुद्रेमागे हे रहस्य होते.
 
संघकामात नवीन पायंडे पाडले
 
‘संघचालक’पदावर त्याकाळी, साधारणपणे केस पांढरे झालेल्या वयस्कर व्यक्तींची नियुक्ती व्हायची. सावंतवाडी जिल्हा प्रचारक असताना दुर्गानंदजींनी स्थानिक परिस्थिती व आवश्यकतेनुसार, गोव्यात ही परंपरा बदलली. म्हापसा येथील कार्यकर्ता मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर या तरुणाने (नंतर राजकारणात प्रवेश करून गोव्याचे मुख्यमंत्री आणि शेवटी भारताचे केंद्रीय रक्षामंत्री झाले) पवई ‘आयआयटी’ येथून अभियांत्रिकीची पदवी मिळवून, आपला व्यवसाय सुरू केला. संघकामासाठी अजिबात वेळ मिळत नाही, एवढा व्याप होता. परंतु, त्याची धडाडी आणि कर्तृत्वामुळे त्याला, संघाच्या निश्चित जबाबदारीत अडकवणे गरजेचे वाटत होते. मनोहरचे लग्नही झाले होते. सर्वांशी विचारविनिमय करून, दुर्गानंदजींनी त्याची संघचालक म्हणून नियुक्ती घडवून आणली. त्यानंतर पुढच्याच वर्षी मूळ आडपै फोंडा; परंतु व्यवसायानिमित्त सांपेर-तिसवाडी येथे वास्तव्यास असलेल्या धडाकेबाज तरुण श्रीपाद येसो नाईक (सध्या केंद्रीय मंत्री असलेले) यालाही तिसवाडी तालुका संघचालक करावे, हा आग्रहही दुर्गानंदजींचाच. तोही अर्थातच पूर्ण झाला. मनोहर पर्रीकर आणि श्रीपाद नाईक, हे त्याकाळातील संपूर्ण देशातील पहिले तरुण संघचालक असावेत.
 
एका प्रांतीय बैठकीत व्यासपीठावरील संघचालकांसाठी राखीव जागेत हे दोघे बसण्यासाठी गेले असता, तिथल्या प्रौढ-वयस्कर संघचालकांनी ही जागा संघचालकांसाठी आहे; तुमची व्यवस्था खाली आहे असे सांगितल्यावर, हे दोघे चांगलेच वरमले होते.
 
मठाधीश बनण्याचा प्रस्ताव
 
दुर्गानंदजींचे धार्मिक क्षेत्रातील आणि धर्मशास्त्रांबद्दलचे ज्ञान, तसेच भारतीय इतिहासाचा अभ्यास गाढा होता. मंत्रमुग्ध करणारी, चेतना जागवणारी त्यांची वाणी तरुणांना कार्यरत करणारी ठरली. त्यांचे हे गुण सर्वज्ञातच होते. त्यांचे सुरुवातीचे विभाग प्रचारक, ज्यांच्याबद्दल दुर्गानंदजींना खूप आदर होता; त्यांना ते गुरुस्थानी मानत असे मा. शिवरायजी तेलंग हे मूळ कारवारचे. दुर्गानंद नाडकर्णी यांची सारस्वत ब्राह्मणांच्या कवळे येथील मठाचे मठाधिपती म्हणून धुरा सांभाळण्यासाठी मान्यता मिळवावी, असा प्रस्ताव त्यांच्यामार्फत आला होता. परंतु, संघ सोडून अन्य कामात आपल्याला स्वारस्य नसल्याचे विनम्रतापूर्वक ठामपणे सांगून, सुमारे सहा महिन्यांपासून चाललेल्या या चर्चेला दुर्गानंदजींनी पूर्णविराम दिला.
 
