ठाकरेंना ‘हात’ द्या!

    24-Dec-2025   
Total Views |

raj thackeray and uddhav thackeray
 
नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणूूक निकालानंतर ‘ठाकरे ब्रॅण्ड’ची हवाच निघाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे दोनआकडी नगराध्यक्षही राज्यात निवडून आले नाहीत. कारण, दोघांनीही या निवडणुका गांर्भीयाने घेतल्या नाही. अपेक्षेप्रमाणे महायुतीच्या विजयाचे खापर ‘ईव्हीएम’, मतचोरी वगैरेवर विरोधकांनी फोडले असले, तरी आपण किती गाळात रुतलेलो आहात, याची कल्पनाही त्यांना आलीच. एकवेळ महाराष्ट्रात पक्षाचे पानिपत झाले तरी चालेल, पण कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका हातची जाऊ द्यायची नाही, असा चंगच ठाकरे बंधूंनी बांधलेला दिसतो. कालपरवापर्यंत जी काँग्रेस आहे काय नि नाही काय, काँग्रेस म्हणजे कुरकुरणारी खाट, अशी अवहेलना करणार्‍या त्याच उबाठासेनेने थेट राहुल गांधींना आघाडीसाठी आता गळ घातल्याचे समजते.
 
नुकतीच मुंबई काँग्रेस पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर करून मोकळी झाली. स्वबळावर लढलो, तर अधिक जागांवर संधी मिळेल आणि परिणामी जास्त उमेदवारही निवडून येतील, अशी काँग्रेसची भाबडी आशा. त्यात ठाकरे बंधूंबरोबर जागावाटपाच्या आकडेवारीत अडकलो, तर त्यांनी सोडलेल्या उरल्यासुरल्या जागांवर समाधान मानावे लागेल, हे काँग्रेसचे गणित. त्यातच मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड म्हणाल्या तसे, काँग्रेसला ही निवडणूक जात-पात-धर्म-भाषा या मुद्द्यांवर लढायची नाही. पण, याउलट अजेंडा ठाकरे बंधूंचा. मराठी माणूस, मराठी भाषा आणि एकूणच मराठी अस्मिता हेच मुद्दे त्यांच्या केंद्रस्थानी. त्यामुळे ठाकरेंबरोबर आघाडी केली, तर मुंबईतील काँग्रेसचा उत्तर भारतीय, मुस्लीम मतदारही दुखावू शकतो, याची पुरती जाणीव वर्षाताईंना आहेच. म्हणूनच ठाकरे बंधूंसोबतच्या आघाडीच्या झांगडगुत्त्यात त्यांनी काँग्रेसचा ‘हात’ अडकू दिला नाही.
 
आता काँग्रेस स्वतंत्र लढली, तर आपल्या आघाडीला फटका बसू शकतो, याची जाणीव ठाकरे बंधूंनाही आहेच. त्यामुळेच उबाठाकडून काँग्रेसच्या मनधरणीचे सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यात त्यांना कितपत यश येते, ती शंकाच. पण, एक मात्र निश्चित की, नगरपंचायत निवडणुकांनंतर ‘ठाकरे ब्रॅण्ड’चा आत्मविश्वास खालावला, तर महायुतीचा आत्मविश्वास अधिकच दुणावलेला दिसतो.
 
‘हात’चे गमावलेली काँग्रेस
 
कोणेएकेकाळी काही दिग्गज नेत्यांनी मुंबई काँग्रेस गाजवली होती. यामध्ये प्रामुख्याने मुरली देवरा, चंद्रकांत हंडोरे, चंद्रकांत गोसालिया, मधु चव्हाण यांसारख्या काही नेत्यांची नावे घेता येतील. पण, आजघडीला मुंबई काँग्रेसमधील नेते हे मुंबईचे नसून, त्यांच्या-त्यांच्या उपनगरांपर्यंतच मर्यादित दिसतात. जसे की, मुंबई काँग्रेस अध्यक्षा असलेल्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड या उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार. पण, त्यांची पोहोच धारावीपलीकडे दिसत नाही. तीच गत अन्य आमदारांचीही. जसे की, अस्लम शेख मालाडपुरते, अमीन पटेल मुंबादेवीपुरते मर्यादित. परिणामी, मुंबई काँग्रेसची गेल्या काही वर्षांत पालिका निवडणुकीत पिछेहाट झालेली दिसते.
 
१९९२ साली मुंबईतून काँग्रेसचे १११ नगरसेवक निवडून आले होते. पुढे १९९७ मध्ये ४९, २००२ साली ६१, २००७ साली ७१, २०१२ साली ५२ आणि २०१७ साली ३१ काँग्रेसचे नगरसेवक मुंबईतून निवडून आले. यावरुन मुंबईकरांनी काँग्रेसच्या ‘हाता’ला नाकारल्याचेच स्पष्ट दिसून येते. त्याचे कारण म्हणजे, केंद्रात, राज्यातही प्रभावहीन ठरत गेलेली काँग्रेस आणि कमकुवत झालेली पक्षसंघटना. त्यामुळे २०१७ साली मुंबई महापालिकेत ३१ नगरसेवक निवडून आल्यानंतर, आजघडीला त्यांपैकी २१ नगरसेवकच काँग्रेसच्या सोबत आहेत. अगदी रवी राजा यांच्यासारख्या पालिकेत विरोधीपक्ष नेतेपदाची भूमिका निभावलेल्या ज्येष्ठ नगरसेवकानेही गेल्याच वर्षी काँग्रेसची साथ सोडली.
 
गटबाजी, काँग्रेस अध्यक्षांची एकाधिकारशाही, पक्षसंघटनेकडे अक्षम्य दुर्लक्ष आणि एकूणच काँग्रेसने देशभर गमावलेला जनाधार, ही मुंबई काँग्रेसच्या सध्याच्या बिकट परिस्थितीमागची काही प्रमुख कारणे. पण, त्यातूनही धडा घेणे, आत्मपरीक्षण करणे, कार्यशैलीत सुधारणा करणे, हे मुळी काँग्रेसच्या हायकमांडपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाच्या डीएनएतच नाही. परिणामी, पक्ष कमकुवत होतो आणि नेत्यांसह कार्यकर्तेही पक्षापासून दुरावतात. पालिका स्तरावर मुंबई काँग्रेस ही कायमच ठाकरेंच्या विरोधातच होती. ठाकरेंच्या भ्रष्टाचारावरही मविआच्या स्थापनेपूर्वी मुंबई काँग्रेसने आसूड ओढले होतेच. तेव्हा, यंदा पुन्हा मुंबई काँग्रेस भाजपसोबत ठाकरे बंधूंनाही लक्ष्य करणार का आणि त्याचा प्रत्यक्ष निवडणुकीत किती लाभ होणार, हे पाहणे औत्सुक्याचे!
 
 

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची