मुंबई : (Sakharam Dakhore) "कवी सखाराम डाखोरे यांचा 'हूलबिगूल' हा कवितासंग्रह क्रांतीचा आवाज आहे. 'हूल' म्हणजे कोणत्याही चुकीच्या अन्याय, शोषण व अत्याचाराविरूद्ध आवाज उठवणे, तर 'बिगूल' हे युद्धाच्या प्रारंभी वाजविले जाते. याअर्थाने 'हूलबिगूल' ही आदिवासी समाजाच्या क्रांतीची, लढ्याची व जागृतीची नव्याने होत असलेली सुरुवात आहे. आधुनिकीकरणाच्या जाळ्यात अडकलेल्या आदिवासी समाजाच्या वेदनांचा तो हुंकार आहे." असे प्रतिपादन नागपूर येथील आदिवासी समाज, साहित्य व संस्कृतीचे अभ्यासक प्रभू राजगडकर यांनी केले. वसई येथील वर्तक महाविद्यालयात पार पडलेल्या डाखोरे यांच्या 'हूलबिगूल' या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात शनिवारी अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. (Sakharam Dakhore)
ठाण्याच्या सृजनसंवाद या प्रकाशन संस्थेतर्फे हा कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला. प्रकाशक, संपादक, कवी गीतेश गजानन शिंदे यांनी कवी डाखोरे (Sakharam Dakhore) यांच्या कविता आश्वासक व दिशादर्शक असल्यामुळेच समाजासमोर आणल्याची भूमिका विशद केली. या कवितांमध्ये निसर्गाची तसेच पशूपक्ष्यांची बोलीही कवीने हळुवारपणे टिपल्याचे त्यांनी म्हंटले. आदिवासी साहित्याचे अभ्यासक शंकर बळी यांनी हुलबिगूल मध्ये आलेल्या आंध आदिवासी समाजाच्या आंधी बोलीतील कवितांमधील आशयसूत्रे उलगडून दाखवतानाच कवितासंग्रहात आलेल्या आदिवासी समाजाच्या प्रश्नांचा उलगडाही रसिकांसमोर केला. जव्हार येथील आदिवासी साहित्यांचे अभ्यासक रवी बुधर यांनी प्रस्थापित व्यवस्था जशी आपल्या शोषणाला जबाबदार आहे, तशीच आपल्यातील लबाड-दलाल मंडळी कारणीभूत असल्याचे प्रामुख्याने मांडले. (Sakharam Dakhore)
प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. शत्रुघ्न फड यांनी केले. याप्रसंगी विद्यावर्धिनी शिक्षणसंस्थेचे उपाध्यक्ष मा. बबनशेठ नाईक यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी वर्तक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके यांनीही संग्रहाबद्दल मत व्यक्त केले. कवी सखाराम डाखोरे यांनी संग्रहातील कविता सादर करून शोषितांच्या अन्यायाला वाचा फोडण्याच्या भावनेतून या कविता सुचल्याचे सांगत उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. शैलेश औटी व डॉ. श्रीराम डोंगरे यांनी केले. (Sakharam Dakhore)
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.