अगतिकांची युती, महाराष्ट्राच्या माथी!

    25-Dec-2025
Total Views |
Uddhav Thackeray and Raj Thackeray
 
राजकीय अगतिकता म्हणजे काय, हे कालच्या बंधुमिलनामुळे समोर आले. भाजप आणि देवेंद्र फडणवीसांचा रेटा इतका जबरदस्त आहे की, एकेकाळी एकमेकांना ‘बडवे’, ‘संपलेले’ म्हणणारेदेखील आज एकत्र आले आहेत.
  
दादर भागातला एक जुना निष्ठावान शिवसैनिक २००९ साली ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, म्हणून दारोदार फिरला होता. मातोश्रींच्या पुतळ्यापासून बाळासाहेबांच्या ‘मातोश्री’ बंगल्यापर्यंत ही मंडळी पायी गेली होती. त्यांनी या दोन्ही भावांना पत्र लिहिले होते. पण, दोन्हीपैकी कोणत्याही भावाने त्या निष्ठावंतांची पुरेशी दखल घेतली नाही. त्या पत्रांचे काय झाले असेल ते न बोललेले बरे! ती बिचारी मंडळी हिरमुसली होऊन निघून गेली आणि ती खंत कायम राहिली. काल मग या दोन्ही भावांनी एकत्र येऊन युतीची घोषणा केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सर्वात मोठ्या ‘भावनिक फसवणुकी’ला सुरुवात झाली. हे भाऊ तेव्हा एकत्र आले नव्हते. आज मात्र एकत्र आले आहेत, त्याचे एकमेव कारण म्हणजे, ‘दिवसेंदिवस दूर जाणारी सत्ता’. येणार्‍या काळात असे अनेक भावनिक प्रयोग महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे मनोरंजनाच्या महाधमाक्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने आपापली खुर्ची पकडून तयार राहावे.
 
ठाकरे बंधूंचा आणि त्यांच्या पोपटांचा एक ठरलेला तर्क म्हणजे, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश. त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे स्मारक आजही अत्यंत अभिमानाने उभे आहे. तिथल्या दगडी चबुतर्‍यावर संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्यांची अजरामर नावे आहेत. त्यात मराठी आहेत, तसेच अमराठीही आहेत. त्यात ‘ठाकरे’ असे आडनाव चुकूनही नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात संजय राऊत तुरुंगात गेले नव्हते, तर त्यांना पत्राचाळ प्रकरणी कारावास भोगावा लागला होता. आता राहिला प्रश्न मंगल कलशाचा, तर हुतात्म्यांना गोळ्या घालणारा राजकारणी कुठल्या पक्षाचा होता? आणि मंगल कलश आणणारा राजकारणीही कोणत्या पक्षाचा होता? आणि जर तो काँग्रेसचाच होता, तर सोनिया गांधींना वाकून पुष्पगुच्छ देणारे ठाकरे पिता-पुत्र दिल्लीला महाराष्ट्रासाठी कोणती मागणी मागायला गेले होते? भाषेवरून, नद्यांवरून, महापुरुषांवरून दोन राज्यांना एकमेकांसमोर उभे करण्याचे कारस्थान काँग्रेसने केले. उद्धव ठाकरे आजही त्याच काँग्रेसच्या पाठिंब्याची आस लावून बसले आहेत. २५ वर्षे सत्ता उपभोगल्यानंतरही जी मुंबईची दैना झाली, ती महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी होती.
 
‘कोविड’मध्ये मृतांच्या बॅगाही चढ्या भावाने ज्यांनी विकत घेतल्या, ते आता भावनिक मुद्दे उपस्थित करीत आहेत. ज्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात कधीच लोकप्रतिनिधी निवडून आले नाहीत, ते आता संपूर्ण महाराष्ट्र असल्याचा आव आणत आहेत. ज्यांचे मुंबईत कधीही संपूर्ण बहुमत नव्हते, ते आता मुंबई असल्याचा आव आणत आहेत. आज जी काही अगतिकांची युती झाली आहे, ती पुढे कशी जाते, ते पाहणे मजेशीर ठरेल. अशी ही सगळी ड्रामेबाजी केवळ सत्तेसाठी सुरू आहे.
 
