भारतीय संगीत क्षेत्रात अवर्णनीय श्रवणानंद देण्याचे सत्कर्म आजतागायत चित्रपटगीतांनी केले आहे. या अद्भुत गीतांच्या माध्यमातून सर्व समाजात आनंदाचा परिमळ पसरवण्याचे पुण्यकर्म अनिल झोपे नावाचा अवलिया आपली सहधर्मचारिणी राखी झोपे यांच्या समर्पित योगदानातून सातत्याने करीत आहे.
परगाव येथे अनिल यांचे बालवाडी ते ‘बी.ई.’पर्यंत शिक्षण झाले. अनिल यांची इयत्ता पाचवीत असताना केतन कुलकर्णी यांच्याशी मैत्री जुळली. कुलकर्णी कुटुंबीय संगीताचे उपासक होते. उच्चशिक्षित प्राध्यापकांसोबत छोटे शाळकरी विद्यार्थी असलेले अनिल न चुकता, या मैफिलींना हजेरी लावायचे. सादर होणारी गाणी लक्षपूर्वक ऐकायचे अन् त्यातूनच बालवयात त्यांचा कान तयार झाला. सुगम आणि चित्रपटसंगीताचे बीजारोपण मनात होत गेले. सातवीत असताना शाळेत ‘भावगीत गायन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. योगायोगाने केतन यांची आईच अनिल यांची वर्गशिक्षिका होती.
त्यामुळे त्यांनी अनिल यांना स्पर्धेत भाग घ्यायला लावला. त्यांनी नकार देण्याचा प्रयत्न केला; पण कुलकर्णीबाईंनी ‘प्रभाती सूर नभी रंगती...’ या भावगीताची त्यांच्याकडून तयारी करून घेतली. स्पर्धेत अनिल यांनी गायला सुरुवात केली; पण सूर रंगायच्या ऐवजी त्यांचे पाय लटलट कापत होते. जरी पहिला अनुभव असा असला, तरी आपण गाऊ शकतो, हा विश्वास मात्र त्यांच्यासाठी एका सुरेल वाटचालीतील पहिली पायरी ठरला.
अनिल यांचे वडील कोपरगाव येथील एका महाविद्यालयात गणित विभागप्रमुख होते. त्यांच्या कडक शिस्तीत सार्वजनिक कार्यक्रमात गाण्याचे धाडस न करता, त्यांची बारावीपर्यंतची शैक्षणिक वाटचालदेखील यशस्वी झाली. पुढे अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नेहसंमेलन खूप जोरदार होत असे. महाविद्यालय व्यावसायिक वाद्यवृंदासोबत गाण्याची संधी देत असल्याने अनिल यांनी १९८९मध्ये पहिल्याच वर्षी ‘मैंने प्यार किया’ या अत्यंत गाजलेल्या चित्रपटातील एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्या मूळ आवाजातील ‘दिल दिवाना बिन सजना के मानेना...’ या लोकप्रिय गाण्याची प्रॅटिस केली.
याच आत्मविश्वासाच्या बळावर पुढील तीनही वर्षे त्यांनी स्नेहसंमेलन गाजवले. अभियंत्याची पदवी प्राप्त झाल्यानंतर १९९५ मध्ये नोकरी सुरू झाली. नोकरीनंतर १९९७ मध्ये विवाह झाला. सौभाग्यवती राखी यांचा अर्धांगिनी म्हणून अनिल यांच्या जीवनातील प्रवेश खूपच भाग्यकारक ठरला. त्यांनी अनिल यांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यातूनच १९९७ मध्ये इंजिनिअरिंग फॅब्रिकेशनचे युनिट भागीदारीमध्ये चिंचवड येथील औद्योगिक वसाहतींमध्ये सुरू केले. विविध प्रकारचे उद्योग, डोमेस्टिक अप्लायन्सेस ट्रेडिंग, ऑटोमोबाईल कार गॅस किट फिटिंग, पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट इत्यादी व्यवसाय त्यांनी १९९८ ते २००९ या काळात भागीदारीमध्ये केले.