आणीबाणी आणि दुर्गानंदजी
 
दुर्गानंदजींच्या जिल्हा प्रचारकपदाच्या कारकिर्दीतच इंदिरा गांधींनी ‘आणीबाणी’ लादली. यावेळी गोव्यात संघाच्या नेतृत्वाची फळी ही पूर्णपणे, पंचविशीतल्या तरुणांची होती. पोलिसांना थांगपत्ता लागू न देता दि. १८ नोव्हेंबर १९७५ रोजी पणजी आणि मडगाव अशा दोन प्रमुख शहरांत, एकाच वेळी संघस्वयंसेवकांचे आणीबाणीविरोधी सत्याग्रह घडवून आणण्याची योजना, दुर्गानंदजी यांनीच आखली होती. भूमिगत राहताना झब्बा धोतरऐवजी पॅण्ट-शर्ट घालून, आनंद शिरोडकर हे नाव त्यांनी धारण केले होते. सत्याग्रहानंतर पुन्हा आणखी तुकड्या उतरतील म्हणून पोलिसांनी पाच नेत्यांची धरपकड करून, त्यांना ‘मिसा कायदा’ लावला होता. दुर्गानंदजींच्या मागावरही पोलीस होते परंतु, काही केल्या ते पोलिसांना सापडत नव्हते. त्यांना पकडणार्‍याला २५ हजारांचे बक्षीसही जाहीर झाले होते. पत्रकांचे गुप्तपणे वाटप आणि रात्रीच्या वेळी रस्ते व भिंती रंगवणे या कामात सुमारे, २५० तरुण गोवाभर वावरत होते.
 
राष्ट्रपती फक्रुद्दीन अहमद यांच्या गोवाभेटीच्या वेळी, दाबोळी विमानतळ ते राजधानी पणजीपर्यंत २५ किमीच्या हमरस्त्यावर रात्रीच्या वेळी केलेल्या आणीबाणीविरोधी घोषणांच्या रोड-पेंटिंगने, तर गोवा पोलीस पार चक्रावून गेले. राष्ट्रपती परत त्या रस्त्याने जाण्यापूर्वी हे रोड-पेंटिंग पुसण्याचे काम, दिवसभर पोलीस करत होते. आणीबाणीत पोलिसांच्या नाकावर तुरी देऊन, प्रांतातील संघप्रचारकाची एक मोठी गुप्त बैठकही दुर्गानंदजींनी यशस्वीपणे पार पाडली. यानंतर खबरदारी म्हणून दुर्गानंदजींची बदली मुंबईला करण्यात आली. आणीबाणीतील या सर्व धाडसी कामासाठी पूर्ण मार्गदर्शन दुर्गानंदजींचेच होते. मुंबईला महानगर प्रचारक म्हणूनही त्यांनी काम सांभाळले.
  
सांगलीचे आव्हान व ‘हिंदू एकजूट’चे काम
 
मध्यंतरीच्या काळात सांगलीचे प्रचारक संभाजीराव भिडे संघातून बाहेर पडले. संघशाखा चालू करण्यासाठी एकही स्वयंसेवक मिळेना, अशी अवस्था होती. जबाबदारी स्वीकारण्यास कोणीही तयार होईनात. अशा परिस्थितीत सांगलीची पडझड थांबवून, नव्याने काम उभे करण्याचे आव्हान संघाने दुर्गानंदजींकडे सोपवले. एका वर्षभरात सांगलीची स्थिती सावरायला सुरुवात झाली. शेवटी, प्रचारक म्हणून थांबेपर्यंत ते संघानेच कल्पिलेल्या ‘हिंदू एकजूट’ या संघटनेची बांधणी आणि त्यायोगे घोडदौड आखत होते. ‘हिंदू एकजूट’चे ते संघटनमंत्री होते. या कामाची व्याप्ती महाराष्ट्र प्रांतभर असल्याने आणि गोव्यात ‘हिंदू एकजूट’च्या स्थापना व दृढीकरणासाठी यावे लागत असल्यान, पुन्हा एकदा दुर्गानंदजींचा सहवास व खंबीर मार्गदर्शन गोव्याला लाभू शकले. दक्षिण गोव्यातील एका खंडणीबहादर स्मगलर, बेकायदा शस्त्र-विक्रीचा एजंट असलेल्या गुंडाच्या दहशतीला जबरदस्त आव्हान देण्याचे काम, गोव्यातील ‘हिंदू एकजूट’ने दुर्गानंदजींच्या मार्गदर्शनाखाली केले. म्हापसा, मडगाव व वास्को शहरांत तर या गुंडगिरीला, दहशतीला ‘हिंदू एकजूट’च्या बॅनरखाली पूर्ण चिरडून काढण्यात आले. संघाच्या वाटेला पुन्हा म्हणून हा गुंड कधी आला नाही.
 
