आशयनिर्मितीतील भविष्य

    25-Dec-2025   
Total Views |
Creator Economy
 
अमेरिकेत प्रतिहजार ‘इन्स्टाग्राम युझर’मागे १४ इन्फ्लुएन्सर्स आढळतात. भारताची तुलना करायची झाल्यास, ही संख्या केवळ १.५ इतकी. याचाच अर्थ, भारतात अद्याप ‘क्रिएटर इकोनॉमी’ (आशयनिर्मितीतील अर्थव्यवस्था) वाढण्यास वाव आहे. एका अहवालानुसार, याद्वारे एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षाही म्हणजेच एक लाख कोटी डॉलर्सपेक्षाही अधिक उलाढालीची शक्यता आहे. यासंदर्भातील हे आकलन...
 
मला जेव्हा माझ्या पतीने सांगितले की, भविष्यात कुणीही टीव्ही पाहणार नाही. आपण युट्यूब चॅनेल सुरू करू, व्लॉगिंग करू. तेव्हा मी त्याला विचारले की, याने काय होणार आहे? पण, मी जेव्हा हे सगळं सुरू केलं, तेव्हा माझ्या नेमकं लक्षात आलं. लोकांचं जे प्रेम मिळतंय, त्यांच्या प्रतिसादाने मी अगदी भारावून गेले. आज माझ्या कमाईचा ४० टक्के भाग हा युट्यूबद्वारे मिळतो. टीव्हीद्वारे मला ६० टक्के रक्कम मिळते.” कलाकार आणि अभिनेत्री भारती सिंहने आपल्या एका पॉडकास्टमध्ये सांगितलेला हा अनुभव, आज प्रत्येकाला विचार करायला लावणारा आहे.
 
‘क्रिएटर इकोनॉमी’ ही अर्थशास्त्रातील एक नवी संज्ञा निर्माण होऊन वेगाने उत्पन्नवाढीकडे जाणारी अर्थव्यवस्था म्हणून विकसित होताना दिसते. याचवर्षी दि. १ ते ४ मे दरम्यान मुंबईत पार पडलेल्या ‘व्हेवज् इंडिया-२०२५’ या परिषदेत ही गोष्ट प्रामुख्याने अधोरेखित झाली होती. भारत या संपूर्ण ‘क्रिएटर इकोनॉमी’द्वारे सॉफ्ट पॉवर म्हणून उदयाला येत आहे. https://wavesindia.org/ या संकेतस्थळावर याविषयीची संपूर्ण इत्यंभूत माहिती आजही उपलब्ध आहे. माध्यम क्षेत्र असो वा सर्जनशील क्षेत्र, यातील प्रत्येकासाठी विश्वरूप दर्शन घडावे, असा देदीप्यमान सोहळा मुंबईत पार पडला होता.
 
आणखी क्रिएटर्स तयार व्हावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारशी सामंजस्य करार करीत ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नोलॉजी’ ही प्रशिक्षण संस्था उभारणीची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. असे हे क्रिएटर्सचे क्षेत्र २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याकडे वेगाने कूच करीत आहे. ‘बॉस्टन कन्सल्टिंग’ समूहाने दिलेल्या एका अहवालानुसार, देशात सुमारे २० ते २५ लाख उत्पन्न मिळवणारे क्रिएटर्स हे ३० टक्क्यांहून अधिक ग्राहकांवर आपला प्रभाव टाकत असून, त्यातून होणार्‍या उलाढालीचा आकडा हा सध्या ४०० अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. याचा सरळ अर्थ असा की, या क्रिएटर्सकडे आपसूकच जाहिरातदार, धोरणकर्तेही आकर्षित होतात. या वर्गाचा प्रभाव लोकसंख्येतील एका महत्त्वाच्या घटकावरही अवलंबून असतो. केवळ जाहिरात नव्हे, तर प्रोडट रिव्ह्यू, डिजिटल मार्केटिंग, फिलेट मार्केटिंग, प्रमोशन व्हिडिओ असे अनेक प्रकार यादरम्यानच्या काळात उदयास आले. फॅशन, ब्युटी, इलेट्रॉनिस आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंची भलीमोठी बाजारपेठ यानिमित्ताने या वर्गासाठी खुली झाली. विशेष म्हणजे, जाहिरात यंत्रणा अशा क्रिएटर्ससाठी पायघड्या घालून सज्जच असतात.
 
भारताची लोकसंख्या सुमारे १४० कोटी. त्यात आपल्या देशात प्रामुख्याने इंग्रजी वगळता मराठीसह एकूण २१ भाषा बोलल्या जातात. २०११च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार, भारतात मराठी भाषक आठ कोटींहून अधिक आहेत. भारताबाहेर असलेल्या मराठी भाषकांची संख्या तेव्हाच्या अंदाजानुसार १०-१५ लाख इतकी होती. आताचा विचार केल्यास, या आकड्यात किमान १७ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. त्यात बोलीभाषा तर वेगळ्याच. त्यामुळे आपली गोष्ट सांगण्यासाठी ना भाषेचे बंधन आहे, ना कुठल्याही सीमांचे!
 
