गेले ते दिन गेले!

    25-Dec-2025   
Total Views |
Congress
 
हे येशू, हे अल्ला, हे देवा!’ (आम्ही सेक्युलर आहोत आणि निवडणुकीमध्ये कुणाला उल्लू बनवायचं आहे, ते पाहून त्या-त्या धर्माच्या श्रद्धास्थानांच नाव घेतो.) तर हे येशू, हे अल्ला, हे देवा...
 
गैर में तो था ही दम, अपनों में भी दम कहा था कम?
हमारी कश्ती हर जगह डुबी,
कही हमारी कश्ती डुबने के लिए तो नही बनाई?
 
मम्मा पाहिलं का, रॉबर्ट जीजू काय बोलले? ते म्हणतात, "दीदीचे भवितव्य खूप उज्ज्वल आहे. लोक त्यांच्यात इंदिरा गांधींना पाहतात. काँग्रेसचे खासदारही त्यांना भावी पंतप्रधान म्हणून पाठिंबा देतात.” हे बोलवतं तरी कसं रॉबर्ट जीजूंना? दीदी पंतप्रधानपदाची उमेदवार आणि मी कोण?
 
इतकी वर्षं काँग्रेसच्या जीवावर काय मी उगीच हारलो? वारंवार हरायला पण जिगर लागतं. पण, लोकांना माझ्या जिगरचं कौतुक नाही, तर ते सारखं ‘मोदी-मोदी’ करत बसतात. त्यांचं एक ठीक आहे; पण घरातल्यांना तरी काही वाटावं? तर, तिथेही रॉबर्ट जीजूंनी म्हटले की, आपले खासदार दीदीला पंतप्रधान म्हणून पाठिंबा देतात. मम्मा, हिंदी सिनेमातला रॉबर्ट फक्त त्याच्या अजित बॉसचा आदेश एकतो, इथे रॉबर्ट जीजू तर स्वत:ची मतं मांडायला लागलेत. बरं, दीदीचं नाक आजीसारखं असलं म्हणून काय झालं? मी पण फिरोज घैदी आजोबांसारखं दिसण्याचा प्रयत्न करू का? पण, त्यांच्याबद्दल आपण काहीच बोलत नाही. म्हणून मी राजीव पपांसारखं दिसण्याचा प्रयत्न केला. पण, ते फुस्स झालं. मग, मी ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करून मोदींसारखी दाढी वाढवली. पण, काही झालं नाही. आता नेहरू पणजोबांसारखं दिसणार. फक्त कोट घालून त्याला गुलाब लावून कबुतरं उडवायची आहेत. काय म्हणता? "आजीसारखं नाक असू दे की, पणजोबासारखं राहणीमान असू दे, भारतीय याला भुलणार नाहीत. इतिहासाच्या पटलावर हिंदूंचे तेजस्वी वर्तमान आणि भविष्य निर्माण करणार्‍यांनाच भारतीय साथ देणार.” अरेरे, किती कठीण शब्द आहेत. तुम्हाला म्हणायचे आहे की, दीदी आणि माझ्यासकट, आमच्या अख्ख्या पक्षाला जनतेने ओळखले आहे. त्यामुळे भारतीय जनता केवळ संघ, भाजप आणि त्या मोदींनाच साथ देणार! काय म्हणता, लोकांना उल्लू बनवायचे गेले ते दिन गेले!
 
‘विहिंप’च्या भूमिकेचे स्वागत
 
विश्व हिंदू परिषदेने आवाहन केले आहे की, हिंदूंनी नाताळ साजरा करू नये. यावर कोण्या ख्रिश्चन व्यक्तीने नाही, तर सर्वोच्च न्यायालयाची वकील शाहरूख आलम हिने विरोध केला आहे. यावर एक प्रश्न आहे की, विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनाला विरोध करणारी शाहरूख त्यांच्या कौममधल्या लोकांना नाताळ साजरा करण्याविषयी सांगू शकेल का? अर्थातच, याचे उत्तर आहे ‘नाही’. सगळी सहिष्णुता, सगळा सर्वधर्मसमभाव, सगळी संविधानाची रखवाली ही केवळ हिंदू समुदायासाठी आहे.
असो. कोणी कोणते सण साजरे करावेत, हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न आहे. पण, तरीसुद्धा काही सण-उत्सव असे आहेत की, त्यांच्यासोबत काही स्मृती, उद्देश जोडलेले असतात. त्यापैकी एक सण नाताळचा. नाताळ साजरा करणे म्हणजे दारात ख्रिसमस ट्री लावणे, केक कापणे, हे इतकेच आहे का? तर नाही.
 
‘सांता येईल, येशू येईल, तुम्हाला अमुक देईल, तमुक देईल,’ असे म्हणून अनेक ठिकाणी हिंदूंची फसवणूक केली जाते. त्यांचे धर्मांतरण केले जाते. केकच्या तुकड्यासाठी किंवा दारूच्या एका प्याल्यासाठीही नातााळच्या समारंभात सहभागी होऊन शेवटी धर्मांतरित झालेले गरीब हिंदू गावखेड्यात नाही, तर अगदी मुंबई-पुण्यातही आढळतील. वस्ती पातळीवर निरीक्षण केले तर आढळते की, दि. २३ डिसेंबर ते ३ जानेवारी या काळात खोट्या आश्वासनाला भुलून धर्मांतरण करणार्‍यांची संख्या जास्त असते. धर्मांतरणाने त्यांच्या आयुष्यात विशेष फरक पडत नाही. पण, हिंदू समुदायातून एक हिंदू वजा होतो. दुसरीकडे, कोणत्याही समाजाचे सण-उत्सव हे त्या समाजाची सांस्कृतिक ठेव असते. पण, अनेक हिंदू स्वत:ची सांस्कृतिक ठेव लाथाडून दुसर्‍यांची संस्कृती, उत्सव बळेबळेच मिरवण्याचा अट्टाहास करतात. त्यांना ते स्वातंत्र्य असले, तरीसुद्धा त्यांनी ज्या धर्मात जन्म घेतला, ज्या समाजात ते राहतात, त्याचेही काही ऋण असतेच ना? जगभरातल्या लोकांना त्यांची संस्कृती प्रिय आहे. मग, हिंदूंना आणि हिंदू संघटनांना त्यांची संस्कृती का प्रिय असू नये? त्यामुळेच विश्व हिंदू परिषदेने हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी आवाहन केले असेल, तर स्वागतच आहे.
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.