दुर्गानंदजींचे गोव्यातील स्थान
 
दुर्गानंदजींच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या दोन समर्थ पिढ्या आज सामाजिक, धार्मिक, सेवा, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व करीत आहेत. राष्ट्रीय क्षेत्रात चमकलेले माजी रक्षामंत्री मनोहर पर्रीकर, आजचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, केरळचे राज्यपाल असलेले राजेंद्र आर्लेकर, ‘विद्या भारती’च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी देशभर तळपलेले शिक्षणतज्ज्ञ दिलीप बेतकेकर, गोव्याच्या विविध क्षेत्रात अग्रेसर राहून आपला ठसा उमटवणारे माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी गोवा संघचालक व गोव्यातील राष्ट्रीय विचारांच्या सर्व आंदोलनांची उभारणी करणारे प्राचार्य सुभाष वेलिंगकर, ज्येष्ठ संघ विभाग कार्यकर्ते व मुष्टीफंड उच्च माध्यमिकचे माजी प्राचार्य रत्नाकर लेले, ‘विश्व हिंदू परिषद’ परिवाराचे स्व. सुधीर देसाई, यशवंत पराडकर, ‘मातृछाया’चे दिलीप देसाई, डॉ. हेडगेवार या अग्रगण्य शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा सुभाष देसाई, ‘अभाविप’चे मार्गदर्शक स्व. प्रा.डॉ. दत्ता भि. नाईक, ‘राज्य शिक्षण विकास महामंडळा’चे संचालक गोविंद पर्वतकर, सेवा क्षेत्रास समर्पित ‘केशव सेवा साधना’चे प्रमुख लक्ष्मण तथा नाना बेहरे, माजी खासदार विनय तेंडुलकर, शिक्षणातले व विद्यार्थी परिषदेचे गोविंद देव आदी दुर्गानंदजींच्या तालमीतच तयार झालेे आहेत. दुर्गानंदजी हे आजही या सगळ्यांचे अविस्मरणीय प्रेरणास्थान आहेत.
 
‘प्रचारक’पदातून मुक्त झाल्यानंतर
 
संपूर्ण महाराष्ट्रात व गोव्यात दुर्गानंदजींच्या वास्तव्याने पुनीत झालेली अनेक घरे आहेत. ते ज्या-ज्या घरात पोहोचले, तिथे ते फक्त कार्यकर्त्यांपुरते उरले नाहीत; तर ते त्या संपूर्ण कुटुंबातलेच अविभाज्य घटक झाले. ३५ वर्षे संघाचे प्रचारक म्हणून काम केल्यावर, साधारण १९९४ साली ते मुक्त झाले. गोव्यात व महाराष्ट्रात त्यांच्या सर्वस्पर्शी मार्गदर्शनासाठी आसुसलेले कार्यकर्ते व कुटुंबे आहेत. तामसुलीचे स्व. डॉ. अण्णा सावईकर, शिरोड्याचे स्व. हरिभाऊ पाटील, कवळ्याचे शांतारामपंत सरज्योतिषी, मंगेशीचे स्व. आनंदराव भावे, ओपाचे सुहास तथा बापू देसाई, डिचोलीचे डॉ. माधव लेले, सावंतवाडीचे डॉ. त्र्यंबक तथा बाळासाहेब लेले, म्हापशाचे अवधूत व मनोहर पर्रीकर, विवेक केरकर, मडगावचे अभय खंवटे, रिवणचे स्व.सर्वोत्तमभाऊ प्रभुदेसाई अशी त्यांची गोव्यातील काही मुक्कामाची घरे राहिली.
 
...संन्यास घेतला
 
१९९६ साली त्यांनी सद्गुरूंकडून संन्यास दीक्षा घेतली. त्यानंतर त्यांचा प्रवास कमी झाला. त्यांचेच शिष्योत्तम ‘हिंदू एकजूट’चे माजी प्रांत उपाध्यक्ष, लातूरच्या प्रख्यात ‘रिलायन्स कोचिंग’चे संचालक उमाकांत होनराव यांचे घर हे त्यांचे अंतापर्यंतचे वसतिस्थान बनले. दि. २० डिसेंबर २०२५ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले आणि एक झंझावाती वादळ शांत झाले. प्रारंभी पाहिलेली त्यांची गोरीपान यष्टी, तरतरीत नासिका, तेजस्वी डोळे, खणखणीत वाणी, दुटांगी धोतर, झब्बा असा वेश आणि प्रथमदर्शनीच आदर वाटावा असे सात्त्विक व्यक्तिमत्त्व, आजही डोळ्यांसमोर तरळत आहे. ते सदा अविनाशी, अविस्मरणीयच राहणार आहेत.
 
 
- प्रा. सुभाष वेलिंगकर