बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचाराची लाट उसळली, ती इस्लामिक कट्टरपंथी नेता शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूनंतर. उस्मान हादीच्या समर्थकांनी माध्यम संस्थांवर, शेख हसीना यांचा पक्ष ‘अवामी लीग’वर आणि भारतीय उच्चायोगावर हल्ले केले. अशातच आता बांगलादेशातील राजकीय अस्थिरता अधिकच तीव्र झालेली पाहायला मिळते. कारण, २००४च्या उठावात महत्त्वाची भूमिका बजावणारा विद्यार्थी नेता मोतालेब शिकदर याचीसुद्धा खुलना येथे परवा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना २०२४च्या आंदोलनाशी संबंधित आणि शेख हसीना सरकारच्या पतनाशी जोडल्या गेलेल्या शरीफ उस्मान हादी याच्या हत्येनंतर अवघ्या काही दिवसांत घडली आहे.
वास्तविक, उस्मान हादी हा बांगलादेशात २०२४ मधील विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनला होता. या आंदोलनामुळे शेख हसीना यांच्या सरकारचा सत्तापालट झाला आणि त्यांना देश सोडावा लागला. शेख हसीना यांच्या ‘अवामी लीग’ला संपवण्यात उस्मान हादीची ‘इन्कलाब मंच’ ही संघटना आघाडीवर होती. उस्मान हादी हा फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार्या निवडणुका लढवण्याच्या तयारीत होता. तो ढाका-८ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून प्रचारही करत होता. भारताशी असलेल्या संबंधांवरून तो वारंवार ‘अवामी लीग’ला लक्ष्य करत होता. काही ठिकाणी त्याने ‘बीएनपी’ आणि युनूस यांच्या अंतरिम सरकारवरही भारताच्या प्रभावापासून मुक्त होण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला होता.
मोतालेब शिकदर हा बांगलादेशातील एक प्रभावशाली विद्यार्थी नेता आणि सक्रिय राजकीय कार्यकर्ता होता. तो ‘नॅशनल सिटिझन पार्टी’चा (एनसीपी) वरिष्ठ नेता होता. ‘एनसीपी’ खुलना विभाग प्रमुख होता; तसेच पक्षाच्या कामगार संघटनेचा केंद्रीय समन्वयक म्हणून काम करत होता. २००४ साली झालेल्या बांगलादेशातील मोठ्या जनआंदोलनात त्याची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे तो विद्यार्थी चळवळीतील एक ओळखलेले नाव मानला जात होता.
अलीकडेच २०२४च्या आंदोलनाशी संबंधित घडामोडींमध्येही तो सक्रिय होता. हेच आंदोलन हसीना सरकारच्या पतनाशी जोडले जाते. शरीफ उस्मान हादीच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणात, खुलना शहरात मोतालेब शिकदर याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्याच्या डोक्यात गोळी लागली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. या हल्ल्यानंतर बांगलादेशातील राजकीय तणाव अधिकच वाढला.
बांगलादेशातील सध्याची स्थिती ही निवडणुकांपूर्वी अराजकता निर्माण करून राजकीय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याच्या जुन्याच जागतिक पॅटर्नशी साधर्म्य दाखवते. जिथे रस्त्यावरील संघर्ष, आंतरराष्ट्रीय दबाव आणि माहिती-युद्ध यांचा एकत्रित वापर केला जातो. निवडणूकपूर्व अस्थिरता हा योगायोग नसून, तो एक सुनियोजित राजकीय डाव असतो, हे जागतिक अनुभव सांगतो. अशा वेळी मग एखाद्या घटनेचे अतिरंजित किंवा दिशाभूल करणारे कथानक तयार करणे, जात, धर्म, भाषा किंवा प्रादेशिक अस्मितेवर आधारित भावनांना हात घालणे; त्यातून पुढे हिंसाचाराची ठिणगी पेटवणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारची प्रतिमा मलीन करणे, कट्टर गटांना ‘रक्षक’ म्हणून पुढे आणणे यांसारख्या गोष्टी व्हायला लागतात.
जागतिक अनुभव पाहिला, तर हिंदू समाज अनेकदा या डावाचा पहिला बळी ठरतो. कारण, हिंदू समाज सहसा सहनशीलतेकडे झुकताना दिसून येतो. सुरुवातीला प्रतिकार होत नाही, मात्र, काही वेळेस संघटित होऊन प्रतिकार केल्याची उदाहरणेही आहेत. जिथे हिंदू अल्पसंख्याक आहेत, तिथे मंदिरे, दुकाने, घरं, महिलांवर हल्ले सहजपणे केले जातात. हिंदूंना स्थलांतरास भाग पाडले जाते. बांगलादेशातील सध्याची परिस्थिती केवळ दोन नेत्यांच्या हत्या किंवा काही दिवसांचा हिंसाचार एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर ती निवडणूकपूर्व राजकीय अस्थिरतेच्या व्यापक आणि परिचित पॅटर्नकडे निर्देश करते. बांगलादेशातील घडामोडींकडे केवळ शेजारी देशातील अंतर्गत प्रश्न म्हणून पाहणे धोकादायक ठरेल. येथील हिंसाचार, राजकीय कट्टरता आणि भारतविरोधी वातावरण यांचा थेट परिणाम प्रादेशिक स्थैर्यावर आणि हिंदू समाजाच्या भविष्यावर होऊ शकतो. म्हणूनच या घडामोडींचे भान ठेवत, तथ्याधारित निरीक्षण, आंतरराष्ट्रीय स्तरावर सत्य मांडणे आणि हिंदू समाजाच्या सुरक्षिततेबाबत सजग राहणे, ही काळाची गरज ठरते.