ज्या संजय राऊतांचे लाड-कौतुक कालच्या पत्रकार परिषदेत दाखवले गेले, त्यांची गाडी मनसैनिकांनी उलटवली होती. त्यामुळे आणखी लिहिण्यासारखे बरेच आहे. पण, मुद्दा आता हे विस्तारणारे महानगर सक्षम हातात सोपविण्याचा आहे. मागच्या निवडणुकीत खरेतर भाजपने महापौरपद स्वबळावर मिळवलेच होते. पण, या विजयाचा युतीचा धर्म पालन करण्यात बळी गेला. आता भाजपला मागे लोटण्यासारखे दोन्ही सेनांकडे काहीच नाही.वस्तुत: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एक बलाढ्य संघटना बांधली आणि ती राज आणि उद्धव यांच्याकडे सोपविली होती. मात्र, मराठी माणसांच्या अपेक्षाभंगाव्यतिरिक्त यातून काहीच झाले नाही. उद्धव ठाकरेंच्या अहंकाराला कंटाळून ज्या दिग्गज नेत्यांनी शिवसेना सोडली, ते सगळेच मराठी होते. राज्यसभेवर अमराठी खासदार पाठविण्याचा कित्ता उद्धव ठाकरेंनी सुरूच ठेवला. बाळासाहेबांची शिवसेना जी दिवाकर रावते, दत्ताजी नलावडे यांसारख्या लढवय्या नेत्यांच्या ताब्यात होती, ती मग विधान परिषदा व राज्यसभेतून पक्षात लुडबूड करणार्‍यांनी ताब्यात घेतली. याचा परिणाम असा होता की, अखेर एकनाथ शिंदेंसारख्या लढवय्यालासुद्धा पक्ष सोडावा लागला.
 
देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरेंनी सत्ता मिळविली खरी. पण, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेबांची साठीकडे चाललेली शिवसेना आज ‘नगण्य-सेना’ करून टाकली. फडणवीस हे मोठ्या मनाचे नेते. मात्र, सत्ता गेल्यावर त्यांना तुरुंगात टाकण्याची कारस्थाने या मंडळींनी सुरू केली होती. त्यानंतर महाराष्ट्राने ‘देवेंद्रपर्व’ अनुभवले. विकासाचा झंझावात फडणवीसांनी उभा केला. आजच्या घडीला महाराष्ट्रात त्यांच्या ताकदीचा दुसरा नेता नाही. राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या विकासाची ‘ब्लू-प्रिंट’ आणायची वल्गना केली. फडणवीसांनी मात्र, ‘याची देही याची डोळा’ पाहता येतील असे प्रकल्प उभे करून दाखविले. भाषेचा मुद्दा आला, तेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा यशस्वी निर्णय नरेंद्र मोदींनीच घेतला.
 
मराठी माणसासमोरचे सगळ्यात मोठे संकट म्हणजे, वाढलेल्या कुटुंबाचा विस्तार या लहानशा घरात कसा सामावायचा. पण, हा प्रश्न सोडविला तो देवेंद्र फडणवीस यांनी. वरळीच्या बीडीडी चाळींचा ४० वर्षांहून अधिक काळ रखडलेला पुनर्विकास देवेंद्र फडणवीसांनीच करून दाखविला. हा विकास सोपा नव्हता. बीडीडीतल्या मराठी माणसाला ४० वर्षांहून अधिक काळ गंडवले गेले होते. मुंबईवरचे अजून एक संकट म्हणजे वाहतुककोंडीचे, जे देवेंद्रजींनी सोडवले. त्यामुळे ठाकरे बंधूंना आता मराठी माणसासाठी काय करायचे? असा भीषण प्रश्न तयार झाला आहे. त्यातून ही भावनिक नाटके सुरू झाली आहेत. आधी एकमेकांना ‘बडवे’बिडवे म्हणणारे लोक एकत्र येतात. ‘संपलेला पक्ष’ म्हणून एकमेकांना हिणवणारे लोक गळ्यात गळे कसे घालतात, हे सगळेच महाराष्ट्र पाहतो आहे.
 
पुढचा रणसंग्राम २५-३० दिवसांवरच आहे. या दोन भावांच्या इकोसिस्टमवर जगणारे लोक म्हणजे, संपूर्ण मराठी समाज नाही. मुंबईसाठी भारतीय जनता पक्षाने जे केले, त्याच्यापेक्षा वेगळे काही करण्याची कल्पकता किंवा धमक या दोन्ही बंधूंमध्येही नाही. दोघांच्याही पक्षाची अवस्था गळया माठासारखी आहे. कितीही भरा; पण पाणी गळूनच जाणार आहे. पण, खरी मजा तिकीटवाटपानंतर येणार आहे. कारण, कोणाचे उमेदवार कुठून कसे पळून जातात? हा मोठा प्रश्न आहे. सध्या अगतिकतेमुळेच हे लोक एकत्र आले आहेत, हे मात्र नक्की. मराठी माणसांशी यांचे काहीएक देणे-घेणे नाहीच!