मुंबई : ( Devendra Fadnavis ) साहिबजादांच्या धैर्याने आणि बलिदानाने भारतीय इतिहासाला नवी दिशा दिली असून, त्यांचे शौर्य सदैव पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शीख पंथीयांचे दहावे गुरू श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे) आणि साहिबजादे बाबा फतेह सिंग (वय ७ वर्षे) यांच्या अद्वितीय शौर्य व बलिदानाच्या स्मरणार्थ २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून पाळला जातो. सायन येथील गुरूद्वारा गुरू तेग बहादूर दरबार येथे वीर बाल दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वीर शहीद साहिबजादे यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या अद्वितीय शौर्याचे स्मरण केले.
यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार तमिल सेल्वन, श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम समितीचे राज्यस्तरीय समन्वयक रामेश्वर नाईक, पंजाबी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष बल मलकित सिंह, गुरुद्वारा समितीचे सदस्य दलजीत सिंग, गुरुदेव सिंग, जसपाल सिंग सिद्धू, हॅपी सिंग, डॉ. अजयसिग राठोड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "वीर बाल दिवसाच्या निमित्ताने गुरूंनी दाखविलेल्या मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात अंगीकारण्यासाठी आपण स्वतःला कृतीतून संकल्पित केले पाहिजे. राष्ट्रासाठी आपले शीश समर्पित करणाऱ्या गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या महान बलिदानाला देश कधीही विसरणार नाही. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या संपूर्ण परिवाराने देश, संस्कृती आणि संस्कारांसाठी दिलेले बलिदान इतिहासात अजरामर आहे. २६ डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. गुरु तेग बहादूर यांनी शेवटपर्यंत आपले रक्षण केले असल्याने त्यांच्या इतिहास सर्वांनी कायम लक्षात ठेवावा."
"गुरू गोविंद सिंग यांच्या संपूर्ण परिवाराने दिलेली शहादत ही देशासाठी सदैव प्रेरणादायी राहिली आहे. इतके मोठे बलिदान सहन करूनही गुरू गोविंद सिंग आपल्या उद्दिष्टापासून कधीही विचलित झाले नाहीत. राज्य शासन गुरू तेग बहादूर यांचे शहीदी समागम वर्षही साजरे करीत आहे. ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरू तेग बहादूर यांनी देशासाठी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले. भारत देश आणि संपूर्ण मानवता कधीही या महान बलिदानांना विसरणार नाही. त्यांच्या त्यागामुळेच आज आपले अस्तित्व, पंथ, भाषा आणि संस्कृती टिकून आहे. त्यांच्या बलिदानापुढे आपण सर्वांनी नम्र होऊन नतमस्तक व्हायला हवे," असे ते म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....