अनिल झोपे हे आपल्या राहत्या सोसायटीतील गणेशोत्सवात, अन्य कार्यक्रमांत सक्रिय सहभाग घेऊन संगीतसेवा करतात. २००३ मध्ये अनिल यांनी मनीष रुब्धी यांच्याकडून वर्षभर ड्रमवादनाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांच्या ‘वॉल्ट्झ म्युझिक’ संस्थेच्या माध्यमातून विविध हॉटेल्स, थिएटर आणि अन्य ठिकाणी गाण्याची संगीतसाधना करून अनिल झोपे सातत्याने अनुभवसंपन्न होत गेले. २०१६ मध्ये चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘शतदा प्रेम करावे...’ या कार्यक्रमात ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी...’ हे भावगीत गाण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. २०१८ ते २०२० या कालावधीत मित्रवर्य राजकुमार सुंठवाल आणि रवी हिरेमठ यांच्या ‘सिंगर्स लब’मध्ये आठ-दहा वेळा गाण्याची संधी अनिल यांचे सांगीतिक भावविश्व समृद्ध करून गेली. त्या शिकवणुकीतून त्यांनी सन २००० पासून ‘लायन्स लब इंटरनॅशनल’ या जागतिक पातळीवरील संस्थेच्या पुण्यातील भोसरी शाखेत सक्रिय सभासद म्हणून योगदान देण्यास सुरुवात केली. तेथेही संगीत स्पर्धांमध्ये सहभागी होत त्यांनी अनेक बक्षिसेही पटकावली.
दरम्यान, २०१९ आणि २०२१ मध्ये ‘कोरोना’ने संपूर्ण जनजीवन ठप्प केले. अनिल झोपे यांनी या आपत्तीला इष्टापत्ती मानून संगीताचा विकास केला. २०२० मध्ये ‘फेसबुक लाईव्ह शो’ केले. २०२२ मध्ये ‘भोसरी महोत्सवा’त ’गोल्डन व्हॉईस-२०२२ कराओके’ या भव्य स्पर्धेत प्रा. दिगंबर ढोकले या मित्राच्या सल्ल्यानुसार सहभागी होत, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक त्यांनी मिळवले. २०२३ मध्ये निखिल मुळे प्रॉडक्शन आयोजित ’कराओके प्रीमियर लीग सिंगिंग कॉम्पिटिशन’ या महाराष्ट्र स्तरावरील स्पर्धेत त्यांनी अंतिम फेरी गाठली. नाशिक येथील परशुराम सायखेडकर सभागृहात संपन्न झालेल्या ग्रँड फिनालेत ’बेस्ट एंटरटेनमेंट साँग ऑफ ग्रँड फिनाले’ हे पारितोषिक म्हणजे अनिल झोपे यांच्यासाठी मानाचा अन् अत्यानंदाचा प्रसंग होता.
यावेळी त्यांचे जवळचे मित्र कृष्णाजी कुलकर्णी, वारजे हेदेखील उपस्थित होते. या यशानंतर सांगीतिक वाटचालीत ‘लायन्स लब’मधील राजेंद्र गांगड, विजय किल्लेदार, श्यामकुमार माने, सदानंद भोसले या जवळच्या मित्रांनी एका म्युझिकल लबची स्थापना करण्याचा प्रस्ताव ठेवला अन् त्यातूनच राखी झोपे यांच्या समर्पित योगदानातून ‘इंडियन म्युझिकल लब’ची उभारणी नोव्हेंबर २०२३ मध्ये करण्यात आली. ‘स्प्रेडिंग हॅपिनेस ऑल ओव्हर’ अर्थातच, ’सर्वत्र आनंदाची दरवळ’ हेच ब्रीद या लबच्या स्थापनेमागे आहे.
‘इंडियन म्युझिकल लब’ ही संस्था पिंपरी-चिंचवड शहरातील हौशी गायक कलाकारांसाठी एक वरदान ठरली आहे. स्थापनेपासून आजतागायत एकूण ४२ सांगीतिक मैफिली लबने पिंपरी-चिंचवडमधील नामांकित रामकृष्ण मोरे व ग. दि. माडगूळकर सभागृहांमध्ये यशस्वी केल्या आहेत. या मैफिलींच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे १५९ गायक-गायिकांना गायनाची संधी लाभली आहे. ‘इंडियन म्युझिकल लब’चा स्वतःचा अद्ययावत म्युझिकल स्टुडिओ ग्रीन सेंटर, थेरगाव, चिंचवड येथे आहे. आशिष कुलकर्णी यांनी हा स्टुडिओ तयार करण्यास नि:स्वार्थ मदत केली.
आज तेथे तीन पूर्णवेळ आणि चार अर्धवेळ सहकारी- संजय वाघचौरे, दीपक निस्ताने, धनश्री भोळे, प्रशांत चौधरी, निखिल वाणी हे नवोदित गायकांना प्रशिक्षण देणे, ध्वनिमुद्रण करणे, विविध म्युझिकल कार्यक्रमांचे आयोजन करणे ही कामे करीत असतात. ‘अनिल’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘वारा’ असा होतो. अनिल झोपे आणि राखी झोपे यांचे सांगीतिक कार्य म्हणजे आजच्या धकाधकीच्या अन् ताणतणावाच्या समाजजीवनाला आनंद प्रदान करणारी हवेची सुखद अन् सुरेल झुळूक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
- अतुल तांदळीकर