ॲट्रॉसिटी ॲक्टच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सोलापूर जिल्ह्यात विशेष अधिकारी नियुक्त
26-Dec-2025
Total Views |
मुंबई : ( Special Officer for Atrocities Act ) अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील समाजावर होणारे अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी तसेच ॲट्रॉसिटी ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सोलापूर जिल्हास्तरावर अपर जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ आणि नियम १९९५ मधील नियम १० अन्वये हे आदेश पारित केले आहेत.
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (एनडीएमजे) या संघटनेचे राज्य महासचिव केवलजी ऊके यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव वैभव गीते यांनी मंत्रालय स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत या मागणीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याचे सांगण्यात येत आहे.
नियुक्त विशेष अधिकारी अत्याचारग्रस्तांना तातडीची मदत व सुविधा उपलब्ध करून देणे, अत्याचारांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, अनुसूचित जाती-जमाती समाजाला त्यांच्या कायदेशीर हक्कांविषयी जनजागृती करणे, स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधणे, फिर्यादी व साक्षीदारांना पोलीस संरक्षण देणे, विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करणे, दक्षता व नियंत्रण समित्यांच्या बैठका नियमित होतात की नाही याचा आढावा घेणे तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये तात्काळ कारवाईचे आदेश देणे, अशी जबाबदारी पार पाडणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत अन्याय झाल्यास किंवा तपास प्रक्रियेत अडचणी येत असल्यास जिल्हास्तरावर नियुक्त विशेष अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन एनडीएमजेचे राज्य सचिव वैभव गीते यांनी केले आहे.