वित्त प्रबल - विकसित भारत : संपन्न भारत, समृद्ध भारत!

    23-Dec-2025
Total Views |
Vishva Hindu Economic Forum
 
शाश्वत विकास, आत्मनिर्भरता आणि सांस्कृतिक मूल्यांचा संगम साधत हिंदू व्यावसायिक व उद्योजकांना जागतिक स्तरावर एकत्र आणणारे व्यासपीठ म्हणजे विश्व हिंदू इकोनॉमिक फोरम. आर्थिक समृद्धीसोबत सामाजिक जबाबदारीचा विचार केंद्रस्थानी ठेवत, विकसित भारत २०४७च्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या फोरमची अलीकडील मुंबईतील वार्षिक परिषद नवचैतन्य आणि नवदृष्टी देणारी ठरली.
 
शाश्वत आर्थिक प्रारुपांचा प्रसार करून जागतिक पातळीवर सहयोगाला चालना देऊन समाज समृद्ध करण्याच्या उद्दिष्टाने २०१२ दरम्यान 'विश्व हिंदू इकोनॉमिक फोरम'ची स्थापना करण्यात आली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी खरगपूरचे माजी विद्यार्थी स्वामी विज्ञानानंद यांनी या संस्थेची स्थापना केली. फोरमच्या स्थापनेपासून हाँगकाँग, बँकॉक, नवी दिल्ली, लंडन, लॉसएंजिलिस, शिकागो आणि मुंबई तसेच क्वालालंपूर, ऑकलंड, फिजी, डर्बन आणि फ्रँकफर्ट येथे विभागीय पातळीवर वार्षिक फोरमचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.
 
नुकतेच ग्रँड हयात, मुंबई येथे दोन दिवसीय (१९-२० डिसेंबर) वार्षिक परिषद संपन्न झाली. यावेळी आयोजक समिति सदस्य व विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत उपाध्यक्ष या नात्याने मला सहभागी होता आले. 'विश्व हिंदू इकोनॉमिक फोरम' किती नियोजनबद्ध पद्धतीने व्यावसायिक, उद्योजक आणि समाजातील प्रभावी संस्था यांची सुरेख सांगड घालून आर्थिक उत्क्रांतीसाठी प्रयत्नशील आहे, ते या दोन दिवसांत जाणून घेता आले.
 
विश्व हिंदू इकोनॉमिक फोरमचे प्रमुख ध्येय हिंदू व्यावसायिक समुदाय आणि उद्योजकांना सहयोगी वाढीसाठी एकत्र आणणे आहे. भारताच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने जे अतिशय महत्वाचे आहे. मागील वर्षी देखील मुंबईच्या बिसेकीतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे विश्व हिंदू इकोनॉमिक फोरमने "भविष्यासाठी, भविष्याचा विचार करा" या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये १००० हून अधिक जागतिक नेते आणि नवोन्मेषक एकत्र आले होते.
 
कृषी-तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, ई-कॉमर्स, संरक्षण आणि वैद्यकीय तंत्रज्ञान यांसारख्या अनेक क्षेत्रांवर तेव्हा लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चार राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारी सकारात्मक धोरण आणि योजनांद्वारे संवाद साधत समस्त उपस्थितांना "मिशन भारत २०४७ " अंतर्गत ५ ट्रिलियन इकोनॉमीच्या लक्ष्य पूर्तिसाठी सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
 
गतवर्षीच्या यशस्वी कार्यक्रम नंतर यावर्षीचा कार्यक्रम ही जोरदार झाला. दोन दिवस, ग्रँड हयात येथील कार्यक्रमालाही भरघोस प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संस्कृती आणि हिंदुत्व विचार प्रणाली यामुळेच भारतास जागतिक पातळीवर विश्वासार्हता मिळाली आहे याकडे लक्ष वेधले. ज्ञानपरंपरेचा सयुक्तिक वापर करत आधुनिकीकरणास तंत्रज्ञानाची जोड देऊन विकसित भारत हे आता सहज साध्य आहे असा विश्वास व्यक्त केला. आफ्रिकेतील विकासाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत या त्यांच्या वक्तव्याने बऱ्याच उद्योजकांना नवी दिशा मिळाली.
 
या वेळची संकल्पना "शोध, आत्मनिर्भरता आणि समृद्धी " अशी होती. याप्रसंगी तयार करण्यात आलेल्या पॉलिसी डेस्क मार्फत विविध सुचना आणि संकल्पना यांचे संकलन करण्यात आले. ज्याचा अभ्यासपूर्ण आढावा घेण्यात येणार असून जो विकसित भारत उपक्रमांसाठी निश्चितच उपयोगी ठरेल.
 
मध्य प्रदेश मुख्यमंत्री मोहन यादव, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ उद्योजक पद्मश्री सावजी ढोलकिया, जेएसडब्लू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल व इतर अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीने एक वैचारिक मंथन, विचार परिवर्तन आणि त्यातून नवा दृष्टिकोन आणि नवीन संकल्पना यांचा जागर, उद्योजकांत नवचैतन्य नवीन ऊर्जा निर्माण झाली.
 
