अल्जेरियाचा ‘तो’ कायदा

    26-Dec-2025   
Total Views |
algeria
 
दि. ५ जुलै १९६२ साली अल्जेरियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले. त्याक्षणापर्यंत फ्रान्सचे म्हणणे होते, ‘अल्जेरिया इज फ्रान्स.’ मात्र, कालपरवा फ्रान्सच्या वसाहतवादी कारकिर्दीच्या विरोधात कायदा करताना अल्जेरियामध्ये जमलेले सगळे राजकीय नेते, अधिकारी म्हणत होते, ‘लाँग लिव्ह अल्जेरिया.’ अल्जेरियाचा हा कायदा काय आहे, तर फ्रान्सने लादलेली वसाहतवादाची राजवट गुन्हा आहे. त्यामुळे फ्रान्सने त्यासाठी माफी मागावी आणि त्यादरम्यान केलेले अत्याचार, क्रूर हिंसा, नरसंहार याविरोधात नुकसानभरपाई करावी, असा कायदा.
 
अल्जेरियाने मंजूर केलेला कायदा आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्रान्सवर बंधनकारक आहे का? तर नाहीच! त्यामुळे फ्रान्स एकवेळ भूतकाळातल्या त्या राक्षसी अत्याचारांविरोधात माफी मागेल. पण, त्या भूतकाळाची नुकसानभरपाई करण्याची सक्ती फ्रान्सवर नाही. असे जरी असले, तरी अल्जेरियाच्या या कायद्याला राजकीय आणि प्रतीकात्मक खूप महत्त्व आहे. या कायद्याचे महत्त्व समजून घेण्याआधी अल्जेरियाचा इतिहास पाहणेही महत्त्वाचे आहे. अल्जेरियाचा इतिहास प्राचीन बर्बर सभ्यतेने सुरू होत; पुढे फोनीशियन, रोमन, वंडल आणि बीजान्टिन शासकापर्यंत समान पातळीवर आहे. पुढे आठव्या शतकामध्ये अरब-इस्लामी आक्रांतांनी इथे प्रवेश केला. त्यांनी अल्जेरियाची प्राचीन संस्कृती हिंसकतेने पराजित केली आणि तिथे राज्य केले. ओटोमन अर्थात, उस्मानी शासकाचा काळ सुरू झाला. पुढे १८३० ते १९६२ या प्रदीर्घ कालावधीत फ्रान्सने अल्जेरियावर गुलामी लादली.
 
अर्थात, जगाचा इतिहास पाहिला, तर पाश्चात्त्यांच्या वसाहतवादी स्वरूपात गुलामीमध्ये जगभराचे देश पारतंत्र्यात होते. त्यांचे अनन्वित शोषण झाले. अनेक देशांमधून तिथले मूळ समाज, मूळ संस्कृती नामशेष झाली. नव्हे, त्यांची पाळेमुळे या वसाहतवादी मानसिकतेच्या राष्ट्रांनी क्रूरपणे चिरडून टाकली. आपल्या भारतावरही ब्रिटिशांचे असे क्रूर राज्य होतेच. तर, फ्रान्सनेही अल्जेरियावर १३२ वर्षे गुलामी लादली. या काळात अल्जेरियामध्ये क्रूर नरसंहार झाला. कोणी राजसत्तेविरोधात उठाव करू नये, म्हणून गावेच्या गावे जाळली गेली. इथल्या लोकांना गुलाम बनवले गेले. महिलांवरच्या अत्याचाराला तर सीमाच नव्हती. इथल्या लोकांनी त्यांची संस्कृती, धर्म विसरावा म्हणून फ्रान्सने मोठ्या प्रमाणावर दडपशाही केली. एकंदर हा काळ अल्जेरियासाठी अंधार आणि क्रूर युगाचा होता.
 
पण, दुसर्‍या महायुद्धानंतर ब्रिटन, फ्रान्स, पोर्तुगाल वगैरे वसाहतवादी देशांची महायुद्धामुळे परिस्थिती खालावली होती. त्यामुळे त्यांच्या गुलामीत असलेले देश स्वतंत्र झाले होते. यामध्ये फ्रान्सची परिस्थिती नाजूक झाली. यादरम्यान, अल्जेरियामध्ये फ्रान्सविरोधात आवाज घुमू लागला. १९५४ सालापासून अल्जेरियामध्ये हिंसक पद्धतीने फ्रान्सला विरोध होऊ लागला. दि. १७ ऑक्टोबर १९६१चा तो दिवस. अल्जेरियामध्ये जवळजवळ ३० हजार लोक रस्त्यांवर उतरले आणि त्यांनी स्वातंत्र्याची मागणी केली. मात्र, फ्रान्सने रस्त्यावर सैन्य उतरवले. या सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला. शेकडो लोक त्या गोळीबारात मृत पावले आणि हजारो लोक जखमी झाले. या घटनेने अल्जेरियामध्ये स्वातंत्र्यासाठीचा लढा अधिकच तीव्र झाला.
 
पुढे अल्जेरियाला स्वातंत्र्य देण्यासाठी फ्रान्सने करार केला. त्यानुसार, स्वातंत्र्यानंतरही फ्रान्स अल्जेरियाच्या सहार वाळवंटामध्ये अणुचाचणी करू शकणार होता. फ्रान्सने अल्जेरियामध्ये १९६० आणि १९६६च्या दरम्यान १७ अणुचाचण्या केल्या. या सगळ्यांचा परिणाम अल्जेरियाच्या सहार पट्टीतील नागरिकांवर झाला. लाखो लोक कर्करोगग्रस्त, जन्मतःच विकलांग झाले. पिढ्यान्पिढ्या हेच सुरू राहिले. अल्जेरियामधून निघताना फ्रान्सने ही क्रूर भेट दिली होती. या सगळ्यामुळे स्वातंत्र्यानंतरही अल्जेरियाचे कधीही फ्रान्सशी सलोख्याचे संबंध निर्माण झाले नाहीत. दुसरीकडे फ्रान्सनेही वेळोवेळी असे दर्शवले की, आम्ही अल्जेरियावर राज्य केले होते. असो. आशिया आणि आफ्रिका खंडातील देशांचा भूतकाळ तर गुलामीच्या क्रूर पर्वाने रक्तरंजित झालेला होता. हे सगळे देश, त्यात आपला भारत देशसुद्धा आपला भूतकाळ विसरू शकतो का? नाहीच. त्यामुळे अल्जेरियाच्या या कायद्याचे महत्त्व मानायलाच हवे.
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.