भारतातील प्राचीन आणि वैभवशाली इतिहासामुळे येथील संस्कृतीची बीजेही पार खोलवर रुजलेली. ‘एआय’चा वापर करत अशा गोष्टी समोर आणणारे क्रिएटर्सही आता पुढे येत आहेत. उदाहरण घ्यायचे झाल्यास, ‘रामसेतू’ निर्माण करत असताना काय स्थिती होती? श्री हनुमंतांनी लंका जाळली तेव्हाचे दृश्य काय असेल? अशा विविधांगी गोष्टी आपल्याला ‘एआय’द्वारे दृश्यस्वरूपात दर्शन घडवणारे क्रिएटर्ससुद्धा प्रसिद्ध आहेत.
 
पाककला, राशी-भविष्य, मनोरंजन, खाद्यसंस्कृती दर्शन, पर्यटन, राजकारण, शिक्षण, आरोग्य, आंतरराष्ट्रीय घडामोडी, बातम्या अशा अनेक विषयांवर सध्या मोठ्या प्रमाणात मजकूरनिर्मिती समाजमाध्यमांवर होताना दिसते. अनेक क्रिएटर्स ‘व्लॉगिंग’ करूनही चांगली कमाई करतात. त्यामुळे हे क्रिएटर्स दररोज प्रेक्षकांना नवे काय देणार? आणि त्यांच्या आशयवैविध्यात सातत्य कसे ठेवणार? या गोष्टींवरच या क्रिएटर्सची सर्वस्वी मदार. पण, यापैकी बर्‍याचशा क्रिएटर्सना सातत्य आणि शिस्तीअभावी गाशा गुंडाळण्याचीही वेळ येते, हेदेखील वास्तव.तसेच आशयनिर्मिती करताना प्रामुख्याने ‘मिलेनिअल्स’ व ‘जेन-झी’चा विचार करावाच लागणारच आहे.
 
आता भविष्यात गरज भासणार आहे, ती या मोठ्या वर्गाला लागणार्‍या संसाधनांची. अद्याप या वस्तूंच्या निर्मितीत चीन, जपान आणि अमेरिकन कंपन्या आघाडीवर आहेत. भारतीय क्रिएटर्स अर्थव्यवस्थेला पूरक अशा संसाधनांची निर्मिती भारतात होणे गरजेचे आहे. मुळात इथल्या उद्योगजगताने या गरजा समजूनही घ्यायला हव्यात, अन्यथा पुन्हा भविष्यात बाजारपेठेत विदेशी कंपन्यांचा शिरकाव निश्चित आहे. राहिला प्रश्न अद्याप जे या क्षेत्रात नाहीत त्यांचा, तर या वर्गाने कुठूनही का होईना एक सुरुवात करण्याची गरज आहे. अश्लीलता दूर ठेवूनही चांगला मजकूर निर्माण करता येतो, याची अनेक उदाहरणे आज आहेत. आपल्या परंपरा, आपले अनुभव कथन, हलके-फुलके विनोद याप्रकारच्या आशयनिर्मितीचा वेगळा चाहता आहेच. लोक काय म्हणतील? या प्रश्नामागे घुटमळत राहण्यापेक्षा श्रीगणेशा केलेला केव्हाही चांगले.
 
नव्या संकल्पना, नव्या संधींना नक्कीच या क्षेत्रात वाव आहे. प्राजक्ता कोळी, (टेक्निकल गुरुजी) गौरव चौधरी, ‘सीए’ रचना रानडे, भूवन बाम, बीयुनिक, कोटा फॅटरी इत्यादी चॅनेल्सने प्रचंड लोकप्रियता मिळवली. यातही पॉडकास्ट, ट्रॅव्हेल व्लॉग, लाईफस्टाईल यांसारख्या असंख्य गोष्टी करण्यासारख्या आहेत. मराठी क्रिएटर्सकडे असलेल्या संकल्पना भन्नाट आहेत, त्यांनी तर जागतिक पातळीवर मराठी पोहोचवली. हिंदीत जरी गेले, तरी त्यांनी आपल्या प्रेक्षकांना धरून ठेवण्याचे कसब जमवले आहे. चांगल्याप्रकारे जमले तर ‘स्टॅण्डअप कॉमेडी’ हादेखील एक आशयनिर्मितीचा भाग बनला आहे. तिथेही जगभरातले‘टॅलेंट’ आहे. भविष्यात ही बाजारपेठ आणखी वाढत जाईल. भारतात एकूण इन्फ्लुएन्सर्सची संख्या सध्या २५ लाखांच्या घरात आहे. भविष्यात ही संख्या वेगाने वाढत जाईल आणि एका मोठ्या वर्गावर त्याचा प्रभाव असेल. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हे क्षेत्र समजून घेतले. क्रिएटर्सच्या गरजा समजून त्यांना पूरक अशी व्यवस्था उभी केली. त्यातून ‘व्हेव्हज् इंडिया’ची निर्मिती झाली. याद्वारे क्रिएटर्सना देशाला समोर ठेवून ‘व्हिजन’ दिले. त्यामुळे भविष्यात ही ‘क्रिएटर इकोनॉमी’ देशासाठी ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून उभी राहील, हे निश्चित!
 
 
 

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.