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही युवावर्गाला प्रेरित केले. सार्वजनिक कल्याण, नवोन्मेष, उद्यमशीलता, शिक्षण, डिजिटल कनेक्टिव्हिटी या क्षेत्रातील विविध उपक्रमांमुळे युवा वर्गाला मोठी स्वप्नं पाहत आर्थिक विकासात सहभागी होण्याचा आत्म विश्वास मिळाला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. सातत्य, राजकीय स्थिरता आणि पारदर्शक प्रशासन यांचे भारताच्या विकासासाठी महत्व त्यांनी मांडले. माहिती, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी देशातील पहिल्या एआय विद्यापीठाची घोषणा केली. शासनाचे जीसीसी धोरण, क्षेत्रनिहाय सहाय्य आणि रेड कार्पेट पद्धती याबाबत माहिती देऊन प्रोत्साहित केले.
 
विश्व हिंदू इकोनॉमिक फोरमची प्रमुख उद्दिष्टे :
 
- भारताला १० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या वाटचालीत सक्रिय सहभाग.
- हिंदु समाजातील व्यावसायिक समुदायास एकत्र आणणे.
- विकसित भारत २०४७ चा दृष्टिकोन साध्य करणे.
 
विकसित भारत २०४७ हा भारताचा २०४७ पर्यंत आत्मनिर्भर, समृद्ध राष्ट्र बनण्याचा निर्धार आहे, जो आर्थिक वृद्धि, तंत्रज्ञान प्रगती, पायाभूत सुविधा, सामाजिक सक्षमीकरण आणि शाश्वततेवर (सस्टेनेबिलीटी) आधरित आहे. युवा वर्गाचा सहभाग हे ही खुप आशावादी चित्र परिषदेदरम्यान होते.
 
यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थितांनी पुढाकार घेत व्हाटसप गृप बनवून हा प्रवास निरंतर चालू ठेवण्याचे ठरविले आहे. या कार्यक्रमातून अनेक नवउद्योजक अर्थार्जनाबरोबरच समाजात उद्योजकशीलता वाढवण्यात अग्रेसर असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर अनेक संपन्न व्यापारी कार्यकर्त्यांच्या भूमिकेत होते. संघाच्या शिस्तबद्धतेचा, संस्काराचा प्रभाव पदोपदी जाणवत होता. 'शतहस्त समाहर सहस्रहस्त संकिर' यावर आधारित, स्वतः संपन्न व्हा आणि समाजाला सक्षम करा हा मूलमंत्र कौतुकास्पद आहे आणि तो या कार्यक्रमात प्रतीत झालेला दिसला.
 
विश्व हिंदू इकोनॉमिक फोरम हिंदू व्यावसायिक समुदाय आणि उद्योजकांना सहयोगी वाढीसाठी एकत्र आणून हिंदु प्राचीन संस्कृती जतन करत आधुनिकीकरण, आर्थिक सबलीकरण यासाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच महिला उद्योजकांना देशाच्या आर्थिक विकासात सहभागी होता यावे यासाठी देखील स्वामी विज्ञानानंद यांच्या नेतृत्वाखाली विश्व हिंदू इकोनॉमिक फोरम प्रयत्नशील आहे, कृतीशील आहे.
 जय हिंद! जय भारत! जय महाराष्ट्र!!!
 
 
विश्व हिंदू इकोनॉमिक फोरम २०२४
 
(१३ ते १५ डिसेंबर २०२४) - जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई
 
संकल्पना : 'भविष्यासाठी,भविष्याचा विचार, करा, ', (भगवद्गीतेपासून प्रेरित, दूरदृष्टीच्या धोरणांवर लक्ष केंद्रित.)
 
उपस्थिती : १०००+ प्रतिनिधी, ज्यात जागतिक नेते, नवोन्मेषक आणि संपत्ती निर्मात्यांचा समावेश आहे.
 
लक्ष केंद्रित क्षेत्रे : कृषी-तंत्रज्ञान, ई-कॉमर्स, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, सेमीकंडक्टर, फार्मा, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि इतर विविध क्षेत्रे.
 
उपक्रम : स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यासाठी विश्व हिंदू इकोनॉमिक फोरम लाँचपॅडची सुरुवात.
 
ध्येय : उद्योजकांना सक्षम करून भारताला १० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने नेणे आणि विकसित भारत २०४७ चा दृष्टिकोन साध्य करणे.
 
वक्ते : १२४
 
सहभागी : ११००
 
 
विश्व हिंदू इकोनॉमिक फोरम २०२५
 
(१९ व २० डिसेंबर २०२४) ग्रँड हयात, मुंबई
 
- संकल्पना : "शोध, आत्मनिर्भरता आणि समृद्धी"
 
- लक्ष केंद्रित क्षेत्रे : कृषी-तंत्रज्ञान, इन्फ्रास्ट्रक्चर, आय टी, नवीकरणीय ऊर्जा, ई-कॉमर्स, संरक्षण आणि वैद्यकीय तंत्रज्ञान
 
- उपक्रम : नेटवर्किंग, पॉलिसी डेस्क मार्फत विविध सुचना आणि संकल्पना यांचे संकलन
 
- ध्येय : भारताला १० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने नेणे आणि विकसित भारत २०४७ चा दृष्टिकोन साध्य करणे.
 
- वक्ते : ४०
 
- महिला वक्ता : ०५
 
- सहभागी : सुमारे ९००
 
 
 
- प्रिया सावंत, कोकण प्रांत उपाध्यक्ष, विश्व हिंदू परिषद