एकमेका साहाय्य करू...

    26-Dec-2025   
Total Views |

Congress
 
‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस पक्षाला ही म्हण तंतोतंत लागू होते. याचे कारण असे की, नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये एकूण विरोधी पक्षांपैकी काँग्रेसचे पारडे जरा जड झाले. याच आत्मविश्वासातून स्वबळाचे नारे देणार्‍या काँग्रेसने नवे पर्याय शोधण्याचा कार्यक्रम हाती घेतल्याचे दिसते.
 
दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. खरेतर जानकर यांचा आजवरचा इतिहास पाहता, त्यांच्यासाठी हा एक नवा प्रयोगच म्हणावा लागेल. पण, काँग्रेसचे काय? ठाकरे बंधूंचा हात सोडल्यावर काँग्रेसने शरद पवारांचा हात धरण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा प्रयत्न फसला म्हणून की, काय आता त्यांनी छोट्या पक्षांची शोधमोहीम चालवली आहे. वास्तविक, शरद पवार यांच्या पक्षासमोर सध्या ठाकरे बंधू, काँग्रेस आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन मुख्य पर्याय आहेत.
 
मात्र, आपण कोणता प्रयोग केला तर किमान आपल्या दोन अंकी जागा येतील, याबद्दल त्यांची चाचपणी सुरू दिसते. त्यामुळेच काँग्रेसच्या प्रस्तावाला त्यांनी अद्याप प्रतिसाद दिला नसावा. अशा परिस्थितीत शरद पवार गटावर अवलंबून राहणे परवडणार नाही, हे काँग्रेसच्या लक्षात आल्यानेच त्यांनी आता इतर छोट्या पक्षांची युती करणे सुरू केलेय का? दुसरीकडे युतीकरिता काँग्रेसची वंचितसोबतही बोलणी सुरू असल्याचे समजते. खरेतर, संघटनात्मक कमजोरी, कार्यकर्त्यांची गळती आणि स्थानिक नेतृत्वाचा अभाव, यामुळे काँग्रेसवर छोट्या पक्षांचा आधार घेण्याची वेळ आली. ‘रासप’लाही आपल्या राजकीय विस्तारासाठी मोठ्या पक्षासोबत जाण्याची गरज वाटली असावी. दोन्ही बाजूंकडून ही युती वैचारिक सुसंगतीपेक्षा परस्पर गरजेतून झाल्याचे अधिक दिसते. थोडयात काय, तर काँग्रेसकडे स्वबळावर राजकीय लढाई लढण्याइतकी ताकद शिल्लक नसल्याने त्यांना ‘रासप’सारख्या छोट्या; पण विशिष्ट मतदारवर्ग असलेल्या पक्षावर अवलंबून राहावे लागते आहे, अशी ही देशातील सर्वांत जुन्या पक्षाची बिकट अवस्था!
 
एक ना धड भाराभर चिंध्या!
 
राष्ट्रीय समाज पक्षा’चे संस्थापक तथा अध्यक्ष महादेव जानकर यांची अवस्था सध्या ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशीच झाली आहे. आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी आता त्यांनी काँग्रेसचा ‘हात’ धरला असून, ‘रासप’ आणि काँग्रेस एकत्र लढणार आहेत. वास्तविक, ‘रासप’ हा अन्य मोठ्या पक्षांचा आधार घेऊनच मोठा झालेला पक्ष आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महादेव जानकर यांनी आजवर अनेक पक्षांशी युत्या-आघाड्या केल्या. परंतु, त्यांनी सोयीनुसार आपल्या भूमिका वेळोवेळी बदलल्या. २०१४ मध्ये त्यांनी भाजप-शिवसेना महायुतीला पाठिंबा दिला आणि त्यांना राजकीय ताकद मिळाली. एवढेच नाही तर २०१४-१९ मध्ये ते देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्रीसुद्धा होते.
 
पुढे २०१९ नंतर त्यांनी महाविकास आघाडीशी जवळीक साधली. शिवाय, त्यांनी अनेकदा राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याचीही भूमिका घेतली. त्यानंतर २०२२-२४ दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा महायुतीशी जवळीक वाढवली. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूकही लढवली, पण अपयश आले. आजपर्यंत एकदाही जनतेतून निवडून गेलेले नसतानाही, भाजपने जानकरांना विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपद दिले. मात्र, आता त्यांनी काँग्रेससोबत नवीन मोट बांधण्याचा निर्णय घेतला. निवडणुका जवळ आल्या की, जानकर भूमिका बदलताना दिसतात. त्यामुळे धनगर समाजाच्या प्रश्नावर लढणारे महादेव जानकर हे धनगर समाजाचे खरे प्रतिनिधी आहेत का? की प्रत्येक वेळी स्वतःसाठी संधी शोधणारे राजकारणी? असा सवाल उपस्थित होतो.
 
वास्तविक, सद्यस्थितीत काँग्रेसची अवस्था पाहता, जानकर यांनी कोणते निकष डोळ्यापुढे ठेवून काँग्रेससोबत युती केली? हा प्रश्न आहेच. कधी भाजप जवळ, कधी काँग्रेसशी चर्चा, कधी तिसर्‍या आघाडीची भाषा, या सगळ्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. ‘कभी इधर, कभी उधर’ असे करता-करता आता ही नवी मोट किती दिवस टिकेल, हे पाहणे औत्सुयाचे. शिवाय, जनता या नव्या समीकरणाला किती पसंती दर्शवणार, यावरच या आघाडीचे भवितव्य.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....