‘शुगर-फ्री’चा गोड भ्रम!

    23-Dec-2025
Total Views |

Sugar-Free
 
खाण्यामध्ये साखर टाळणे म्हणजे आरोग्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, असा समज आजही समाजात दृढ आहे. फिटनेस, वजन नियंत्रण आणि मधुमेहापासून बचाव अशा अनेक कारणांसाठी ‘शुगर-फ्री’ पर्यायांचा वापर झपाट्याने वाढलेला दिसतो. मात्र, या गोड चवीमागे दडलेले परिणाम तितकेसे गोड असतीलच, असे नाही. असे ‘आर्टिफिशियल स्वीटनर्स’ शरीराच्या नैसर्गिक यंत्रणेवर कसा परिणाम करतात, याचा घेतलेला आढावा...
 
साखर आरोग्यास अपायकारक आहे, हा निष्कर्ष आता सर्वमान्य झाला आहे. त्यामुळेच ‘शुगर-फ्री’ हा शब्द आजच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनलेला दिसतो. विशेषतः तरुण पिढी, फिटनेसप्रेमी आणि मधुमेहाची भीती बाळगणारे लोक कृत्रिम गोड पदार्थ, अर्थात ‘आर्टिफिशियल स्वीटनर्स’चा आश्रय घेताना दिसतात. डाएट पेये, साखरविरहित चहा-कॉफी, प्रोटिन शेस, लो-कॅलरी उपहार अशा अनेक माध्यमांतून, या ‘आर्टिफिशियल स्वीटनर्स’नी रोजच्या आहारातही नकळत चंचूप्रवेश केला आहे. मात्र, वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहता, कॅलरी नसणे म्हणजेच आरोग्यासाठी सुरक्षित असणे असे सरळ समीकरण नाही. मानवी शरीर ही केवळ कॅलरी मोजणारी यंत्रणा नसून, ती मेंदू, पचनसंस्था, संप्रेरके आणि रोगप्रतिकारशक्ती यांचा परस्परसंबंध असलेली एक अत्यंत सूक्ष्म आणि संवेदनशील प्रणाली आहे. ‘आर्टिफिशियल स्वीटनर्स’ गोड चव देतात, पण त्यातून शरीराला प्रत्यक्ष ऊर्जा मिळत नाही. ही विसंगतीच पुढे अनेक जैविक प्रक्रियांमध्ये गोंधळ निर्माण करणारी ठरत असल्याचे अनेक संशोधनातून पुढे आले आहे.
 
अलीकडील काही वैद्यकीय संशोधनातून पुढे आलेला सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा मुद्दा म्हणजे, आतड्यांतील सूक्ष्मजीवांचा गट, अर्थात ‘मायक्रोबायोम’चा बिघडणारा समतोल. पचन, पोषणद्रव्यांचे शोषण, सूजनियंत्रण आणि चयापचयासारख्या शरीरातील क्रियांमध्ये या सूक्ष्मजीवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. काही ‘आर्टिफिशियल स्वीटनर्स’मुळे उपयुक्त जिवाणूंचे प्रमाण घटते आणि दाहकारक जीवाणूंची वाढ जोमाने होत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. परिणामी, पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी, सतत पोट फुगणे, थकवा आणि दीर्घकाळ चयापचय विकारांची शक्यता वाढते. विशेषतः यातून होणारा इन्सुलिन संवेदनशीलतेवरचा परिणाम लक्षात घेण्यासारखाच आहे. ‘आर्टिफिशियल स्वीटनर्स’मुळे शरीराला गोड चवीचा संदेश मिळतो खरा, पण प्रत्यक्ष शर्करा मिळत नसल्यामुळे मेंदू आणि पचनसंस्था यांच्यातील समन्वय बिघडतो. यामुळे भूक वाढणे, गोड पदार्थांची ओढ कायम राहणे आणि वजन नियंत्रणात अडचणी निर्माण होण्यासारखी लक्षणे दिसतात. शरीरसौष्ठवासाठी वापरले जाणारे साधनच, शरीराच्या नैसर्गिक यंत्रणेत असमतोल निर्माण करण्याचे कारक होत असल्याचे हे द्योतक आहे.
 
आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधनामध्ये समोर आल्यानुसार ‘आर्टिफिशियल स्वीटनर्स’चा नियमित आणि दीर्घकालीन वापर करणार्‍या व्यक्तींमध्ये हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार आणि स्ट्रोकचा धोका तुलनेने वाढल्याचे निरीक्षणही नोंदवले गेले आहे. हे निष्कर्ष अद्याप अंतिम नसले, तरी या दर्शवलेल्या धोक्याकडेही सावधगिरीने पाहणे आवश्यक आहे. विशेषतः आधीच मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉलचा त्रास असलेल्या रुग्णांमध्ये हे धोके अधिकच गंभीर ठरू शकतात. अनेकदा साखर खाणे टाळल्याच्या समाधानात प्रक्रिया केलेले, कृत्रिम घटकांनी भरलेले अन्न अधिक प्रमाणात खाल्ले जाते. त्यामुळे आरोग्य सुधारण्याऐवजी त्यातील गुंतागुंत आणखीनच वाढते.
 
आजची फिटनेस संस्कृती ही जलद परिणामांवर केंद्रित झालेली आहे. कमी वेळात वजन घटवणे, ‘झिरो कॅलरी’ आहार आणि तत्काळ दिसणारे बदल यांचा मोह तरुणांना अधिक भुरळ घालतो. मात्र, आरोग्याच्या दृष्टिकोनातून ‘फिटनेस’ म्हणजे केवळ शरीराचा आकार किंवा वजन नव्हे, तर अंतर्गत आरोग्याचा समतोल साधणेही त्यात अभिप्रेत आहे. तो समतोल सातत्यपूर्ण आणि नैसर्गिक सवयींमधूनच साध्य होतो. त्यासाठी कोणतेही सोपे आणि जलद मार्ग उपलब्ध नाहीत. ‘आर्टिफिशियल स्वीटनर्स’ काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींमध्ये, मर्यादित कालावधीसाठी उपयोगी ठरू शकतात; मात्र सामान्य व्यक्तीने या पदार्थांवरच संपूर्ण आहाराची मांडणी करणे शहाणपणाचे ठरणार नाही.
 
खरा आदर्श मार्ग म्हणजे, गोड चवीची सवय हळूहळू कमी करणे, नैसर्गिक अन्नावर भर देणे आणि शरीराच्या संकेतांकडे लक्ष देणे. फळांतील नैसर्गिक साखर, पारंपरिक पदार्थ, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम आणि संतुलित दिनचर्या हेच दीर्घकालीन आरोग्याचे खरे आधार आहेत. ‘आर्टिफिशियल स्वीटनर्स’ हे आधुनिक जीवनशैलीचे उत्पादन असले, तरी त्यांचा वापर विवेकाने आणि मर्यादेत असलाच पाहिजे. गोड चव टिकवण्यासाठी शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांशी तडजोड करणे हे आरोग्यासाठी हितावह नाही. म्हणूनच ‘शुगर-फ्री’च्या मोहापेक्षा संतुलित विचार, संयम आणि सुसंस्कृत आहारशैली हाच खरा आरोग्याचा मार्ग आहे.